मान-अपमान

    22-Sep-2022   
Total Views |
 
panjab
 
 
 
पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यानंतर सगळीच चंगळमंगळ सुरू आहे. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवालांनी आपले प्यादे म्हणून भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदी बसवले खरे, पण देशात पंजाबची मान उंचावण्याऐवजी मान साहेब पंजाबची मान खाली कशी जाईल, यासाठीच जोरकसपणे कार्यरत असल्याचे दिसून येते. संसदेतील ‘त्या’ भाषणामुळे अजूनही मान यांच्यावर टीका होते. त्यानंतर अनेकदा ते दारूच्या नशेत असल्याचे तथाकथित व्हिडिओ समोर आल्याचे पाहायला मिळाले.
 
 
पंजाबमध्ये गुंतवणूक आणावी यासाठी मान नुकतेच जर्मनीच्या दौर्‍यावर होते. दि. 11 ते 18 सप्टेंबरपर्यंतचा दौरा आटोपून ते नुकतेच मायदेशी परतले. परंतु, मान साहेब म्हटलं की वादविवाद आलेच. त्यांची जर्मनी भेटही वादात सापडली. प्राप्त माहितीनुसार, भगवंत मान यांना शनिवारी रात्री फ्रँकफर्ट विमानतळावर दारुच्या नशेत असल्यामुळे विमानातून उतरवण्यात आले. त्यामुळे दिल्लीत होणार्‍या बैठकीलादेखील ते उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, आम आदमी पक्षाने मात्र हे सगळे दावे खोटे आणि निराधार असल्याचे सांगितले आहे. मान यांची बदनामी करण्याचा प्रयत्न असून या सर्व अफवा आहे.
 
 
मुख्यमंत्री मान यांना प्रकृतीच्या कारणास्तव जर्मनीहून परतण्यास उशीर झाल्याचे सांगत पंजाब सरकारच्या अधिकार्‍यांची सारवासारव केली. भारतातील एका प्रगतीशील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असे विमानातून खाली उतरवणे नक्कीच शोभनीय नाही. परंतु, मान मद्यधुंद असल्याचा हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. याआधीही त्यांचे मद्यधुंद अवस्थेतील अनेक व्हिडिओ ‘व्हायरल’ झाले आहेत.
 
 
पंजाबमध्ये विजय मिळवल्यानंतरही ते अशाच मद्यधुंद अवस्थेत सापडले होते. यावेळी त्यांना अक्षरशः हात धरून त्यांच्या सुरक्षारक्षकांनी गाडीत बसवले. त्यामुळे केजरीवालांनी कितीही जीव तोडून ‘आम्ही सामान्य माणसांसारखेच आहोत,’ असे भासवण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यामागील सत्य सर्वश्रुतच. केजरीवाल, त्यांचा पक्ष आणि पंजाबमधील सरकारदेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे खुद्द मान यांनी आता समोर येऊन आपली बाजू मांडायला हवी. पण, तसे होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण मान यांचा इतिहास आणि वर्तमान अप‘माना’चाच!
 
 
कट्टरतावाद्यांचा विषारी आनंद
 
 
 
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. आपल्या विनोदाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे राजू श्रीवास्तव हे ’उत्तर प्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिल’चे अध्यक्षसुद्धा होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नोएडामधील प्रस्तावित ‘फिल्मसिटी’बाबत त्यांच्याकडून मत मागवले होते.
 
 
कानपूरमध्ये जनमलेले श्रीवास्तव उत्तर प्रदेशातील मनोरंजन क्षेत्र आणि उद्योगाच्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनांतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र, काही कट्टरतावाद्यांनी जल्लोष करण्यात धन्यता मानली. निधनाचे वृत्त समजतात काही समाजकंटकांनी त्यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. समाजमाध्यमांद्वारे श्रीवास्तव यांच्यावर अनेक कट्टरतावाद्यांनी श्रीवास्तव यांच्या कट्टर असल्याचा आरोप करत ते वर्णद्वेषी, इस्लामविरोधी असल्याचाही ठपका ठेवला. काहींनी तर त्यांनी आपली कला आणि अनुभव गमावल्याचे सांगत कॉमेडीच्या चेहर्‍यामागे एक सैतान लपला असल्याची गरळ ओकली.
 
 
अनेक उदारमतवादी गँगच्या पत्रकारांनीही श्रीवास्तव यांच्याविषयीचा द्वेष समाजमाध्यमांद्वारे जाहीर केला. अनेकांनी श्रीवास्तव यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करा, अशा पोस्ट केल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अगदी सामान्य नागरिकांनी आपले दुःख समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केले. परंतु, या विशिष्ट धर्माच्या कट्टरतावाद्यांना त्यातही आपली राजकीय आणि वैचारिक पोळी भाजून घ्यायची आहे.
 
 
मुळात भारतीय संस्कृतीत अगदी शत्रूचा जरी मृत्यू झाला तरीही त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना आपण करतो. 2012 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2014 ला त्यांनी समाजवादी पार्टीने कानपूर मतदारसंघाचे लोकसभेचे तिकीट दिले. परंतु, त्यांनी ते परत केले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी नामनिर्देशित केले. त्यामुळे केवळ भाजपत असल्याने त्यांच्या निधनावर कट्टरतावादी आनंद व्यक्त करत आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.