स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय ‘भारत जोडो’ अशक्यच !

21 Sep 2022 19:05:28
savarkar
 
 
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (savarkar photo) यांचा द्वेष करण्याची गांधी कुटुंबाची परंपरा सध्या राहुल गांधी पुढे नेत आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी आयोजित ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीरांचे छायाचित्र (savarkar photo) अन्य स्वातंत्र्यसैनिकांच्या रांगेत लावण्यात आले. मात्र, ही बाब लक्षात येताच सावरकरांचे छायाचित्र म. गांधींच्या छायाचित्राद्वारे झाकण्यात आले.
 
सातत्याने अपयशी ठरत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी आणि पक्षावरील गांधी कुटुंबाचे पकड ढिली होऊ नये, यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्येही काँग्रेस पक्षाकडून हिंदूविरोधी अजेंडा राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करण्याची गांधी कुटुंबाची परंपरादेखील राहुल गांधी पुढे नेत असताना ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये मात्र स्वातंत्र्यवीरांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.
 
सध्या ‘भारत जोडो’ यात्रा कोच्ची येथे आहे. यावेळी एर्नाकुलम विमानतळाजवळ काँग्रेस पक्षाकडून यात्रेचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वातंत्र्यसैनिकांचे छायाचित्र असलेली कमान लावण्यात आली होती. या कमानीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही छायाचित्रदेखील समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच ही बाब काँग्रेस पक्षाच्या लक्षात आली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीरांचे छायाचित्र झाकण्यासाठी म. गांधी यांचे छायाचित्र लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी हे छायाचित्र नजरचुकीने लावण्यात आल्याचा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे.
 
पणजोबांच्या माफी अर्जाची अखेर जाणीव झाली – भाजपचा टोला
 
भाजपच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आणि प. बंगालचे सहप्रभारी अमित मालविय यांनी राहुल गांधी यांना टोला लगाविला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, एर्नाकुलम येथे ‘भारत जोडो’ यात्रेच्या स्वागत कमानीमध्ये स्वातंत्र्यवीर सावकरांचे छायाचित्र दिसत आहे. उशिरा का होईना, राहुल गांधी यांना जाणीव झाली आहे की त्यांचे पणजोबा पं. नेहरू यांनी अवघ्या दोन आठवड्यातच पंजाबमधील नाभा येथील तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांच्या एका माफीअर्जावर स्वाक्षरी केली होती, अशीही आठवण मालविय यांनी करून दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0