गंगूबाई काठियावाडीच्या कोठीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

21 Sep 2022 13:20:55
 
gangubai
 
 
मुंबई : ‘पॉलिटिशियन के लिये वोट हैं हम, पोलीस के लिये हफ्ते का नोट हैं हम...’ गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील असे अनेक डायलॉग आपल्या लक्षात असतीलच. तब्बल 100 वर्ष जुने असणारं कामाठीपुरा म्हणजे मुंबईची एक वेगळीच ओळख. ब्रिटिश काळापासून कामाठी लोकांचं अधिक वास्तव्य असणार्‍या या परिसराचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले, ते म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे.
 
 
वेश्या व्यवसायाला अधिकृत दर्जा मिळावा, म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपुढेही ठामपणे मत मांडणार्‍या गंगूबाईंविषयी देहविक्री करणार्‍या स्त्रियांमध्ये एक वेगळाच आदर आहे. मात्र आता हेच कामाठीपुरा प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे का? अशी भीती निर्माण झाली आहे. ’ग्राऊंड झिरो’च्या माध्यमातून दै. ‘मुंबई तरुण भारत’चा चमू जेव्हा कामाठीपुरात पोहोचला, तेव्हा सर्वत्र टेकूवर उभ्या असणार्‍या इमारती पाहून त्यांच्याही मनात एक धास्ती भरली.
 
 
 
येथील महिलांना धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. वयाच्या अगदी 16व्या वर्षी आपले मानलेल्याच एकाने त्यावेळी गंगूबाईंना केवळ 500 रुपयांसाठी ज्या कोठीवर विकले, तीच दारूवाला इमारत सध्या जवळ-जवळ 35 ते 40 टेकूंच्या आधारावर उभी आहे. याच इमारतीच्या खाली अनेक दुकाने आणि एक हॉटेलदेखील आहे. दारूवाला इमारत केवळ ही एकच इमारत नाही, तर अशा अनेक इमारती कामाठीपुरमध्ये टेकूवर उभ्या आहेत. अनेक इमारतीत अनधिकृतपणे कपड्यांचेही व्यवसाय सुरू आहेत. कामाठीपुरातील सातव्या गल्लीत असलेली चंदाबाई चाळीतील 67, 69 या दोन क्रमांकाच्या इमारतीत नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहत आहेत. विशेष म्हणजे नुकतेच या इमारतीचा पुनर्विकास करण्यात आला होता.
 
 
 
परंतु, काही वर्षांतच या इमारतींची पडझड सुरू झाल्याने येथे वास्तव्यास असणार्‍या 29 कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. नुकताच इमारतीचा काही भाग एका बाजूने कोसळला. परंतु, त्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. येथील पायर्‍यांचा भागदेखील कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्याचे काम जरी सुरू करण्यात आले असले, तरी संपूर्ण इमारत धोकादायक असल्यामुळे त्याचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. इमारतीत ज्येष्ठ तसेच लहानग्यांचेही वास्तव्य आहे.
 
 
परिस्थितीअभावी अन्य कोठेही राहणे शक्य नसल्यामुळे याच धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन स्थानिकांना वास्तव्य करावे लागत आहे. तसेच, 100 वर्ष जुन्या इमारती कामाठीपुरात आहेत. घरमालक केवळ पैसे घेण्याचे काम करतात. आमच्या येथील इमारतींविषयी कोणीच लक्ष पुरवत नसून पोलीसदेखील केवळ हफ्ते घेण्याचे काम करतात, असेही स्थानिकांनी म्हटले आहे. यासंदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘म्हाडा’चे अधिकारी निलेश गाडगे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आमचे वरिष्ठ राव यांच्याशी बोला असे सांगितले. दरम्यान, राव यांनी तुम्ही माझे वरिष्ठ आहेत त्यांना संपर्क करा, असे उत्तर दिले. त्यामुळे ‘म्हाडा’कडूनही ठोस असे काहीच उत्तर मिळालेले नाही.
 
 
इमारत कोसळण्याची भीती
वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल ‘म्हाडा’कडून किंवा पालिकेकडून घेण्यात आलेली नाही. आम्हाला आमच्याच दुकानात बसण्यासही भीती वाटते. कारण, इमारतीची झालेली दुर्दशा पाहता इमारत कधीही कोसळेल, हीच भीती लागून आहे. जरा जोरात वारासुटला किंवा पावसाचा जोर वाढला की दुकानात बसण्याचीही भीती वाटत असल्याने अनेकदा बाहेरच उभे राहतो.
- चंद्रा, स्थानिक दुकानदार
 
 
तक्रारीची दखल नाही!
अनेकदा ‘म्हाडा’ असो किंवा पालिका असो किंवा पोलीस, सर्वांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. परंतु, अद्यापतरी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाही. ‘म्हाडा’कडूनही कोणी पाहणी करण्यास येत नाही. पावसाळ्यात दिवसभर पाणी साचते आणि आम्ही तेच उपसण्यात वेळ घालवतो. आत्तापर्यंत कोणीच लक्ष मात्र पुरविलेले नाही.
- मनोज, स्थानिक दुकानदार
 
 
पालिका आणि ‘म्हाडा’ कधी लक्ष देणार?
वारंवार पालिका आणि ‘म्हाडा’ प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही पावले याप्रकरणी उचलण्यात आलेली नाहीत. 100 वर्ष जुनी ही इमारत असून त्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. येथे दुर्घटना घडल्यावर पालिका आणि ‘म्हाडा’ लक्ष देणार आहेत का?
- विनोद अरगीले, उपविभाग अध्यक्ष (मनसे)
 
 
‘म्हाडा’चे प्रयत्न सुरू!
कामाठीपुरातील ज्या इमारती आहेत त्या ‘म्हाडा’च्या अखत्यारित येणार्‍या असून नगरसेवक फंड तेथे लागू पडत नाही. तसेच, इमारतींचे पुनर्वसन होण्यापूर्वी धोकादायक इमारतींना टेकू लावणे, ही सर्व प्रथम प्रक्रिया आहे. तसेच, कामाठीपुरमधील अनेक इमारती अनेक वर्ष जुन्या आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी ‘म्हाडा’व प्रभागाचे आमदार अमिन पटेल यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, जे पालिकेच्या अखत्यारित इमारती येतात, त्यांच्या पुनर्वसनासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे. माझ्या प्रभागातील समस्या सोडविण्यास मी नेहमी प्रयत्नशील आहे.
- जावेद जुनेजा, माजी नगरसेवक, काँग्रेस
 
 
 
- शेफाली ढवण
Powered By Sangraha 9.0