बारामतीत भाजपकडून पवारांची पुन्हा कोंडी!

21 Sep 2022 17:14:24
 
nashik
 
पुणे : भाजपकडून पवारांची पुन्हा कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपच्या वतीने २०२४ लोकसभेच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या मिशन ४५ या अभियानाला दिवसागणिक अधिकाधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपाकडे ओढा वाढत असून मातब्बर मंडळी भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच भाजपने बारामती लोकसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
 
 
पुरंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून बारामती लोकसभेच्या अनुषंगाने सुप्रिया सुळेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत राऊतांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राऊत यांच्या काही समर्थकांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
 
 
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या टीमकडून पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून मतदारसंघ बांधणीवर भाजपने जोर द्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या काही महत्त्वपूर्ण नेत्यांसह बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता.
 
त्यात संघटनात्मक बांधणी, केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविणे, बारामतीचा रखडलेला विकास, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेली कामे आणि भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव वाढविणे या बाबींवर विशेषत्वाने भर देण्यात आला होता. त्यातच आता महेश राऊत यांच्या सारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने पक्षाला रामराम ठोकल्याने खा. सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 
भाजपकडून पवारांची कोंडी
 
२०१४ पासून भाजपने बारामती लोकसभेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या मोदी लाटेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी साडेचार लाख मते घेत पवारांना हैराण करून सोडले होते. तर २०१९ मध्ये कांचन कुल ५ लाख ३० हजार मते मिळवून यांनी सुप्रिया सुळे यांना तगडी टक्कर दिली होती.
 
 
दोन्ही निवडणुकांमध्ये सुळेंचा विजय झाला असला तरी विरोधी उमेदवाराच्या मताधिक्यात सातत्याने होणारी वाढ पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. बारामतीतील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर संग्राम थोपटेंसह इतर मंडळी पवारांवर प्रचंड नाराज आहेत. या सर्व मंडळींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कवेत घेत भाजपने पवारांची कोंडी केली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0