अध्यक्षपदासाठी केरळ कॉंग्रेसला थरूर नकोत!

21 Sep 2022 13:42:32
shashi tharoor
 
 
 
थिरुअनंतपूरम : राहुल गांधींमुळे देशातील मतदारांनी कॉंग्रेसला साफ नाकारले, त्यामुळे पक्षात अध्यक्ष बदलाची मागणी जोर धरू लागली. कॉंग्रेस नेते खासदार शशी थरूर हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे वृत्त बाहेर येताच, केरळ कॉंग्रेसने मात्र थरूर यांच्या नवावर फुल्ली मारून राहुल यांच्या नावाचा पुनरुच्चार केला. त्यामुळे खुद्द केरळमधूनच थरूर यांना कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी विरोध होत असल्याचे समोर आले.
 
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी अलप्पुझा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, केरळमधील पक्षाची सामान्य भावना अशी आहे, की उत्तर केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे. पक्षाच्या राज्य युनिटने कोणताही उमेदवार सुचवलेला नाही. भारत जोडो यात्रेत लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रतिसाद राहुल यांना पाठिंबा दर्शवतो.
कॉंग्रेसचा अध्यक्ष फक्त नेहरू कुटुंबाचा पाठिंबा असलेली व्यक्ती होईल. आमच्या मते राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे. भारत जोडो यात्रेतील गर्दी पहा. जर दुसरी कोणी ही यात्रा काढली असती तर एवढी गर्दी झाली नसती,’’ असे मत काँग्रेसचे खासदार आणि राज्याचे माजी अध्यक्ष के मुरलीधरन यांनी व्यक्त केले.
 
 
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आठवडाभरापूर्वी केरळमध्ये दाखल झाल्यापासून सर्व केंद्रांवर त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. केरळमधील पक्षाचे वरिष्ठ नेते नियमितपणे त्यांच्यासोबत असतात, नेता आणि यात्रेशी एकता व्यक्त करतात. केरळच्या नेत्यांमध्ये राहुल यांना असलेला पाठिंबा पाहता केरळमध्ये त्यांना कोणत्याही विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाही.
 
 
 
दुसरीकडे, मतभेद असलेल्या जी-२३ नेत्यांना केरळमध्ये फारसा पाठिंबा मिळालेला नाही. थरूर यांच्या व्यतिरिक्त, माजी राज्यसभा सदस्य पी जे कुरियन यांना देखील केरळ कॉंग्रेसमध्ये फारसे महत्व नाहीये. या वर्षी मे महिन्यात झालेल्या राज्य विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सीपीआय(एम) ला पाठिंबा दिल्यानंतर राहुलच्या विरोधात बंडखोरी करणारे आणखी एक दिग्गज के व्ही थॉमस हे देखील पूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत. त्यामुळे शशी थरूर यांना आपल्या मातृभूमी केरळमधूनच विरोध होत असल्याचे उघड झाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0