मनोव्यापार ज्ञानातून मानवतेचे कार्य

    21-Sep-2022
Total Views |
mrunal bharadvaj
मानसशास्त्र हे अनाकलनीय, तर कधी अतर्क. मात्र, या क्षेत्रात संशोधन करुन, समृद्ध ज्ञानाने मनोव्यापारातून मानवतेचे कार्य करणार्या नाशिकच्या डॉ. मृणाल भारद्वाज यांच्या कार्याविषयी...
 
 
'सुखी एकरंगी दु:खे अनंत अपार, मनाचिया घावावरी मनाची फुंकर...!’ हे ‘पुढचं पाऊल‘ या चित्रपटातील गीत आजही मनोव्यापारासाठी समर्पक ठरावे. मानवी मन जेव्हा एकाकी पडते, जगण्याची आशा संपते आणि आता जगून काय उपयोग, हा प्रश्न उमेद हरवलेल्या मनाला पडतो आणि अशी सैरभर झालेली माणसं मग आधार शोधू लागतात. तेव्हा अशा विझलेल्या मनांमध्ये हळुवारपणे जगण्याची उमेद निर्माण करणार्याण नाशिकच्या डॉ. मृणाल भारद्वाज...
 
 
 
मनाच्या घावांवर मानवी मनाचीच फुंकर घालण्याचे डॉ. भारद्वाज यांचे मोठे कार्य. डॉ. मृणाल भारद्वाज या सुजाण पालकत्व, किशोरवयीन मुलांचे प्रश्न, कैद्यांचे मानसशास्त्र, महिला आणि मुलींच्या मनोसमस्या यांसह मानसशास्त्रातील नानाविध शाखांमध्ये गेली अनेक वर्षे समुपदेशनातून मानवतेचे कार्य करीत आहेत. डॉ. मृणाल या नाशिकमधील पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात उपप्राचार्या तसेच मानसशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यांनी मानसशास्त्रात पीएच.डी आणि ‘एमबीए’चीही पदवी मिळवली आहेे. मुंबईत बारावी विज्ञान शाखेत शिकत असताना त्यांना ‘मानसशास्त्र’ विषयासाठी अत्यंत हुशार शिक्षक लाभले आणि त्यातून या विषयाची त्यांची रुची वाढतच गेली.
 
 
 
त्यानंतर विज्ञान शाखेतील पारंपरिक वाटांचे करिअर सोडून डॉ. मृणाल यांनी मानसशास्त्रातच यशस्वी कारकिर्द घडवण्याचे ठरवले आणि २००५ मध्ये याच विषयात पीएच.डी पूर्ण केली. मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करताना मुलांचे, महिलांचे, कैद्यांचे, किशारवयीनांचे मानसशास्त्र या आणि अशा विषयांवरील मनोव्यापारांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्या अनुभवातून नवीन ज्ञानाची कवाडे खुली होत गेली आणि ‘मानवतेसाठी समुपदेशन करणार्यान प्राध्यापिका’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
 
 
 
डॉ. मृणाल या विलक्षण राष्ट्रपेे्रमी. तरुण अभियंते संरक्षण दलात काम करण्यास फारसे तयार नसतात, याची त्यांना खंत वाटे. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी त्यांनी संरक्षण दलात अभियंते का जात नाही, या विषयावर संशोेधन केले आणि महत्त्वपूर्ण निष्कर्ष जगासमोर आणले. वाढत्या आत्महत्या या देशाच्या मनुष्यबळाची हानीच. यावर अधिक कामाची गरज असल्याचे त्यांना जाणवले आणि आत्महत्या केवळ आर्थिक कारणांनी होत नसून त्यामागे नकारात्मक, असंयुक्तिक, अवास्तव विचार, व्यक्तीच्या विचारांची पद्धती, भावनांचे व्यवस्थापन न जमणे, सामाजिक पैलू ही आणि अशी अनेक कारणे असतात. त्याचा अभ्यास करुन डॉ. मृणाल यांनी समुपदेशातून अनेक विझलेल्या मनांमध्ये जगण्याची उमेद जीवंत केली.
 
 
 
डॉ. मृणाल भारद्वाज यांचा पेशा अध्यापनाचा असल्याने, तरुणाईच्या समस्या जवळून अनुभवत किशोेरवयीन मुलांच्या समस्यांवर समुपदेशन करण्याचे त्यांनी ठरवले. हल्ली अमली पदार्थ, धुम्रपान, मद्यपान या व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईचे पुनर्वसन केले जात. मात्र, या व्यसनांव्यतिरिक्त मोबाईल, गॅझेट्स, ऑनलाईन गेम्स, समाजमाध्यमे यांचे तरुणाईला जडलेले व्यसन अधिक गंभीर असल्याचे त्यांना जाणवले आणि ‘गॅझेट अॅमडिक्ट’, ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ (फोमो) या आणि अशा व्यसनांच्या चक्रव्यूहात अडकून सैरभर होत असलेल्या तरुणाईला त्या समपुदेशनातून मायेचा हात देत आहेत.
 
 
 
‘’टीव्ही, मोबाईल यांच्या येण्यापूर्वी कुटुंबात संवाद होत असे, तो आज हरवला आहे. साधनांच्या गर्दीतही मनुष्य एकाकी पडत आहे. मोबाईल गॅझेट्समुळे ताणतणाव, मनोविकार वाढले आहेत,” असे डॉ. मृणाल भारद्वाज सांगतात. त्यातून मुक्त होण्यासाठी व्यक्तीने, कला, क्रीडा यांसारखे छंद जोपासावेत, निसर्गाकडे वळावे, अभिव्यक्त व्हावे, आभासी जगातील कमकुवत संपर्कापेक्षा वास्तविक व्यक्तींशी संवाद साधावा, यासाठी त्यांचे समुपदेशनातून अव्याहत कार्य सुरु आहेे. त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार असून कोरोना काळात घरापासून दूर पडलेल्या पोलीस विभागातील कर्मचार्यां ना केलेले समुपदेशन आणि त्यानंतर मिळालेले नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकॅडमीतील सन्मान आपल्यासाठी अनमोल असल्याचे त्या नमूद करतात.
 
 
 
“तरुणाईने अल्पमुदतीच्या ध्येयापासून दूर राहत दीर्घकालीन ध्येय ठरवावीत. संवादी असावे, अभिव्यक्त होत राहावे आणि भावनांचे व्यवस्थापन करावे,” असा संदेश डॉ. मृणाल भारद्वाज तरुणाईला देतात. बुद्ध्यांकाची देणगी असलेली युवापिढी भावनांकाने जग जिंकू, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आध्यात्मिक बुद्ध्यांकानेही व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो. त्यासाठी ध्यान, योग, प्राणायाम या आणि अशा जीवनशैलीतूनही व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो, यांच्यावर डॉ. मृणाल यांचा गाढ विश्वास आहे. किंबहुना, जगण्याचे व्यवस्थापन अध्यात्मातूनच योग्यपणे करता येते, असे सांगायला त्या विसरत नाहीत. डॉ. मृणाल भारद्वाज यांना पुढील वाटचालीसाठी कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा....!
 
 
 
निल कुलकर्णी
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.