महाराष्ट्र भाजपकडून मिशन विधानसभेची घोषणा

    21-Sep-2022
Total Views |
 
लोकसभेच्या धर्तीवर विधानसभाही टार्गेट !

मुंबई :
२०२४ लोकसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रात आखण्यात आलेल्या मिशन ४५ पाठोपाठ आता आणखी एक अभियान भाजपकडून सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगाने भाजपकडून आजवर न जिंकलेल्या आणि संघटना कमकुवत असलेल्या काही विशिष्ट मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 


श्रीकांत भारतीयांच्या खांद्यावर जबाबदारी
भाजपच्या या महाराष्ट्र प्रदेश विधानसभा प्रवास अभियानाची जबाबदारी भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या खांद्यांवर देण्यात आली आहे. नुकतेच या अभियानाचे संयोजक पद भारतीय यांच्याकडे देण्यात आले असून त्याबाबतचे नियुक्ती पत्र देखील बावनकुळे यांनी श्रीकांत भारतीय यांना दिले आहे.


महाराष्ट्र भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीनंतर राज्य पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण अभियान आणि नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २०२४ लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील ४५ लोकसभा मतदारसंघ टार्गेट करण्यात आले आहेत. त्यापैकी १६ मतदारसंघांवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले असून या मतदारसंघांमध्ये एका केंद्रीय मंत्र्याची पक्षातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. मिशन ४५ अंतर्गत केंद्रीय मंत्री हे त्या त्या मतदारसंघात ३ दिवसीय दौरे करत असून लोकसभा जिंकण्याच्या उद्देशाने हे अभियान चालवण्यात येत असल्याचे भाजपने म्हटले आहे.


२०० जागा जिंकण्याचा निर्धार
'भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) येत्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका युतीत लढणार आहे. त्याच धर्तीवर २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही युती म्हणूनच लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेत परत येण्यासाठी राज्यातील विधानसभेच्या २०० जागांवर लक्ष केंद्रित करत असून या अभियानाच्या बाबतीत लवकरच निश्चिती करण्यात येणार आहे. या अभियानाबाबत अधिक तपशील लवकरात लवकर देण्यात येणार असून थोड्या फरकाने पराभूत झालेल्या आणि संघटना कमकुवत असलेल्या जागा जिंकण्यासाठी आम्ही जोराने प्रयत्न करणार आहोत.'
- केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता, भाजप, महाराष्ट्रआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.