Tiger Translocation: महाराष्ट्रात होणार वाघांचे स्थलांतरण

    20-Sep-2022
Total Views |
Maya
 
 
मुंबई (Tiger Translocation) : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्ते आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे स्थलांतर सुरू करणार आहे.राज्यातील वाघांचे अशाप्रकारचे वैज्ञानिक संवर्धनाचे हे पहिलेच स्थलांतर असेल. जास्त वाघ असलेल्या भागात वाघांची संख्या कमी करणे तसेच मनुष्य-प्राणी संघर्ष कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्र वन विभागाने दि. १५ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत.
 
 
मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये म्हणाले की, महाराष्ट्रातील अशा प्रकारचे संवर्धन हे पहिलेच स्थानांतर असेल. वैज्ञानिक लोकसंख्या व्यवस्थापनासाठी ब्रम्हपुरी वनविभागातून चार ते पाच तरुण मादी वाघांना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवण्याची योजना आहे. या प्रकल्पानंतर वाघांची प्रबळ संख्या असलेल्या भागातून वाघांना इतर ठिकाणे हलवता येणार आहे. विदर्भातील वाघांची संख्या २०२०मध्ये ३३१ वरून २०२१ साली ३९६ पर्यंत वाढली आहे. यापैकी सुमारे ६० टक्के वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पाद्वारे वाघिणींना रेडिओ-कॉलर केले जाईल आणि नवेगाव नागझिराच्या मुख्य भागात सोडले जाईल. त्यांच्यावर जीपीएस द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. सोडलेले वाघ स्थायिक होईपर्यंत त्यांचे ऑफलाइन आणि ऑनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. हे स्थलांतरण भारतीय वन्यजीव संस्था (WII) च्या तांत्रिक सहकार्याने केले जात आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.