शिवाजी पार्कबाबत अजूनही सस्पेन्स कायमच

    20-Sep-2022
Total Views |
 

ठाकरे गटाचे शिष्टमंडळ पालिका अधिकाऱ्यांच्या भेटीला

मुंबई : 
शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु झालेला संघर्ष आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून शिगेला पेटला आहे. दोन्ही गटाकडून महापालिका प्रशासनाकडे शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याच्या बाबतीत परवानगी मागण्यात आलेली असताना पालिका प्रशासनाने मात्र अद्याप त्यावर कुठलाही निर्णय घेतलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी मंगळवार, दि. २० सप्टेंबर रोजी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याच्या संदर्भात पालिका प्रशासनाकडे विचारणा केल्याचे समजते आहे.


शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली असून या शिष्टमंडळात शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य, महेश सावंत आणि इतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे भेट घेतली असून शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळावा कोणाचा होणार या अनुषंगाने ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.


मैदान कुणालाही न देण्याचा निर्णय होणार ?

शिवसेनेच्या दोन गटांमध्ये निर्माण झालेला वाद, मुंबईतील शिवसेनेची ताकद, ठाकरे आडनावाभोवती असलेले वलय, ठाकरे गटाकडून होणारे हिंसात्मक हल्ले आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती याचा अभ्यास मुंबई महापालिकेने केला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून भविष्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेता शिवाजी पार्क मैदान कुणालाही न देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.