राहुल गांधींना वायनाड मिळाला पण सुळेंना तो ही मिळणार नाही !

    20-Sep-2022
Total Views |
 
बारामतीत पवारांचा पराभव होणार हे निश्चित - आ. राम शिंदे

ओंकार देशमुख

मुंबई, दि. २० : '
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौऱ्याची नुसती घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीची मंडळी घरघर जाऊन संपर्क साधू लागली आहेत. मात्र, स्थानिक खासदार सुप्रिया सुळे या मागील अडीच वर्षात बारामतीच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठे होत्या ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. अमेठी मतदारसंघात आपला पराभव होणार हे समजल्यानंतर राहुल गांधींनी वायनाडची चाचपणी केली आणि ते निवडून आले. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष होता म्हणून त्यांना वायनाडचा पर्याय उपलब्ध झाला, मात्र, साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंना दुसरा वायनाड सापडणार नाही,' अशी घणाघाती टीका माजी मंत्री आणि भाजपचे नेते आमदार प्रा. राम शिंदे यांनी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.

महाराष्ट्र भाजपने आखलेल्या 'मिशन ४५' अंतर्गत भाजपकडून बारामती लोकसभेत करण्यात येत असलेल्या तयारीवर, बारामतीतील संभाव्य राजकीय समीकरणांवर आणि २०२४ च्या संभाव्य निकालांवर राम शिंदे यांनी 'मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 'सूर्य पश्चिमेला उगवला तरी राष्ट्रवादीचा बारामतीत पराभव होणार नाही अशी वल्गना जयंत पाटील यांनी केली असली तरी त्याला खोटे ठरवल्याशिवाय भाजप राहणार नाही. भाजपने सुरु केलेल्या तयारीमुळे पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीत पवारांचा बारामतीत पराभव होणार हे निश्चित आहे,' असा विश्वासही राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


भाजपचे मिशन बारामती नेमके आहे काय ? प्रत्यक्ष मैदानावर परिस्थिती काय सांगतेय ?

२०१९ लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपने १४४ मतदारसंघ अवघ्या काही फरकाने गमावले होते, त्यातील १६ मतदारसंघ महाराष्ट्रात असून त्यात बारामतीचा समावेश होतो. येत्या २२, २३ आणि २४ सप्टेंबर रोजी निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर येत असून बारामतीसाठी आमची मोर्चेबांधणी सुरु आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये सातत्याने आमचा मतदानाचा टक्का वाढला असून भाजपासाठी ही सकारात्मक बाब आहे. मागील काही दिवसांत बदललेली आणि येत्या काळात बदलणारी सामाजिक आणि राजकीय समीकरणे पाहता २०२४ मध्ये भाजपचा खासदार बारामती मतदारसंघातून विजयी होईल, असा आम्हाला विश्वास आहे. विशिष्ट घटकांचे लांगुलचालन केल्यामुळे पवारांना बारामती आणि परिसराचा समतोल विकास साधता आला नाही. लोकांमध्ये या विषयावरून नाराजी असून ही नाराजी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानामध्ये परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही.


हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता इतर काही बड्या नेत्यांचे भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे का ?

स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय नाराजी आहे, याबाबत आम्ही चिंता करत नाहीत. आम्ही कुणाशीही संपर्कात नाहीत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील संघषात परस्परांचे पंख छाटण्याचे उद्योग सुरु आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातील काही नेतेमंडळी नाराज आहेत हे निश्चित. हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ लोकसभेपूर्वी जर भाजपमध्ये प्रवेश केला असता तर नक्कीच बारामती लोकसभेची स्थिती वेगळी राहिली असती. समोर मातब्बर मंडळी असूनही भाजपने मागच्या निवडणुकीतही पाच लाख तीस हजार मते मिळवून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे बारामती हा कधीही पवारांचा बालेकिल्ला नव्हता, हे वास्तव असून केवळ बारामतीच्या बाहेरील आणि देशातील इतर राज्यांमधील लोकांना सांगण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा प्रचार करण्यात येत होता. भाजप प्रवेशाच्या बाबतीत माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही, परंतु सरकार गेले तरी आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती मोठा होऊ नये या वृत्तीमुळे दुखावलेली मंडळी आणि मतदार नाराज आहेत. येत्या काळात सुजाण नागरिक याबाबत सारासारा विचार करून योग्य तो निर्णय घेतील. बारामतीत बदल घडवायचा हे बारामतीकरांनी ठरवले आहे.


बारामतीत निर्णायक भूमिका बजावणारा घटक असलेला धनगर समाजाचा भाजपाकडील कल वाढतोय, त्याची नेमकी कारणे काय असतील ?

कुठलीही व्यक्ती किंवा संघटना राजकीय पक्षाच्या मागे ठामपणे उभी राहताना काही अपेक्षा आणि मागण्या घेऊन पाठिंबा देत असते. मात्र, पवारांनी मागील काही वर्षांमध्ये आपल्याच घरात दोन खासदार, आमदार, मंत्रीपदे आणि सर्व महत्त्वाची सत्तापदे कायम ठेवली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्तेच्या त्या राजकारणात कुठेही स्थान नव्हते.; केवळ लोकांना मतलबासाठी वापरायचे आणि सोडून द्यायचे हा पॅटर्न आता या आधुनिक युगात चालणार नाही. काही मोजके अपवाद सोडले तर बारामतीत धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही, उलट नव्याने उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाला वर न येऊ देण्याचेच उद्योग पवारांच्या काळात झाले. धनगर समाजातील अनेक प्रश्न हे वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित होते, राजकीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळण्याच्या बाबतीतही धनगर समाजावर सातत्याने अन्याय केला गेला. त्यामुळे धनगर समाजाची राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात नाराज होती हे निर्विवाद आहे. उलट भाजपने धनगर समाजासाठी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात आखलेल्या योजनांमुळे समाजात भाजपाविषयी एक सकारात्मक भावना असून त्यामुळेच धनगर समाजाचा भाजपाकडे कल वाढतो आहे आणि येत्या काळात निकाल वेगळे लागलेले आपल्याला दिसून येतील.


पुणे आणि बारामती आपला बालेकिल्ला आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातो. या मतदारसंघांमध्ये आजवर झालेला विकास आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य यात वास्तव काय आहे ?

बारामतीच्या अनेक गावांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. काही गावांमध्ये परिवहनासाठी चांगले रस्ते नाहीत, ४० ते ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. पुरंदर आणि लगतच्या भागात अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेले सरकार देशात आणि महाराष्ट्रात असूनही पवारांना आपल्याच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता आला नाही. पवार कुटुंबाकडून लोकांना असमानतेची जाणीव वारंवार करून दिली गेली. त्यामुळेच बारामती लोकसभेच्या ६ मतदारसंघांपैकी केवळ भोर आणि इंदापूर या दोन तालुक्यांमधून राष्ट्रवादीला आघाडी मिळत आलेली आहे. मात्र, यावर्षी इंदापूरमधून आघाडी देणारे हर्षवर्धन पाटील भाजपात आले आहेत आणि इतर काही मंडळी राष्ट्रवादीवर सातत्याने नाराज आहेत. त्यामुळे केवळ राजकीयच नाही तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील आता बदल घडवण्याची इच्छा जागृत झाली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.