'ओयो' कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार

20 Sep 2022 15:39:09
 
oyo
 
 
 
मुंबई : हॉटेल व्यवसायातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्रँड असलेल्या ओयो कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याची चिन्हे आहेत. आयपीओ दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता कंपनीने केली असून ती सर्व कागदपत्रे त्यांनी सेबी कडे सादरसुद्धा केली आहेत. यामुळे ओयो कंपनीकडून २०२३च्या जानेवारी महिन्यापर्यंत हा आयपीओ बाजारात आणला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल व्यवसायामधील सर्वात मोठ्या ब्रॅंड्समध्ये ओयोचा समावेश होतो. शेअर बाजारातील चढ -उतारांचा आढावा घेऊन हा आयपीओ केव्हा बाजारात आणायचा याचा निर्णय घेतला जाईल असे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.
 
 
गेली काही वर्षे ओयो कंपनीला सातत्याने तोट्याचा सामना करावा लागत होता. तरीही २०२१ मध्ये कंपनीला ४१०३ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता, अवघ्या एका वर्षात तो कमी करून २०२२ मध्ये २१४० कोटींपर्यंत तो घसरला. त्यामुळे कंपनीच्या पतमानांकनात सुधारणा झाली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीने ४१४ कोटींचा तोटा कमावला. सातत्याने कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होत असल्याने सेबी कडून आवश्यक त्या मंजुरी मिळवण्यासाठी कंपनीला अडचण निर्माण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे लवकरच बाजारात हा आयपीओ दाखल होईल अशी आशा आहे.
 
 
हॉटेल क्षेत्रातील एक प्रमुख ब्रँड म्हणून ओयोने अल्पवधीतच मोठे नाव कमावले. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार भारताबरोबरच मलेशिया, इंडोनेशिया आणि युरोपमधील देशांमध्ये व्यवसाय विस्ताराला आहे. कोरोना काळाचा सर्वात जास्त फटका हा पर्यटन व्यवसायालाच बसला पण त्यातून लवकरच सावरत आय व्यवसायाच्या वृद्धीने जोर पकडला. कोरोना काळाच्या फटक्यानंतर सातत्याने तोटा कमीच होत चाललेला आहे. लवकरच बाजारात आयपीओ दाखल करून व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल उभारणीचा कंपनीचा मानस आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0