संजय राऊतांच्या चार्जशीटमध्ये ईडीने केला शरद पवारांचा उल्लेख!

ईडीच्या आरोपपत्रात एका बैठकीला शरद पवारही उपस्थित असल्याचा उल्लेख

    20-Sep-2022
Total Views |

pawar
 
 
मुंबई: २००६-०७ या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात म्हाडाचे काही अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेदेखील उपस्थित होते, असे स्पष्टपणे ईडीने आरोप पत्रात नमूद केले आहे. तसेच पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन म्हणून काम करत होते. मात्र संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.
 
२००६-०७ च्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. तसंच २००७ मध्ये विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या दोघांचीही नावे ईडीच्या चार्जशीटमध्ये आहेत. तसेच, शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच वाधवान हे या सगळ्यामध्ये कसे आले हे समोर आले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे.
 

 
प्रवीण राऊत यांच्याकडे महत्त्वाचे अधिकार दिले गेले
 
प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकत होते तसे अधिकार त्यांना देण्यात आले होते. म्हाडासोबत वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याची जबाबदारी प्रवीण राऊत यांच्यावर देण्यात आली होती. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्याने प्रवीण राऊत यांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या बहुतांस सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे आणि लाभ मिळवण्याच्या हेतूने संपर्क साधला. त्यानंतर एफएसआय बिल्डरला विकला.
 
 
 
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनमत
 
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनतमत होतं असंही ईडीने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं होतं. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प ७४० कोटींचा असून त्यात प्रवीण राऊत यांना १८० कोटी मिळाले आहेत असे प्रवीण राऊत यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. याचा आधार घेत संजय राऊत यांना या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले असाही अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.