काँग्रेसमध्ये अंतर्गत वादांचा नवा अध्याय

    20-Sep-2022
Total Views |
 
तर राहुल गांधींना अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावरही आक्षेप

मुंबई : 
आपल्या अस्तित्वासाठी मागील ८ वर्षांपासून सातत्याने लढणाऱ्या देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसची स्थिती सुधारण्यापेक्षा दिवसेंदिवस अधिकाधिक खालावत जात आहे. संघटनात्मक पातळीवर कमकुवत बनलेल्या काँग्रेसला यातून बाहेर काढण्याऐवजी पक्षातील नेतेमंडळी परस्पर संघर्ष आणि हेव्यादाव्यांमध्येच अडकून पडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


मुंबई येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत थेट महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभाराविषयी पक्षातीलच काही नेतेमंडळींनी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या असून यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. प्रभारी एच के पाटील आणि नेते पल्लम राजू यांच्याकडे याबाबत काही नेत्यांनी तक्रारी  केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.


अशोक चव्हाण लवकरच प्रदेशाध्यक्षपदी ?

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस नेतृत्वावर आणि राज्य काँग्रेसमधील काही नेत्यांवर नाराज असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चांना सातत्याने ऊत आला आहे. अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे दावे देखील काही माध्यमांनी केले होते, मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले होते. 

प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना दिले असले, तरी अशोक चव्हाणांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.


अध्यक्षपद निवड प्रक्रियेवर माजी मुख्यमंत्र्यांचे आक्षेप

काँग्रेसचे दुसरे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांची पक्ष नेतृत्वावरील नाराजी आता लपून राहिलेली नाही. जी २३ नेत्यांच्या यादीत सहभागी असलेल्या चव्हाण यांनी आता काँग्रेस अध्यक्ष पदासाठी होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करावी, या महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला आहे. तसेच ही निवडणूक मतदान पद्धतीने व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.