वनविभागाची 'खवले मांजर वाचवा' मोहीम होतेय यशस्वी

02 Sep 2022 13:27:24
Pangolin
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात वन विभागाने राबविलेली 'खवले मांजर मोहीम यशस्वी ठरताना दिसत आहे. दोडामार्ग मधील पिकुळे गावामधील एका शेतकऱ्याला मध्य रात्री दोनच्या सुमारास दुर्मिळ खवले मांजर आपल्या परसजागेत अडकला असल्याचे निदर्शनास आले. या खवले मांजराची माहिती तत्काळ वनविभागाला कळविले. वन विभागाने हे खवले मांजर ताब्यात घेतेले असून त्याची पशुवैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
 
 
जगात सर्वातजास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभाग दोडामार्ग येथील वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे. या अंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व नागरीक बांधवांना या दुर्मिळ खवलेमांजराच्या संवर्धन व संरक्षणाकामी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेत सहभागी होत खवलेमांजराची माहिती वनविभागाला वेळेत कळवून त्या खवलेमांजराचे प्राण वाचवण्यासाठी वनविभागाच्यावतीने सदर शेतकरी कृष्णा काशीराम महालकर यांचे आभार मानून त्यांना कोकणातील या दुर्मिळ अशा वन्यजीवाच्या, खवलेमांजराच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन म्हणून एक हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
 
 
शेतकरी कृष्णा काशीराम महालकर यांनी परिसरातील कुत्रे व इतर नैसर्गिक शिकाऱ्यांपासून त्याचे रक्षण केले. आणि सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्ग येथे कळविली. सदरची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्गचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. आणि खवले मांजर ताब्यात घेतले. या खवलेमांजराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. हे खवले मांजर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी पुर्णतः निरोगी असल्यामुळे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल दोडामार्ग कार्यालयाचे वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, वनमजुर विश्राम कुबल, संतोष शेटकर व इतर सर्व दोडामार्ग परिक्षेत्र कार्यालय स्टाफ यांनी महत्वाची भूमिका निभावली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0