पाकिस्तानची पुन्हा फटफजिती

19 Sep 2022 11:02:10
pakstan
 
 
 
'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ च्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच उझबेकिस्तानच्या दौर्‍यावर होते. समरकंद याठिकाणी पार पडलेल्या या संमेलनात आठ देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. या परिषदेवर नेहमीप्रमाणेच भारताचा वरचश्मा पाहायला मिळाला. परंतु, ही परिषद आणखी एका कारणाने चर्चेचा विषय ठरली. ते म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची झालेली जाहीर फजिती. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या फजितीवर पुतिन यांना हसू आवरणेदेखील कठीण झाले होते. अवघ्या एका मिनीटात पाकिस्तानची फटफजिती अवघ्या जगाने पाहिली. पुतिन पाहत राहिले पण शहबाज शरीफ चूक करण्यापासून काही थांबले नाही. पुतिन यांच्याशी चर्चा करत असताना शरीफ यांना कानात ‘इयरफोन’ लावताच आले नाही. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ झाला असून शरीफ यांना आता नेटकर्‍यांकडून ‘ट्रोल’ केले जात आहे. खुद्द, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनीही हा व्हिडिओ शेअर करत शरीफ यांच्यावर टीका केली आहे.
 
 
पुतिन आणि शरीफ यांच्या द्विपक्षीय चर्चेला पुतिन यांनी आपल्या रूसी भाषेत सुरुवात केली. तेव्हा पाकचे पंतप्रधान शरीफ यांना त्यांचे म्हणणे समजत नव्हते. कारण, त्यांचे ‘ट्रान्सलेट टूल’ने काम करणे बंद केले होते. तेव्हा शरीफ यांनी कोणी माझी मदत करू शकता का, असा विनंतीवजा सवाल केला. यानंतर तेथील अधिकार्‍याने त्यांच्या कानातील ‘ट्रान्सलेट टूल’वाले ‘इयरफोन’ कानात व्यवस्थितपणे लावले. सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर काही वेळात पुन्हा एकदा शरीफ यांचे ‘इयरफोन’ कानातून खाली पडले. यानंतर पुतिन यांना हसू थांबवता आले नाही. चर्चेआधीच शरीफ प्रचंड तणावात असल्याचे स्पष्ट दिसत होते. जागतिक पटलावर पुन्हा एकदा पाकिस्तानची फजिती झाली. याआधीही इमरान खान यांनी रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना विमानतळावर घ्यायला रशियाचे मोठे प्रतिनिधी आलेच नाही. त्यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या अपमानाची सर्वत्र चर्चा झाली होती.
 
 
पाकिस्तान रशियाकडे वारंवार कर्जाची मागणी करत आहे. आर्थिक गटांगळ्या खाणारा पाकिस्तान आणि आता महापुराचा बसलेला मोठा फटका यामुळे पाकिस्तान डबघाईच्या मार्गावर आहे. त्यामुळे सावरण्यासाठी पाकिस्तान शक्य तितके कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनच्या कर्जामुळे पाकचा श्वास गुदमरत आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे तिथून सुटका करण्यासाठी पाक रशियाकडे आस लावून बसला आहे. त्यामुळे शरीफ यांना जे होईल ते पाहण्याशिवाय दुसरा पर्यायही शिल्लक नव्हता. भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर एका अफगाण तरूणाने भारतीय क्रिकेटपटूचे कौतुक केले होते. तो व्हिडिओ चांगला ‘व्हायरल’ झाला होता. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरीफ यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली. जग कोरोनाचा सामना करत असताना भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात दिला होता. परंतु, त्यावेळी ही मदत पोहोचवताना पाकिस्तानने रस्ते मार्गावर अडथळा निर्माण केला. त्या मुद्द्याद्वारे पंतप्रधानांनी पाकला चांगलेच सुनावले.
 
 
मोदींनी पाकचे पंतप्रधान आणि चिनी राष्ट्रपतींशी कुठलाही संवाद न साधता स्पष्ट संदेश दिला. आठ देश या संमेलनात सामील झाले खरे, पण सगळ्या जगाच्या नजरा पुतिन आणि मोदी यांच्या भेटीवरच होत्या. पंतप्रधान मोदी यांनी भारत-रशिया द्वीपक्षीय चर्चेदरम्यान पुतिन यांना युद्ध नाही, तर शांततेचा स्वीकार करण्यास सांगितले. असे समोरासमोर रशियाला सल्ले देण्याचे धाडस पाक कधीही करू शकत नाही. कारण, तसे धाडस केले तर जे काही थोडेथोडके कर्ज हाती पडेल तेदेखील मिळणार नाही. परदेशात भारताची प्रतिमा बदलत असून भारत बलशाली असल्याचा प्रत्यय परदेशात राहणार्‍या भारतीयांना येऊ लागला आहे. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींवरही कौतुकाचा वर्षाव केला. त्याचप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्याही शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भारत आणि रशियाचे संबंध किती दृढ आहेत, याचा प्रत्यय आला. आधीच आर्थिक तंगीमुळे पाकची फजिती होत होती. आता त्यात उझबेकीस्तानमध्ये झालेल्या फजितीची भर पडली आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0