बीज अंकुरे अंकुरे

    19-Sep-2022
Total Views |
 
diet
 
 
 
मासिक धर्म हा नियमित प्रमाणशीर व सहज होणे नैसर्गिक आहे, हे आपण बघितले. तसेच अनियमित रज:प्रवृत्ती व त्यांची कारणे आणि त्यावरील उपाय याबद्दलही वाचले. हा मासिक धर्म नियमित असताना व नसल्यास उपाययोजना करतेवेळी काही आहार-आचरणातील बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊयात.
 
 
मासिक रज:प्रवृत्तीपूर्वी शरीराचे तापमान स्वाभाविकत: थोडे वाढते. यावेळेस शरीर थोडे जड वाटू लागते. क्वचित चीडचीड होते. अंगावरून सफेद पाणी(श्वेतपदर) जाते. कंबर आणि छाती दुखते. चेहर्‍यावर मुरुमे येतात. काहींना अतिझोप येते. काही अस्वस्थ राहतात. प्रत्येक ऋतुमती स्त्रीमध्ये रज:प्रवृती ते रज:निवृत्ती यातील एक, दोन किंवा त्याहून अधिक लक्षणे अनुभवास येतात. तसेच एकाच स्त्रीमध्ये वयोमानापरत्वे व अवस्थेनुरुप कुमारी अवस्था, विवाहित, प्रसूतीनंतर व ‘मेनोपॉझ’ दरम्यान अशा विविध टप्प्यांत ही लक्षणे व त्यांची प्रखरता भिन्न भिन्न असते.
 
 
पण, एक लक्षात घ्यावे की, मासिक धर्मापूर्वी काही दिवस व रज:प्रवृत्ती सुरु असतेवेळी गर्भाशय व त्यांच्याशी निगडित अवयावांना अधिक रक्तपुरवठा होतो. शरीराचे कार्य थोडे वाढते, अशा वेळेस अन्य शारीरिक कष्ट व मानसिक ताण अवाजवी असू नये. त्यांचे प्रमाण आटोक्यात ठेवावे, म्हणजे रोजच्या व्यायाम प्रकारात थोडा बदल करावा. व्यायाम थोडा हलका असावा. तसेच नृत्य, ट्रेकिंग, अंग मेहनतीची कामे, क्रीडाप्रकार हेदेेखील कमी प्रमाणात करावे. अतिरेक टाळावा.
 
 
या दिवसांमध्ये शरीरातून रक्तस्राव होतो, जो स्वाभाविक आहे, पण तो होताना तो प्रमाणापेक्षा अधिक वाढेल, अशी शारीरिक कष्टाची कामे करु नयेत. तसेच खाण्यातून खूप तिखट, तेलकट, मसालेदार, खारट खाणे टाळावे. हे सर्व प्रकारचे अन्न राजसिक अन्न स्वरुपाचे असल्याने रज:स्रावाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरते. अतिरज:स्राव झाल्याने थकवा येणे, चालताना धाप लागणे, चक्कर येणे, घशाला कोरड पडणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे इ. लक्षणे उद्भवतात. ही लक्षणे टाळणे शक्य आहे. जर अतिरिक्त शारीरिक हालचाल टाळली आणि आहार सात्विक घेतला तर ही लक्षणे उद्भवणारच नाहीत.
 
 
शिळं अन्न (घरचेच नाही, तर हॉटेलमधील अन्नंही शिळेच असते) जेवढे मोठे हॉटेल तेवढा मोठा फ्रीज आणि तेवढे त्यात ठासून भरलेले, निम्मे शिजवलेले अन्नपदार्थ. ‘ऑर्डर’ आली की, विशिष्ट मसाल्यांत भाजून/परतून/शिजवून काही वेळेस फक्त पुन्हा गरम करून ती डीश ‘सर्व्ह’ केली जाते. केक, पेस्ट्री व अन्य बेकरीचे पदार्थदेखील शिळेच. केक आणि पेस्ट्रीवरील आयसिंग जेवढे जास्त तेवढा केक अधिक काळ टिकतो. केकचा ‘बेस’ तयार ठेवून ऑर्डरनुसार त्यात थोडा बदल केला जातो. बरेचदा ‘ब्राऊन ब्रेड’ हा कणडघ शिवायच असतो. काही वेळेस ‘फूड कलर’ घालून ‘ब्राऊन’ रंग आणला जातो.
 
 
‘फ्रोजन फूड’, ‘रेडी टू ईट फूड’, ‘पॅक्ड फूड’ तसेच, ‘कॅन्ड जूस’ इ. सगळे अन्नपदार्थ ‘शिळे’ या ‘कॅटेगरी’त मोडतात. ‘फ्लेवर्ड मिल्क’, ताक, मिठाई अशी ही यादी अमर्याद आहे. सॉस, केचप इ.देखील याच श्रेणीत मोडतात. शिळ्या अन्नामधील एक सध्याचा ‘हीट’ पदार्थ म्हणजे ‘शोर्मा.’ महाविद्यालयीन विद्यार्थी यासाठी रांगा लावून खातात. शिळं अन्न हे तामसिक अन्न आहे. यामुळे शरीरात आळस वाढतो. काही नवीन करण्याची इच्छाच होत नाही. सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही. मरगळ जाणवते. झोपून राहावसे वाटते. मलबद्धता, त्वचा काळवंडणे, पोट फुगणे, वजन वाढणे इ. अन्य लक्षणे हळूहळू उत्पन्न होतात.
 
 
मनुष्याला होणार्‍या आजारांमध्ये चुकीच्या ‘लाईफस्टाईल’मुळे होणार्‍या आजारांचे प्रमाण संक्रमित/ संसर्गजन्य आजारांपेक्षा खूप अधिक आहे. चुकीच्या खानपान, राहणीमानामुळे होणार्‍या आजारांवर मात करायची असेल, तर ‘ती’ चूक सुधारणे महत्त्वाचे आहे. ‘पील-पॉपिंग’ हा त्यावरील उपाय नव्हे. आहारातील नियमितता, व्यायामातील नियमितता, शांत मन (चीडचीड, उद्वीग्न नसलेलं) असणे निरोगी आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
 
 
जसे ऋतू बदलतात, तसा वातावरणात बदल होतो, तो आपल्याला जाणवतो. भारतामध्ये मुख्यत्वे करून तीन ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये तापमानात फरक असतो. दिवस- रात्र यांच्या तासांत बदल होतो. या बदलानुसार आपली वेशभूषा बदलते. उन्हाळ्यात रेनकोट, छत्री वापरत नाही, तर सुती-हलक्या रंगाचे कपडे परिधान करतो. हिवाळ्यात स्वेटर, कानटोपी, हातमोजे-पायमोजे इ. घातले जाते. जसे ऋतुसापेक्ष पेहराव बदलतो, तसाच आहारात बदल अपेक्षित आहे. व्यायामात बदल अपेक्षित आहे. राहणीमान बदलावे. उदा. थंडीत दुपारी झोपणे शास्त्रमान्य नाही, पण उन्हाळ्यात दिवसा झोपावे, असा शास्त्राधार आहे. तसेच एरवी अर्धशक्ती व्यायाम करावा, उन्हाळ्यात त्याहून कमी किंवा टाळावाच, असा शास्त्राधार आहे.
 
 
12 महिने ज्वारी-बाजरी खाणे, केळी-सफरचंद खाणे चुकीचे आहे. मोसमी फळे त्या-त्या मोसमात खावीत. ‘कोल्ड स्टोअरेज’मधली फळे मोठ्या शहरांतून 12 महिने मिळत असली, तरी ती शिळीच आहेत, हे ध्यानात ठेवावे. जशी जिन्नसे बदलावीत, तशी आहारमात्राही बदलावी. उन्हाळ्यात शरीरोष्मा कमी ठेवण्यासाठी विविध सरबते, फळांचा रस, पाणी याचे आपसूक प्रमाण जास्त घेतले जाते, तर थंडीमध्ये तीळगुळ, गुळपोळी, बाजरीची भाकरी खावी, पावसाळ्यात विविध सूप, भाजके पदार्थ, पचायला हलके असे अन्न व व्रतवैकल्ये सांगितली आहेत. याचे कारण 12 महिने आपली पचनशक्ती व प्रतिकारशक्ती तेवढ्याच ताकदीची राहत नाही, टिकत नाही. कमी-जास्त होत असते.
 
 
अशा प्रत्येक ऋतूमध्ये रज:प्रवृत्तीच्या वेळेस अजून शारीरिक श्रम वाढतात. तेव्हा आहार-व्यायाम व आचरणात बदल नक्की करावा. असे केल्याने रज:स्रावाचे प्राकृत वहन होते व नैसर्गिकरित्या नऊ ते पाच दिवसांत ते थांबते. नियमित रज:प्रवृत्ती होण्यास या गोष्टीचा फायदा होतो.
 
 
रज:स्राव होतेवेळी थोडे पचायला हलके अन्न, कमी तिखट-मीठ-मसाला असलेले पदार्थ खावेत. ज्यांना कमी स्राव होतो, त्यांनी पपई खाऊ नये, गाईचे दूध कोमट गरम प्यावे. ज्यांना शांत झोप लागत नाही, खूप स्वप्नं पडतात, मलबद्धतेची तक्रार आहे, अशांनी दूध आणि सूप रात्री घ्यावे. रज:स्रावापूर्वी पाठ, पोट, छाती, कंबर, पाय दुखत असल्यास तेल कोमट करुन हलक्या हाताने लावावे आणि जिरवावे. सूक्ष्म व्यायाम, ‘स्ट्रेचिंग एक्झरसाईज’ कराव्यात आणि सोसेल तितक्या गरम पाण्याने अंघोळ करावी. शिळे अन्न संपूर्णत: टाळावे.
 
 
शरीरात विश्रांती जशी देऊ तशीच मनाला खूप त्रस्त करू नये, चीडचीड भांडण-तंटा, उदासीनता टाळावी, यासाठी श्वसनाचे व्यायाम करावे. दीर्घश्वसनाने मन शांत करण्यास मदत होते. मंद संगीत आणि प्रकाशाने मन:शांती मिळण्यास मदत होते. उतारावरुन गाडी आणताना ‘ब्रेक’ लावून गाडी चालवतो आणि ‘अ‍ॅक्सिलेटर’वरचा पाय काढतो व पुन्हा सपाट रस्त्याला आलो की, सुसाट चालवतो तसेच, मासिक रज:स्रावच्या वेळेस थोड्या क्रिया मंदगतीने दिनचर्चेचे पालन करावे.
 
 
 
 -वैद्य कीर्ती देव
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.