गुरूच्या शब्दाला न्याय देणारा विठ्ठल

16 Sep 2022 22:22:07
VITTHAL MASKE
 
 
संसार, नोकरी आणि परमार्थाची सांगड घालत त्याने घरातील वारकरी संप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. जाणून घेऊया युवा कीर्तनकार उत्कृष्ट मृदुंगवादक ह.भ.प. विठ्ठल गणपत म्हस्के यांच्याविषयी...
 
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या गोठवली गावी विठ्ठल गणपत म्हस्के यांचा जन्म झाला. आई-वडील शेतीत राबत संसाराचा गाडा हाकत होते. शेतीबरोबरच वडील सुतारकाम करून त्याद्वारे घरखर्चाला हातभार लावत होते. वडिलांना वारकरी संप्रदायाची विशेष आवड असल्याने कुठल्याही भजनाला, कीर्तनाला ते मुलगा विठ्ठलला सोबत घेऊन जायचे. हळूहळू विठ्ठललाही वारकरी संप्रदायाची गोडी लागली. चौथीपर्यंतचे शिक्षण गोठवली, तर पुढे सातवीपर्यंतचे शिक्षण पिंपळवाडीतील जि.प. शाळेत घेतले. भाषणकलेत तरबेज असलेल्या विठ्ठलने वडिलांच्या आग्रहास्तव मृदुंग वादनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. दर रविवारी तब्बल २० किमी अंतर प्रवास करत तो सुनील मिस्त्री यांच्याकडून धडे घेत होते.
 
 
निगडेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे शिक्षणासाठी गावाकडे तितक्याशा सुविधा नसल्याने विठ्ठलने शहराचा रस्ता धरला. मोठी बहीण दिपाली कोंडाळकर यांच्या घरी राहत त्याने घाटकोपरमधील रात्र- महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी त्याने दोन हजार पगाराची छोटीशी नोकरी पकडली. जागेच्या अडचणीमुळे बारावीनंतर विठ्ठल बहीण कविता पवार यांच्या घाटकोपरच्या डगलाईन येथील घरी राहू लागला. पुढे शिवाजी टेक्निकल रात्र-महाविद्यालयामध्ये त्याने प्रवेश घेतला.
 
 
नंतर एका बांधकाम व्यावसायिकाकडे सहा हजार रुपये महिना पगारावर नोकरी सुरू केली. येथील डगलाईन परिसरात बहुतांशी लोक वारकरी संप्रदायाशी संबंधित होते. विठ्ठल रोज या परिसरात रात्री काही लोकांना जेवणानंतर सहज गप्पागोष्टी करताना पाहत होता. एके दिवशी विठ्ठलने पुढाकार घेऊन सर्वांशी चर्चा करत एक भजनी मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. सर्वांनी त्याला होकार दिला आणि माऊली भजनी मंडळाची स्थापना झाली. भजन मंडळासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी मंडळाच्या प्रत्येक सदस्याने १५० रुपये जमा केले. यातून जमलेल्या पैशातून मंडळाने एक मृदुंग आणि पाच टाळ विकत घेतले. आठवड्यात किमान तीन दिवस भजनाला सुरुवात झाली.
 
 
सुरुवातीला दहा लोकांपासून सुरू झालेला चमू हळूहळू मोठा होत गेला. हळूहळू भजनी मंडळातील सदस्यांचा सराव आणखी वाढला. नवरात्रोत्सवात जवळच्याच एका मंडळाच्या आग्रहानुसार, या भजनी मंडळाने प्रथमच भजन कार्यक्रम सादर केला आणि परिसरात मंडळ परिचित होत गेले. यादरम्यान, ‘इंटेरिअर क्षेत्रा’संबंधित त्याने काही कोर्स केला आणि एका नामांकित कंपनीत ‘ड्राफ्ट्समन’ म्हणून नोकरी सुरू केली. दरम्यान, गुरू ह.भ.प. सीताराम स्वामी शेडगे बाबा यांच्या दरबारात अनेकदा विठ्ठल मृदुंग वाजवण्याची सेवा देत होता.
 
 
२०१८ साली शेडगे बाबांनी ‘विठ्ठल, तुला कीर्तनकार झालेले मला पाहायचे आहे,’ अशी जाहीर इच्छा व्यक्त करत त्यांना स्वतः भेट म्हणून मिळालेली ज्ञानेश्वरी विठ्ठलला दिली. गुरूचा शब्द अंतिम मानायचा असतो आणि पूर्ण करायचा असतो असे विठ्ठलला त्यांच्या वडिलांनी सांगितले आणि मग सुरू झाला मृदुंग वाजवण्यापासून ते कीर्तनकार होण्यापर्यंतचा प्रवास. बाबांनी दिलेल्या ‘ज्ञानेश्वरी’सह ‘तुकाराम गाथा’, ‘रामायण’ यांसारखे अनेक धार्मिक ग्रंथ विठ्ठल वाचू लागला. कीर्तने ऐकू लागला.
 
 
पुढे शेडगे बाबांनीच २०१९ साली शिवजयंतीला त्याला दरबारात कीर्तनाची संधी दिली खरी पण बाबा आजारी पडल्याने ती संधी हुकली. कोरोनाचे वातावरण निवळले आणि पुन्हा नोकरीवर रूजू होण्यासाठी तो पुन्हा घाटकोपरला परतला. याचवर्षी त्याने मार्च महिन्यात गावातच कीर्तनाची सेवा दिली. यानंतर त्याने आतापर्यंत अनेक ठिकाणी कीर्तनाची सेवा दिली आहे. विशेष म्हणजे, १० ते ६ पर्यंतची नोकरी सांभाळून विठ्ठल कीर्तनाची सेवा देतो तसेच भजनाला जातो.
 
 
सीताराम गुरूंचा कृपाआशीर्वाद, आई तोलाबाई, वडील गणपत यांचे मार्गदर्शन यांसह विठ्ठलला लहू पवार, विठ्ठल उतेकर, संदीप उतेकर, जनार्दन साळेकर, निलेश सकपाळ यांचे सहकार्य लाभते. सीताराम बाबांचे पुत्र उमेश दादा शेडगे यांनी गुरू गेल्यानंतर मला मार्गदर्शन केले. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी गुरू गरजेचा असतो, असे विठ्ठल सांगतात.
 
 
वारकरी संप्रदायाची आवड जोपासत असताना पत्नी नंदा होमगार्डची नोकरी सांभाळत सहकार्य करते. आणखी खूप काही शिकायचे आहे. आधी स्वतः ज्ञान मिळवावं लागते, मग ते दुसर्यांना देता येते. परमार्थात आनंद आहे. घरापासून दूर राहताना अनेक गोष्टींची पदरमोड करावी लागते. ‘आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ’ असे माऊलींनी सांगितले आहे, तीच गोष्ट ध्यांनी ठेवून वाटचाल करत असल्याचे विठ्ठल सांगतो. एकीकडे संसार, नोकरी आणि परमार्थ अशा तीनही गोष्टींची सांगड घालत विठ्ठलने घरातील वारकरी संप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. त्याला आगामी वाटचालासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा....
 
 
Powered By Sangraha 9.0