मुंबई: यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट की शिंदे गट? कोणाला परवानगी द्यावी? असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच आता दसरा मेळाव्याप्रकरणी महापालिका प्रशासन आपल्या विधी विभागाचा सल्ला घेण्याच्या विचारात आहे. भविष्यात हे प्रकरण न्यायालयात गेल्यास आपली बाजू सुरक्षित राहावी यादृष्टीने महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे त्याची महापालिकेकडून छाननी सुरु आहे. परंतु नेमकी कोणाला परवानगी द्यावी याबाबत महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
परवानगी मिळवण्यासाठी दोन्ही गट आग्रही असताना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर १५ सप्टेंबर रोजी, रात्री अचानक महापालिका जी नॉर्थ ऑफिसमध्ये पोहोचले. यावेळी सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे देखील कार्यालयात हजर झाले होते. शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.
दरम्यान, ठाकरे गटाकडून देखील परवानगी मागण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरु केला आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे.