सप्तपदी : सुखी जीवनाची सात स्वर्णिम उद्दिष्टे!

    14-Sep-2022
Total Views |
sapatapadi
 
इष एकपदी भव।
ऊर्जे द्विपदी भव।
रायस्पोषाय त्रिपदी भव।
मयोभवाय चतुष्पदी भव।
प्रजाभ्य: पञ्चपदी भव।
ऋतुभ्य: षट्पदी भव।
सखा सप्तपदी भव।
सा मामनुव्रता भव विष्णुस्त्वा नयतु
पुत्रान् विन्दावहै बहूंस्ते सन्तु जरदष्टय:॥
(पारस्कर गृह्यसूत्र -१/७/१९)
 
 
अन्वयार्थ
 
हे देवी! (इषे) अन्न इत्यादींच्या प्राप्तीसाठी तू (एकपदी भव) पहिले पाऊल टाकणारी हो. (ऊर्जे) बलप्राप्तीकरिता (द्विपदी भव) दुसरे पाऊल टाकणारी हो. (राय: पोषाय) धनाच्या समृद्धीसाठी (त्रिपदी भव) तिसरे पाऊल टाकणारी हो. (मयोभवाय) सुख-समृद्धीसाठी (चतुष्पदी भव) चौथे पाऊल टाकणारी हो. (प्रजाभ्य:) आदर्श संततीच्या प्राप्ती व पालनासाठी (पंचपदी भव) पाचवे पाऊल टाकणारी हो. (ऋतुभ्य:) सहा ऋतूंच्या अनुकूल व्यवहार संपादनासाठी (षट्पदी भव) सहावे पाऊल टाकणारी हो. (सखे) मैत्रीपूर्ण व्यवहारासाठी (सप्तपदी भव) सातवे पाऊल टाकणारी हो. (सा) अशी ती तू (माम्) माझ्या समवेत (अनुव्रता) अनुकूल चालणारी (भव) हो. (विष्णु:) सर्वव्यापक परमेश्वर (त्वा) तुला (आ नयतु) चांगल्या प्रकारे प्राप्त होवो. आपण दोघे मिळून (बहुन् पुत्रान्) बहु प्रमाणातील बुद्धिमान व गुणवान पुत्र-पुत्रींना (विन्दावहै) मिळवोत आणि (ते) ती सर्व मुले - मुली (जरदष्टय:) वृद्धापकाळापर्यंत जीवन जगणारी, चिरायुषी (सन्तु) ठरोत.
 
 
विवेचन
 
सप्तपदी चालण्यासाठी तत्पर असलेल्या वधू- वरांना फार मोठे लक्ष गाठावयाचे आहे. सात पावले म्हणजे जणू काही जीवनाची सात सोनेरी उद्दिष्टेच. यातील एकेक उद्दिष्ट हे तितकेच महत्त्वाचे असून पहिल्यापेक्षा पुढचे श्रेष्ठतर आहे. दोघांही वर-वधूंना सप्तपदीच्या प्रत्येक पायरीवर सावधपणे पाऊल ठेवत गृहस्थाश्रमाचे यशोशिखर गाठावयाचे आहे. ही सात पावले कशाकशासाठी आहेत? याची जाणीव वधू-वरांनी हृदयी बाळगत सात कर्तव्यांना नेहमी आचरणात आणावयाचे आहे. यामुळे केवळ या नूतन पती-पत्नींचेच व्यक्तिगत हित साधणार आहे, असे नव्हे, तर आपले कुटुंब, समाज व राष्ट्राचीदेखील उन्नतीदेखील होणार आहे.
 
 
थोडक्यात म्हणजे, सप्तपदी ही व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही गोष्टी मिळवून देणारी आहे. वर हा वधूस ‘मा सव्येन दक्षिणम् अतिक्राम!’ म्हणजेच चालताना डाव्या पायाने उजव्या पायाचे उल्लंघन करू नकोस, नेहमीच उजवे पाऊल पुढे ठेवत राहा, अशी सूचना देत मंत्राद्वारे एकेक पाऊल पुढे उचलण्याची सूचनाच करतोय. प्रत्येक पावलासोबत उच्चारला जाणारा एक-एक मंत्रांश उभयतांच्या भावी आयुष्याला सर्वार्थाने उन्नत करणार्या ज्ञानतत्त्वांचा बोध करून देणारा आहे. खरेतर सप्तपदी हा प्रसंग गृहस्थाश्रमाच्या संपूर्ण सफलतेचा व आदर्श समाज निर्मितीसाठी आवश्यक असणारा सात कलमी कार्यक्रम होय. पारस्कर गृह्यसूत्रात वर्णिलेल्या या विशाल मंत्रांशाचा आशय वधू-वरांना त्यांचे जीवन चढत्या क्रमाने विकासाभिमुख बनवणारा ठरतो. यासाठीच आता वधू-वर दोघेही समानतेने चालण्यासाठी तत्पर झाले आहेत.
 
 
 
प्रत्येक मंत्रांशातील पहिल्या शब्दात चतुर्थी विभक्तीचे एकवचन आले आहे. ’संप्रदाने चतुर्थी’ या व्याकरण सूत्राप्रमाणे एखादी वस्तू इतरांना दान करण्यासाठी असते, तिथे चतुर्थीचा ‘साठी’/‘करिता’ या अर्थाने वापर केला जातो. प्रत्येक पहिल्या शब्दातून ’साठी किंवा करिता’ असा शब्दार्थ होतो आणि त्यांपुढे पुढे एकपदी, द्विपदी, त्रिपदी, चतुष्पदी, पंचपदी, षट्पदी व शेवटी सप्तपदी हे द्विगू सामासिक शब्द व त्यापुढे आज्ञार्थी ’भव!’ असा आदेशवजा सूचना देणारा ठरतो. या सात पावलांचे विश्लेषण आपण पाहूया !
 
 
 
१) इष एकपदी भव।
 
हे देवी, अन्नधान्याच्या प्राप्तीसाठी तू पहिले पाऊल टाकणारी हो. ‘इष’ म्हणजेच अन्नादी पदार्थ. ‘इष’ या शब्दाचे अन्न, धन, विज्ञान, इच्छाप्राप्ती असे विविध अर्थ होतात. असे असले तरी अन्न ही मानवी जीवनाची सर्वात प्रथम गरज असल्याकारणाने इथे ’इष’ या शब्दाचा अर्थ अन्न हाच घेणे संयुक्त ठरते. ज्या घरात अन्नबाहुल्य असते, ते घर सुखी मानले जाते. घरी अन्नच नसेल, तर घरातील सदस्य जगतील कसे? अन्नाविना ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या रोगी होणार, यात शंकाच नाही. पती-पत्नीचे पहिले कर्तव्य हेच की, त्यांनी अन्नप्राप्तीसाठी प्रयत्न करावा. अन्नामुळेच माणसाच्या सर्व समस्या दूर होतात. खाण्यास अन्न नसेल, तर माणूस सतत चिंताग्रस्त होतो. कितीही चांगली बुद्धी असली, तरी पोटात अन्नाचा कण नसेल तर ती चालणार तरी कशी? रिकाम्या पोटी तत्त्वज्ञान काहीच कामाचे नसते.
 
 
म्हणून घरात भरपूर प्रमाणात अन्न असावे. तेही नानाविध प्रकारचे. समजा, जर अन्नधान्य विपुल प्रमाणात असेल, तर त्यांचे रक्षण व संवर्धन करावे. शास्त्रात अन्नो वै परब्रह्म। अन्नं न निन्द्यात्। अशी वचने आली आहेत. अन्न हे खर्या अर्थाने आमचे दैवत आहे. व्यर्थपणे ते वाया जाता नये. तसेच ज्याद्वारे आम्हा सर्वांचे शरीर सर्वदृष्टीने बलसंपन्न होते, ते अन्न सात्त्विक, शुद्ध व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. राजसिक व तामसिक आहाराचे सेवन कदापि होता कामा नये. कारण, सात्त्विक व उत्तम आहार घेतल्याने मन व बुद्धी पवित्र बनते. यासाठीच नवदाम्पत्याने सप्तपदीचे पहिले पाऊल हे अन्नाच्या प्राप्तीसाठी, रक्षणासाठी व संवर्धनासाठी आहे, याचे भान ठेवावे.
 
 
२)ऊर्जे द्विपदी भव।
 
हे देवी, शारीरिक व आत्मिक बळासाठी तू दुसरे पाऊल उचल. पहिल्या पावलात वधू-वरांनी विविध प्रकारच्या अन्नधान्याने समृद्ध होण्याचा संकल्प केला आहे, तो मुळातच आपले शरीर सुदृढ होऊन सर्व प्रकारचे बळ प्राप्त व्हावे, यासाठी! आता हे दुसरे पाऊल सर्व प्रकारची ऊर्जा मिळण्यासाठी. म्हणजेच ते शारीरिक, मानसिक व आत्मिकदृष्ट्या सुविकसित होण्यासाठी आहे. कितीही चांगल्या प्रकारचे अन्न मिळाले, तरी ते पचवण्याचे सामर्थ्य वाढण्यासाठी शारीरिक व्यायामाची गरज भासते. म्हणून पती-पत्नींनी दररोज सकाळी व्यायाम व योगासनांचे अनुष्ठान केलेच पाहिजे. तसेच आत्मिकदृष्ट्या बलवान होण्याकरिता ईश्वराची उपासना किंवा ध्यान करणे इष्ट ठरते. रोगी व बलहीन दाम्पत्य स्वतःबरोबरच कुटुंबासाठीही त्रासदायक ठरतात. म्हणून दाम्पत्याने ऊर्जावान होण्याकरिता उचललेले दुसरे पाऊल मोलाचे ठरते.
 
 
३) रायस्पोषाय त्रिपदी भव।
 
हे देवी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी तू तिसरे पाऊल टाकणारी हो. आपल्या कुटुंबात खर्या अर्थाने सुख-शांती नांदावयाची असेल, तर विपुल प्रमाणात घरी धनधान्य असावे. आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी व लोक व्यवहाराकरिता धनाची तितकीच गरज आहे. धनाच्या अभावी माणूस कोणतेच कार्य करू शकत नाही. परोपकार, इतरांना मदत किंवा दानधर्म इत्यादी सत्कर्मे करावयाची असतील, तर थोडेफार का असेना, पण धन लागतेच. रिकाम्या हाताने धर्मकर्म होऊच शकत नाही. यासाठीच नीतिकारांनी म्हटले आहे- ‘धनात् धर्म: तत: सुखम्!’ धनाच्याच माध्यमाने माणूस धार्मिक कामे करू शकतो व शेवटी त्याला सुख मिळते.
 
 
४) मयोभवाय चतुष्पदी भव।
 
हे देवी, मानसिक व आत्मिक सुखासाठी तू चौथे पाऊल उचल. मयोभव म्हणजेच सुख, पण ते मानसिक व आत्मिक स्तरावरचे. माणसाला अन्न मिळाले, सर्वदृष्टीने तो शक्तिसंपन्न झाला आणि विविध प्रकारचे धनदेखील लाभले, पण अंतःकरणातून मात्र जर काय तो नेहमीच दुःखी असेल किंवा मानसिकदृष्ट्या असमाधानी असेल, तर या सर्व वरील तिन्ही बाबी मिळूनही तो दुःखीच राहणार. यासाठी नवे यजमान दाम्पत्य मानसिक व आत्मिक सुखासाठी चौथे पाऊल उचलतात.
 
 
५) प्रजाभ्य: पंचपदी भव। 
 
हे देवी, आदर्श व उत्तम संततीसाठी तू पाचवे पाऊल टाकणारी हो. विवाहाचा मूलभूत उद्देश आदर्श संतती निर्माण करणे होय. केवळ भोगविलासात रममाण होणे कदापि नव्हे. इतर पशुपक्ष्यांपमाणे जर मानवाने या गृहस्थ जीवनाला शारीरिक कामवासनेचे अथवा ऐंद्रिक उपभोगाचे साधन समजले, तर त्याचे दुष्परिणाम म्हणजेच वाईट संतती! यामुळे पिढ्यान् पिढ्या माणसाला दुःख भोगावे लागतात. कारण, अविचारी, रोगी, बुद्धिहीन व वाईट प्रवृत्तीची मुले ही आपल्या कुटुंबासह समाज व राष्ट्राकरितादेखील हानिकारक ठरतात. म्हणूनच नवदाम्पत्याने भोगविषयात लिप्त न होता सद्गुणसंपन्न अशा सुप्रजेला जन्माला घालण्यासाठी तत्पर असावे.
 
 
६) ऋतुभ्य: षट्पदी भव।
 
हे देवी, ऋतुकाळानुसार आरोग्याच्या रक्षणासाठी व नियमित दिनचर्येसाठी तू सहावे पाऊल उचल. निसर्गातील सहाही ऋतू हे अगदी वेळेवर असतात. ते कधीही मागे पुढे होत नाहीत. वर्षभरात वसंत (चैत्र-वैशाख), ग्रीष्म (ज्येष्ठ-आषाढ), वर्षा (श्रावण-भाद्रपद), शरद (अश्विन- कार्तिक) हेमंत (मार्गशीर्ष-पौष), शिशिर (माघ- फाल्गुन) हे सहाही ऋतू त्या त्या महिन्याप्रमाणे कार्यरत असतात. गृहस्थाश्रमी दाम्पत्यानेदेखील आपली सर्व कामे वेळेवर करावीत. कोणत्याही कामांना विलंब लावता कामा नये. सतत नियमांचे पालन करावे. ऋतुकाळाप्रमाणे योग्य आहार-विहार करीत आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच निसर्गात घडणार्या बदलांप्रमाणे वात-पित्त-कफ या त्रिदोषयुक्त प्रकृतीनुसार अनुकूल आहार ठेवावा. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
 
 
७) सखे सप्तपदी भव।
 
हे देवी, मैत्रीपूर्ण व्यवहारासाठी तू सातवे पाऊल उचल. विवाह झाल्यानंतर पती-पत्नी हे दोघे एक दुसर्यांचे जिवलग मित्र बनतात. या पुढील त्यांचा व्यवहार हा खर्या अर्थाने मैत्रीपूर्ण असेल. सुभाषितकारांनी म्हटले आहे- ’नास्ति भार्यासमो बन्धु:।’ पत्नीसारखा दुसरा बंधू अथवा मित्र नाही. तसेच ’भार्या श्रेष्ठतम: सखा।’ म्हणजेच पत्नी ही सर्वात श्रेष्ठ मित्र होय. तसेच पतीदेखील पत्नीसाठी प्रिय सखा बनतो. मित्रत्वाची विशेषता आहे की, एक मित्र दुसर्या मित्राला कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाही. सुखाचे प्रसंग असो की दुःखाचे. एक जिवलग उत्तम मित्र बनून एक दुसर्यांना सावरायचे. सुख आणि दुःख हे दोन्ही आपापसात वाटून घ्यायचे. एक दुसर्यास विश्वासात घेऊनच प्रेमपूर्ण व्यवहार करावयाचा. संशयकल्लोळ कधीही निर्माण करावयाचे नाही. एक दुसर्याप्रति समर्पणाची, त्यागाची व बलिदानाची भावना ठेवणे, हाच खरंतर मैत्रीपूर्ण व्यवहार होय. प्रत्येक प्रसंगात आपल्या मित्राची काळजी करणे, सुख-दुःखाच्या संघात एक दुसर्याचे वाटेकरी होणे, हाच तर या सातव्या पावलाचा संदेश आहे.
 
 
या सातही बाबींचे अंत:करणपूर्वक पालन करीत दोघांनीही जीवनभर आनंदाने राहावे. यातच खर्या अर्थाने गृहस्थाश्रमाची सफलता दडली आहे. असा हा वैदिक विवाहातील सप्तपदीचा उदात्त व सर्वोत्तम असा संदेश आजच्या नवदाम्पत्यासाठी दिशादर्शक करणारा व त्यांचे वैवाहिक जीवन सफल बनवणारा आहे.
 
 
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य