सांगली: मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून साधूंना मारहाण केल्याची घटना सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावात घडली आहे. सांगली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी चारही साधूंना मारहाण केली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करून साधूंना नागरिकांच्या तावडीतून सोडवलं. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. ही घटना मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी, दुपारच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान रस्त्यात गाडी थांबवून विजापूर हा रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा एका विद्यार्थीनीस केली असता, मुलं चोरणारी टोळी समजून चारही साधूंना गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण केली.
"साधूंना झालेल्या मारहाणीची घटना निषेधार्य आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेवर लक्ष्य ठेऊन आहेत. राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. त्यामुळे समाज कंटकांना निश्चितच अद्दल घडेल. सांगली पोलिसांनी या प्रकरणावर गुन्हा दाखल केला आहे. ६ जणांना अटक झाली आणि अजून १०-१५ जणांना अटक होणार आणि कठोर शिक्षा होईल."
- आचार्य तुषार भोसले , भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख
सांगलीमध्ये साधुसंतांना झालेल्या मारहाणीचा प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार. हे बदललेलं सरकार आहे. हे फेसबुक लाईव्हवाल सरकार नाही. पालघरमध्ये साधूंवर जो अन्याय झाला, तसा अन्याय या वर्तमान सरकारवर होणार नाही. ही संतांची भूमी आहे. इथे त्यांच्यावरच मारहाण, हे खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात असे काही घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाईल, व दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- राम कदम, भाजप महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य