नवी दिल्ली : फ्रेंच न्यू वेव्ह सिनेमाचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे चित्रपट दिग्दर्शक जीन-लुक गोदार्द यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी १३ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले. गोदार्द यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्या निधनाची माहिती माध्यमांना दिली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 'ब्रेथलेस' आणि 'कंटेम्प्ट' सारख्या क्लासिक्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या गोदार्द यांनी फ्रेंच न्यू वेव्हद्वारे जागतिक सिनेमाला हादरवून सोडले.
जागतिक सिनेमांचे शौकीन किंवा अभ्यासकांसाठी जीन-लूक गोदार्द हे नाव नवीन नाही. त्याच्या चित्रपटांनी १९६० मध्ये फ्रेंच सिनेमाच्या प्रस्थापित नियमांना तोडले आणि त्यांनी हँडहेल्ड कॅमेरा वर्क, जंप कट आणि अस्तित्ववादासह चित्रपट निर्मितीच्या नवीन लाटेची सुरुवात केली.
गोदार्द यांचा जन्म एका श्रीमंत फ्रँको-स्विस कुटुंबात ३ डिसेंबर १९३० रोजी पॅरिसमध्ये झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई एका श्रीमंत बँकर कुटुंबातून होती. त्यांचे चित्रपट प्रामुख्याने अस्तित्ववाद, मार्क्सवाद आणि मानवी भावविश्वाचा वेध घेणारे आहेत. पॅरीसच्या लिसी बफोन या शाळेत शिकायला गेलेले गोदार्द गणिताच्या अभ्यासापेक्षा सिनेमांमध्येच जास्त रमले. त्यावेळी शालेय अभ्यासात नापास होणाऱ्या या मुलाने, पुढे जागतिक सिनेमांमध्ये क्रांती घडवून आणली.
२०१० साली त्यांना जगभरातील चित्रपट सृष्टीचा सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा 'ऑस्कर' पुरस्काराने गौरवण्यात आले. परंतु तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते अमेरिकेला गेले नाहीत. गोदार्द यांनी मार्टिन स्कॉर्सेस आणि क्वेंटिन टॅरँटिनो यांच्या सारख्या अनेक महत्वाच्या दिग्दर्शकांना प्रेरणा दिली. अशा या महान चित्रपट दिग्दर्शकाने आज अखेरचा श्वास घेतला.
प्रसाद थोरवे