मुंबई: श्रीलंकेने दुबई येथे ११ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यातच, श्रीलंकेवर कौतुकाचा वर्षाव सुरु असताना भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही ट्विटर च्या माध्यमातून श्रीलंकेचे तोंडभर कौतुक केले आहे.
“श्रीलंकेच्या विजयामुळे मला फार आनंद झाला आहे. मात्र पाकिस्तानचा पराभव व्हावा असं मला वाटत असल्याने हा आनंद झालेला नाही. तर श्रीलंकेचा विजय हा आपल्याला आठवण करुन देणार आहे की सांघिक खेळ हे सेलिब्रिटी खेळाडू किंवा सुपरस्टार्सबद्दल नसतात तर ते सांघिक योगदानाबद्दल आणि कौशल्याबद्दल म्हणजेच टीम वर्कबद्दल असतात,” असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.
भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव झाल्याने भारतीयांनी आनंद साजरा करत असताना आनंद महिंद्रांनी मात्र पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद झाला नसल्याचं म्हटलं आहे.