काँग्रेसचा मोक्षदाता

11 Sep 2022 20:46:20
 
rg
 
 
 
"जिझस देव आहे का?” असे राहुल गांधी यांनी रोमन कॅथलिक पाद्री जॉर्ज पोनैयाला विचारले. यावर पोनैया म्हणाला, “जिझस हाच ईश्वर असून तो इतर शक्तींसारखा (म्हणजे हिंदू देवतांसारखा) नाही.” थोडक्यात, जिझसशिवाय कुणी ईश्वर नाही. तेव्हा पोनैयाने ब्रह्मज्ञान सांगितले, अशा आविर्भावात राहुल गांधी ऐकत होते. यावर भारतातील बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धा आणि भावना दुखवून राहुल गांधी भारत कसे काय जोडत आहेत, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
 
 
पण जरा विचार केल्यावर वाटते की, कॅथलिक आई असणार्‍या राहुल यांना जिझस ईश्वर आहे का? या प्रश्नावर पाद्री पोनैया काय उत्तर देणार हे माहिती नसेल? तसेही राजकीय अतिमहत्त्वाच्या व्यक्तीने कुणाला काय प्रश्न विचारायचे आणि समोरच्याने काय उत्तर द्यायचे, हेसुद्धा आधीच ठरलेले असते. त्यामुळे ‘भारत जोडो’ का तोडो यात्रेतला राहुल गांधी आणि पोनैया यांचा संवाद हा उत्स्फूर्त असूच शकत नाही. मग प्रश्न असा पडतो की, ‘भारत जोडो’ यात्रेच्या आड राहुल यांनी पोनैया याच्याशी हिंदू देवशक्तींना नाकारणारा संवाद का केला?
 
 
तर स्पष्ट आहे की, राहुल गांधी यांना देशभरातील उरल्यासुरल्या काँग्रेसी अनुयायांना मूक संदेश द्यायचा होता. तो असा की, जिझसशिवाय कुणी देव नाही, हे मी पाद्रींकडून शांतपणे ऐकले आणि मूक समर्थन दिले. त्यामुळे तुम्हीही जिझसशिवाय कुणी देव नाही, याचे समर्थन करायला हवे. त्याचप्रमाणे आजही देशात वस्तीपातळीवरएक विद्रोही गट समाजात हिंदूविरोधी भावना पसरवतो. हिंदू देव-देवतांना नाकारण्याची प्रवृत्ती निर्माण करणे, हे त्यांचे काम असते. राहुल गांधींनी पोनैयाच्या तोंडून शक्ती वगैरे काही नसते, अर्थात, देव नसतात हे वदवून त्या तमाम समाजविघातक धर्मद्वेष्ट्या विद्रोह्यांना समर्थन दिले.
 
 
हे तेच राहुल गांधी आहेत, जे जानवं वगैरे घालून स्वत:ला खरे ब्राह्मण घोषित करतात आणि म्हणतात की, लोक देवळात मुलींना छेडायला जातात, तसेच त्यांना ‘भगवा दहशतवाद’ची भीती वाटते. यावर काही नतद्रष्टांचे म्हणणे आहे की, राहुल यांनी पाद्री पोनैयाला विचारायचे होते की, काँग्रेसला देशातून हद्दपार करण्यासाठी मला अजून काय करावे लागेल? मी खरेच काँगेसपक्षाचा मुक्तिदाता आहे का? असो. राहुल हेच काँग्रेसला मोक्ष देतील, हे मात्र नक्की!
 
 
साहेब, थांबायचे काय घ्याल?
 
 
 
पूर्वीसुद्धा मराठ्यांनी दिल्लीला आव्हान दिले होते, आजही आम्ही आव्हान देत आहोत, असे आपले महाराष्ट्रातल्या साडेतीन जिल्ह्यांतच जेरीस आलेले शरद पवार म्हणाले. त्यांनी म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांचाही दाखला दिला की, “छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की, दिल्लीसमोर झुकायचे नाही.” सतत शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत त्यांच्या विरोधी विचारांनीच वागण्याची ज्यांची हयात गेली आणि ज्यांना कायम वाटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले, तर आपले मुस्लीम मतदार रागावतील त्यांना आता छत्रपती शिवाजी महाराज आठवायला लागले आहेत. शरद पवार आता दिल्लीपुढे झुकणार नाहीत, असे म्हणत आहेत. यावर जाणकार म्हणत आहेत, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ वगैरे हे संतवचन तुम्हा-आम्हासाठी. शिवसेनेच्या गटात घुसून आपले सर्व मनसुबे पूर्ण करणार्‍या पवारांसाठी हे संतवचन थोडीच आहे.
 
 
असो. दिल्लीत राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अधिवेशन आहे. शरद पवार हेच आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. अर्थात, ते अध्यक्ष होणार किंवा यांची कन्या किंवा पुतणे किंवा नातवंडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणार, हे उघड सत्य आहे. अगदी वैश्विक नियमच आहे. मात्र, अध्यक्ष झालेले शरद पवार यांना जे काही आहे, ते आपले महत्त्व कायम ठेवावे लागणारच. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाबद्दल काहीतरी बोलणे हे ओघाने आले. त्यासाठी अल्पसंख्याक समाजासाठी गळा काढणे आणि तोंडी लावणे म्हणून शेतकर्‍यांचे प्रश्न आळवणे ओघानेच आले. या सगळ्यांमध्ये पीएच.डी केलेले शरद पवार आताही तेच करतात, यात नवीन काही नाही.
 
 
मात्र, शरद पवार हे विसरलेत की, त्यांनी सत्तास्थानी राहण्यासाठी जे काही राजकारण केले, तो काळ आता बदलला आहे. तो काळही राहिला नाही आणि ज्यांच्या डोक्यात काहीही खोटेनाटे, पण स्वत:च्या फायद्याचे भरवावे, असे महाराष्ट्रात लोकही राहिले नाहीत. काय करणार? असो. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाटते की, ज्या वयात आराम करायचा, तणाव न घेता खूश राहायचे, त्या वयात शरद पवारांना असे वणवण का फिरावे लागते? सर्व सुख हात जोडून उभे असताना सत्ता मिळवणे इतके गरजेचे आहे का? साहेबांना घरातले कुणी थांबवत नाहीत, पण साहेबांच्या शुभेच्छुकांनी तरी सांगावे की साहेब, बस्स झाले आराम करा. दुसर्‍यांनाही संधी द्या!
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0