मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बिंदास काव्या ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. बेपत्ता होताच काव्याच्या आईने एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता. त्यानंतर अधिक चर्चेत आलेली काव्या २४ तास उलटून जाण्यापूर्वीच सापडली आहे.
अभ्यासाच्या कारणावरून काव्या आणि तिच्या आई-वडिलांचे भांडण झाले होते. आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने रागाच्या भरात निघून गेलेली काव्या ही मनमाडहून थेट लखनऊकडे निघाली होती. दरम्यान, मध्य प्रदेशातील इटारसी येथे आली असता ती पोलिसांना सापडली. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरहून मनमाड आणि तेथून थेट लखनऊकडे जाण्याचा तिचा मानस होता. मात्र, ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती इटारसी येथील पोलिसांना मिळाली होती.
याबाबत या मुलीच्या आईने १९ मिनिटाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा असे आवाहन केले होते. आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला होता. पण, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काही तासातच काव्याला शोधून काढले.