मराठीमध्ये सावरकरांवर आजपर्यंत शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. प्रौढ व्यक्तींसाठी म्हणून त्यांची जी चरित्रे लिहिली गेली आहेत, त्यांची संख्या 60 पेक्षा अधिक आहे, तर बालगोपाळांसाठी सुमारे 14 चरित्रे आहेत. त्यांच्या इतर पैलूंबाबत, विचारांबाबत अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. मी सुमारे 40 वर्षांपासून सावरकर चरित्राचा आणि साहित्याचा थोडाफार अभ्यास करत आहे. त्या अनुभवाच्या आधारे मी असं म्हणू शकतो की, आपण सावरकरविषयक वाचनाची सुरुवात धनंजय कीर यांनी लिहिलेल्या ‘स्वा. सावरकर’या शीर्षकाच्या चरित्रापासून केली पाहिजे.
नवीन पिढीला धनंजय कीर हे नाव माहीत असण्याची शक्यता फार कमी आहे. कीर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लेखन करणारे एक नामवंत चरित्रकार होते. चांगला चरित्रकार कोण, तर जो तटस्थपणे लेखन करतो तो. कीर हे असे चरित्रकार होते. सावरकरांच्या बाबतीत सतत जे वाद निर्माण केले जातात, त्यासंदर्भात तर धनंजय कीर यांचे हे तटस्थ असणं फार महत्त्वाचं ठरते. त्यांनी केवळ सावरकरांचे चरित्र लिहिलेलं नाही तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, शाहू छत्रपती, लोकमान्य टिळक अशा अनेक महापुरुषांची चरित्रे मराठी, इंग्रजी भाषेत लिहिली आहेत आणि ती अतिशय मान्यता पावलेली आहेत. भक्कम पुरावा असल्याशिवाय कोणतेही विधान करायचं नाही, हा त्यांचा बाणा होता. त्यामुळे एक विश्वासार्ह चरित्रकार असा नावलौकिक त्यांनी मिळवलेला होता.
कीर यांनी सावरकर चरित्र पहिल्यांदा लिहिलं ते इंग्रजीत. ते साल होतं 1950. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, या चरित्राचे हस्तलिखित खुद्द सावरकरांनी वाचलेलं होतं. त्यामुळं त्यात आलेली माहिती इतिहासाशी इमान राखणारी होती. या चरित्राची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याची वेळ आली तेव्हा स्वत: सावरकरांनी अनेक मूळ कागदपत्रं, पत्रव्यवहार आणि पुरावे लेखकाला उपलब्ध करून दिले होते. त्याआधारे ही आवृत्ती अद्ययावत करण्यात आली होती. हे चरित्र इंग्रजीत आहे याचा एक फार मोठा फायदा सध्याच्या परिस्थितीत होऊ शकतो. अलीकडच्या काळात दिसून आलेली एक चांगली गोष्ट म्हणजे, तरुण पिढीमध्ये सावरकर या व्यक्तीबद्दल मोठं आकर्षण निर्माण झालं आहे. पण, ही पिढी मुख्यत: इंग्रजी माध्यमात शिकलेली आहे. त्यामुळे यातले बहुसंख्य तरुण-तरुणी मराठी वाचन करत नाहीत. साहजिकपणे त्यांच्यासाठी हे इंग्रजीतलं चरित्र खूपच उपयुक्त ठरणार आहे.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद 1972 साली ‘पॉप्युलर प्रकाशन’ या संस्थेतर्फे प्रसिद्ध झाला. नामवंत मराठी लेखक द. पां. खांबेटे यांनी केलेला हा अनुवाद इतका सुंदर आहे की तो अनुवाद वाटतच नाही. 2008 मध्ये या चरित्राची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. त्यात काही परिशिष्टे समाविष्ट करण्यात आली. उदा. सावरकरांचा तपशीलवार जीवनपट, त्यांची साहित्यसंपदा, त्यांच्यासंबंधी लिहिली गेलेली काही पुस्तकं अशी अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आल्यानं या ग्रंथाचे संदर्भमूल्य खूपच वाढले आहे. त्याशिवाय सावरकरांची अनेक नवी छायाचित्रेसुद्धा समाविष्ट करण्यात आल्याने पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे.
या पुस्तकात असलेल्या काही प्रकरणांना दिलेली ही शीर्षके पाहा- ‘रोमांचकारी उड्डाण आणि अभियोग’, ‘अंदमानच्या अंधेरीत’, ‘प्रतिभेची रानफुले’, ‘यमपुरीतून सुटका’, ‘गांधी-जिनांवर टीका प्रहार’, ‘हिंदुत्वाची विचार प्रणाली’ इत्यादी. या पुस्तकात एकूण 28 प्रकरणे असून त्या त्या प्रकरणानुसार संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे. या यादीवर नुसती नजर टाकली तरी धनंजय कीर यांनी केलेल्या व्यासंगाची (पुसटशी!) कल्पना येते. पुस्तक 595 पानांचं आहे. पण, या आकड्याने तुम्ही बिचकून जाऊ नका. सावरकर अष्टपैलू नव्हे, तर शतपैलू होते. त्यांचं जीवन भव्य दिव्य होतं; मग अशा व्यक्तीचा चरित्र-ग्रंथसुद्धा मोठाच असणार हे स्वाभाविकच नव्हे काय?
जाता जाता एक माहिती. मुंबईमध्ये दादर येथे सावरकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आलं आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. या संस्थेच्या संकेतस्थळावर सावरकरांनी स्वत: लिहिलेली अनेक पुस्तकं ‘पीडीएफ’स्वरूपात उपलब्ध आहेत. आपण ती विनामूल्य डाऊनलोड करून घेऊ शकतो. काही पुस्तकांचे इंग्रजी आणि हिंदी अनुवादही तेथे उपलब्ध आहेत.
-डॉ. गिरीश पिंपळे