मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर अनेकदा अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषेत टीका केली. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन नार्वेकर कुटुंबियांची भेट घेतली व गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मिलिंद नार्वेकर यांनी गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय वर्तुळातील मानले जातात. सध्या शिवसेना कोणाची हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर निशाणा साधला जातो. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले मिलिंद नार्वेकर यांच्या घरी एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते आपल्या समर्थक आमदारांना घेवून सूरतमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू नेते मिलिंद नार्वेकर यांना सूरतला पाठवलं होतं. मिलिंद नार्वेकर यांनी त्यावेळी सूरत येथे जावून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. सुरत येथे शिंदे व नार्वेकरांमध्ये थोडावेळ चर्चा झाली होती. या चर्चेत शिंदेंनी परत येण्यास नकार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि मिलिद नार्वेकर यांची आज भेट झाली.