‘त्या’ देशातील महिलांसाठी प्रार्थना

01 Sep 2022 21:33:23
iran
 
 
 
 
बुरखा घातलेल्या मरियमच्या डोळ्याला पट्टी बांधली होती. तिला एका खुर्चीवर उभे करण्यात आले. तिच्या गळ्यात फास टाकण्यात आला. तिला फाशी देण्यात येणार होती. तिच्या १९ वर्षांच्या मुलीला सांगितले गेले की, खुर्चीला लाथ मार. मुलीने खुर्चीला लाथ मारली आणि तिच्या आईच्या मरियमच्या गळ्याभोवतीचा फास आवळला गेला. मरियमचा मृत्यू झाला. अशा प्रकारे मुलीच्या हस्ते आईला फाशी दिल्यानंतर न्यायदान संपन्न झाले. ही हृदयद्रावक घटना आहे इराणची! प्रत्यक्ष पोटच्या मुलीच्याच हस्ते आईला मृत्युदंडाची शिक्षा देणे, हे सभ्य जगात प्रश्न उपस्थित करणारे आहे. पण, मरियमचा नेमका गुन्हा काय होता? ...तर या प्रश्नाचा मागोवा घेताना इराणमधील महिलांच्या स्थितीचे विदारक वास्तव समोर झाले.
 
 
 
२००९ सालची घटना आहे. मरियमला तिचा नवरा खूपच त्रास द्यायचा. मानसिक आणि शारीरिक भयंकर त्रास. दिवसेंदिवस तिला उपाशी ठेवायचा. तिच्या पित्याने इब्राहिमने जावयाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने अत्याचाराचे अमानुष सत्र सुरूच ठेवले. इराणमध्ये महिलांना घटस्फोट घेण्याचे अधिकार नाही. त्यामुळे मरियम कायदेशीररित्या नवर्‍यापासून विभक्त होऊ शकत नव्हती आणि घटस्फोट घेतला नसल्याने पती म्हणून त्याला अमर्याद हक्क होते. थोडक्यात, स्वत: मेल्याशिवाय किंवा तो पती मेल्याशिवाय मरियमला त्याच्या अत्याचारापासून सुटका नव्हती. शेवटी मरियमचा पिता इब्राहिम आणि मरियम यांनी मिळून तिच्या पतीचा खून केला.
 
 
 
इराणच्या कायद्यातून तिला पतीच्या अत्याचाराविरोधात न्याय मिळणारच नव्हता. मात्र, खुनाबद्दल मरियम आणि तिच्या पित्याला शिक्षा झाली. त्यावेळी मरियमची मुलगी सहा वर्षांची होती. ती तिच्या आजीआजोबांकडे राहू लागली. इराणच्या कायद्यानुसार खून झालेल्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक गुन्हेगाराला सजा देतात. पण, ती व्यक्ती १८ वर्षांवरील हवी. मरियमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्यात आली. इराणमध्ये गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी तीन पद्धतीही आहेत. एक आहे ‘किसास.’ डोळ्यांच्या बदल्यात डोळा, अर्थात मृत्यूच्या बदल्यात मृत्यू! दुसरे ‘ब्लड मनी.’ यामध्ये गुन्हेगार व्यक्ती एखाद्याच्या खुनाच्या बदल्यात, त्या मृताचे नातेवाईक सांगतील तितके पैसे-संपत्ती देऊन गुन्हेगाराची सजा माफ करणे आणि तिसरी पद्धत आहे ‘माफी.’ यामध्ये ज्याचा खून झाला, त्याच्या परिवाराने गुन्हेगाराला माफ करणे.
 
 
 
या तिन्ही पद्धतींपैकी मरियमला ‘किसास’ या पद्धतीनुसार फाशी देण्यात आली, असे म्हटले जाते. मरियमच्या पतीची जवळची नातेवाईक म्हणजे त्यांची मुलगी. त्या मुलीने ठरवले असते, तर आईला माफी देऊ शकली असती. पण, तिने आईला फाशी दिली. समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, त्या मुलीवर दबाव आणला गेला. मन मानेल तसे पत्नीशी वागणे हा पतीचा हक्क आहे. पत्नीने याबद्दल आवाज उठवणे हा गुन्हा, अशी एकंदर इराणची सामाजिक स्थिती. या असल्या परिस्थितीमध्ये किती तरी मरियम नरकवास भोगत असतील. कारण, होणार्‍या घरगुती हिंसाचाराबद्दल न्याय मिळवण्याची अपेक्षा शून्यच! कायद्याची आणि समाजाची साथही शून्यच!
 
 
 
या घटनेवरून इराणमध्ये मागे घडलेली घटना लिहावीशी वाटते. मलेयिशामध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा होती. इराणचा महिला फुटबॉल संघही यामध्ये सामील होणार होता. मात्र, इराणच्या फुटबॉल संघाची कर्णधार निलोफर अर्दालन खेळण्यासाठी मलेशियाला जाऊ शकली नाही. कारण, तिच्या पतीने तिला मलेशियाला जाण्याची संमती दिली नाही. इराणमध्ये कायदा आहे की, पतीच्या संमतीशिवाय महिला देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. बिचारी निलाफर आणि एकंदर महिला फुटबॉल संघ.
 
 
 
सौदी अरेबियामध्येही नुकतेच नूरा-बिन-सईद-अल-कहतानी या महिलेला ४५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तिचा गुन्हा काय? तर तिने समाजमाध्यमांवर एक ‘मेसेज’ पोस्ट केला. दुसरीकडे दुरवस्थेने आणि पुराने कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानमध्ये महिलांवर त्यातही हिंदू मुलींवरचे अत्याचार थांबता थांबत नाहीत. दोन दिवसांपूर्वी इथे आठ वर्षांच्या हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचे दोन्ही डोळे फोडून बाहेर काढण्यात आले. हे लिहितानाही असह्य होत आहे. जग कुठे चालले आणि हे देश कुठे चाललेत? या असल्या देशांमध्ये जन्म घेणे म्हणजे स्त्रियांनी माणूस म्हणून जगण्याचा हक्क गमावणे, असे चित्र आहे. त्या देशातील महिलांसाठी मनापासून प्रार्थना...!
 
 
 
Powered By Sangraha 9.0