सत्तेत राहण्याचा असा आहे 'नितीश' फॉर्म्युला! : ९ वर्षात दोनदा 'पलटी'

    09-Aug-2022
Total Views |
Nitish
 
 
 
 
 
बिहार: पाच वर्षानंतर पुन्हा नितीश कुमार यांनी भूमिका बदलली आहे. भाजपसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू सिंह चौहान यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. दुपारी मुख्यमंत्री जेडीयूच्या काही नेत्यांसह राजभवनात जातील. राजभवनाजवळ पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
 
तर दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. या पत्रावर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. नितीश कुमार हे या महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे. आरजेडीचे ७९ आमदार, जेडीयुचे ४५ आमदार, कॉंग्रेसचे १९ आमदार, डाव्या पार्टींचे १६ आमदार आणि अपक्ष एक आमदार असे मिळून १६० आमदारांचे संख्याबळ नितीश कुमार यांच्याकडे आहे.
बिहारमध्ये काय होणार हे येणारा काळच सांगेल, पण इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या नितीश कुमार यांनी जेव्हा जेव्हा राजकीय यू-टर्न घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघते.
 
 
१९९४ साली नितीश कुमार यांनी त्यांचे जुने सहकारी लालू यादव यांची साथ सोडली. रा. जनता दल सोडून नितीश यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्ष स्थापन केला आणि १९९५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालूंच्या विरोधात गेले, परंतु निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला.
 
 
त्यावेळी बिहारमध्ये पकड कमी असलेल्या भाजपशी त्यांनी १९९६ मध्ये हातमिळवणी केली. भाजप आणि समता पक्षाची ही युती पुढील १७ वर्षे टिकली. मात्र, दरम्यानच्या काळात २००३ मध्ये समता पक्षाची जनता दल युनायटेड (JDU) झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांना पाठींबा नाकारला.
 
 
त्यानंतर पुन्हा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पराभूत झालेल्या नितीश कुमार यांनी २०१५ मध्ये लालू यादव आणि काँग्रेस यांच्यासोबत महाआघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आरजेडीने जेडीयु पेक्षा जास्त जागा आणल्या. असे असूनही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री तर मोठा मुलगा तेज प्रताप यादव आरोग्य मंत्री झाले.
 
२० महिने हे सरकार टिकले पण २०१७ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. एप्रिल २०१७मध्ये सुरू झालेल्या वादाने जुलैपर्यंत गंभीर वळण घेतले, त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पद्धतशीरपणे राजीनामा दिला. तेव्हा विधानसभेत भाजप सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने मध्यावधी निवडणुका घेण्यास नकार देत भाजपने जुन्या मित्रपक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. सत्ता उलथून टाकण्याची ही संपूर्ण घटना १५ तासांत नाट्यमय पद्धतीने घडली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.