लखनऊ : नोएडातील ग्रॅण्ड ओमॅक्स सोसायटीत महिलेशी शिवीगाळ करणाऱ्या श्रीकांत त्यागीच्या मुसक्य नोएडा पोलीसांनी अखेर आवळल्या आहेत. त्यागीवर २५ हजार रुपयांचे इनाम होते. त्याचे तीन साथीदारही गजाआड झाले आहेत. त्यागीच्या अटकेनंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळातील कायदा सुव्यवस्था चोख असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यागी फरार होता. त्याची माहिती मिळवण्यासाठी नोएडा पोलीसांनी एक शक्कल लढविली.
योगी सरकारने प्रशासनाचा कणखरपणा काय असतो हे दाखवून दिलंयं. दोन दिवस श्रीकांत त्यागी पोलिसांना चकवा देत राहिला. पोलीसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. चौकशी सुरू झाली. तिच्या फोनमधून मिळालेल्या माहिती पोलीसांसाठी पुरेशी होती. त्यानंतर त्यागीला अटक झाली आणि पत्नीला सोडण्यात आले. नोएडाचे पोलीस आयुक्त आलोक सिंह यांच्या माहितीनुसार, सायंकाळी श्रीकांत त्यागींना सूरजपूर कोर्टापुढे हजर केले जाणार आहे. त्याच्यावर गँगस्टर अॅक्ट लावला जाईल. संपत्तीही जप्त होईल.
भाजप खासदार महेश शर्मा या प्रकरणात म्हणतात, "आमच्या मुख्यमंत्र्यांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ज्या प्रकारे २४-३६ तासात या प्रकरणाचा पोलीसांनी निकाल लावला. त्यावरुन कायदा सुव्यवस्था शाबूत असल्याचा विश्वास वाढत जातो." सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रँड ओमेक्स सोसाइटीतून फरार झाल्यानंतर श्रीकांत मेरठला आपल्या नातेवाईकांकडे पोहोचला होता. सोमवारी रात्री श्रीकांतने आपल्या पत्नीला फोन केला होता. पोलीसांना इथूनच सुगावा लागला. मंगळवारचा दिवस उजाडताच त्याची पत्नी अनु त्यागीला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. पोलीसांनी मोबाईलद्वारे त्यागीचा ठावठिकाणा शोधून काढला.