ज्या पूजा चव्हाण प्रकरणात राठोड अडचणीत आले त्याचं पुढं काय झालं?

09 Aug 2022 15:12:41


pc
 
 
 मुंबई: पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. हे संभाषण बंजारा भाषेत झालं होत. संजय राठोड आणि पूजा चव्हाण दोघेही एकाच आदिवासी बंजारा समाजातून होते.
 
मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र ७ फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
 
पोलिसांनी पूजाचा फोन फॉरेन्सिक टीमकडे पाठविला होता. या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या संभाषणात असलेला आवाज संजय राठोडचा असल्याचे सांगितले. या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे संजय राठोड यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला होता.
 
परंतु, नातेवाइक आणि मित्रांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक पूजाच्या मूळ गावी गेले असता कुणीही तक्रार न दिल्याने या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
 
शिवाय, शवविच्छेदन अहवालानुसार, पूजाचा मृत्यु डोक्याला मार लागल्याने झाल्याचे वृत्त आहे.
 
 
पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाल्याने चित्रा वाघ यांची संजय राठोड विरोधात डरकाळी...
 
पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे, अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0