उत्सवांना तेज...!

    09-Aug-2022
Total Views |

gntv
 
 
कोरोनामुळे सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमांना ब्रेक लागला. पण, आता फडणवीस-शिंदे सरकारमुळे हे उत्सव कोणत्याही अडथळ्यांशिवाय साजरे करायला मिळणार म्हणून नागरिकांमध्ये उत्साह शिगेला आहे. त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक कार्यक्रमाची राजधानी म्हणून ख्यातनाम पुण्यात उमटले नाही तरच नवल.
 
 
खरंतर जसे कोरोनाचे नियम शिथिल झाले, तेव्हापासूनच पुण्यातील अशा उत्सवी, वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल वाढली. आता तर आगामी काळ सण-उत्सवांचा... त्यात सार्वजनिक गणेशोत्सव हा तर पुण्याचा मानबिंदू. त्यामुळे या उत्सवासह गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यासाठी प्रत्येकाचा उत्साह वाढला आहे. यातून ‘राष्ट्रप्रेम’ ही भावना तेवत राहणार आहे आणि सामाजिक सलोखा निर्माण होण्यास हातभार लागेल.
 
 
यातून गेली कित्येक दिवस सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेलादेखील उभारी मिळत आहे, बाजारपेठा फुलल्या आहे, व्यावसायिकदेखील सज्ज झाले आहेत.
 
 
राज्यात कोणत्याही कोपर्‍यात गेलात तरी ‘पुण्यात असे... पुण्यात तसे...’ अशी या शहराची नित्य नवी ओळख सांगणार्‍या चर्चा नेहमीच्याच. त्यामुळे हे महानगर आता पुन्हा गेल्या अडीच वर्षांतील सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मरगळ कशी झटकून टाकायचे, याचा आदर्श उभा करण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वाच्या निमित्ताने ’हर घर तिरंगा’ मोहिमेत पुणे जिल्हा आघाडीवर असल्याची बातमी झळकली. यातून या जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासन यांच्यातील या राष्ट्रीय सणाबद्दलचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधोरेखित होते.
 
 
शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनीदेखील आपल्या क्षेत्रातील काही नवे विचार, प्रयोग मांडण्याची नव्या सोबत जुने टिकवून ठेवण्याची जी काही अलीकडील काळातील वेगवेगळ्या कार्यक्रमांतून झलक दाखवून दिली, ती या समृद्ध परंपरेला नक्कीच नवी दिशा आणि ऊर्जा देणारी आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते.
 
 
असे असले तरी भविष्यात हा उत्साह टिकवून ठेवण्याचे भान मात्र ठेवावे लागणार आहे. याचा अर्थ हे सण-उत्सवाचे दिवस आहेत म्हणून उत्साह टिकवायचा आणि हे दिवस संपले की, पुन्हा मरगळ निर्माण करायची, हे टाळता येण्यासारखे आहे.
 
 
 
उत्साहाची क्रेझ...!
 
 
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकेकाळी पुण्यात येनकेन प्रकारे दबदबा ठेवणार्‍या काही लोकांच्या काळजात एकदम धस्स झाले. असे एक जुनेजाणते पुणेकर गप्पांच्या ओघात सांगून गेले. गेली अडीच वर्षे सत्ता होती तेव्हा या काही लोकांना पुण्यावर राज्य करण्याची स्वप्ने पडू लागली होती. पण, मुंबईचं नव्हे, तर थेट आसाम, गोव्यापासून या राज्यातील आमदारांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांचे कारनामे इतके चव्हाट्यावर आणले की, आता त्या पुण्यासाठी बघितलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काय करावे, हेच त्या लोकांना कळेनासे झाले आहे.
 
 
मुद्दा हा आहे की, आता सत्तेत असलेल्या व लोकांनी निवडून दिलेल्या खर्‍या युतीच्या नेत्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे या युतीच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या उत्साहाला बळ मिळाले आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येऊन गेले तेव्हा विरोधी गटांनी केलेल्या कृत्यामुळे राडे करणारे कोण, याची ओळख पुणेकरांच्या लक्षात आली. आता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन असणारा समर्थ नेता म्हणून बघितले जाते.
 
 
त्यामुळे ते पुण्याच्या विकासात लक्ष घालतील, कदाचित पुण्याचे पालकमंत्रीपदही स्वीकारतील, या चर्चांमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. पण, नागरिकांच्यादेखील आशा पल्लवित झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेता असताना आणि आधी मुख्यमंत्री असतानादेखील देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासकामात लक्ष घातले होते, हे पुणेकर जाणून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीत हे सिद्धदेखील झाले आहे, त्यामुळे आता मेट्रो असो, रेल्वे विस्तार असो, पाण्याची, वाहतुकीची, व अन्य कोणती समस्या असो, ती निकालात निघेल, ही अपेक्षा रास्त आहे.
 
 
पायाभूत सुविधांच्या विकासात पुण्याची प्रगती लक्षणीय आहे. मध्यंतरी ठप्प झालेली कामे मार्गी लागणार असल्याने पुण्यातील लोकांचा वाहतूक समस्येचा प्रश्न निकाली लागण्याचीही चिन्ह आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सत्तेत असणे हे कार्यकर्त्यांसाठी जसे ‘टॉनिक’ आहे, तशी प्रशासनालादेखील तत्पर राहायला भाग पाडणारी ही बाब आहे. महापालिकेच्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडणार, हे निश्चित!
 
 
 
 -अतुल तांदळीकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.