बीडच्या पठ्ठ्याची रुपेरी कामगिरी

    09-Aug-2022   
Total Views |

 
as
 
 
 
घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत तो सैन्यात भरती झाला आणि यशस्वी खेळाडू ठरला. जाणून घेऊया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणार्‍या अविनाश साबळे याच्याविषयी...
 
 
महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक असे रौप्यपदक मिळवत रूपेरी कामगिरी केली.
 
 
दि. १३ सप्टेंबर, १९९४ रोजी बीड जिल्ह्यातील मांडवा या छोट्याशा गावी त्याचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. शाळेत जायला गाडी मिळत नसल्याने तो तब्बल सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत पायी चालत जात. नंतर अविनाश पळतपळत शाळेत जाऊ लागला. अविनाशला सैन्यात जायची इच्छा असल्याने त्याने सरावाला सुरुवात केली. शाळेत जाताना त्याला सराव तसाही काही नवीन नव्हता. पुढे बारावीनंतर तो सैन्यामध्ये भरती झाला आणि ‘महार रेजिमेंट’चा भाग बनला. आपले कर्तव्य बजावत असताना अविनाशने अनेक कठीण समस्यांचा सामना केला.
 
 
सियाचीनमध्ये उणे अंश तापमानात राहण्यापासून ते वाळवंटातील ५० अंश तापमानातही तो सेवेदरम्यान राहिला. सैन्यात असताना त्याला ‘अ‍ॅथलेटिक्स’ स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१५ मध्ये त्याने ‘इंटर आर्मी क्रॉसकंट्री’ स्पर्धेत भाग घेतला आणि सुरू झाला अविनाश साबळेचा क्रीडा क्षेत्रातील एक नवा प्रवास. खरेतर अविनाशला क्रीडा क्षेत्रात आपण पुढे जाऊ असे कधीही वाटले नाही. मात्र, सैन्यात भरती आल्यानंतर त्याला ही संधी चालून आली.
 
 
‘क्रॉसकंट्री’ स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अविनाशने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र, वेगाने बहरत असलेल्या कारकिर्दीला दुखापतीमुळे मध्येच ब्रेक लागला. दुखापतीनंतर अविनाशचे मोठ्या प्रमाणावर वजन वाढले. मात्र, शर्थीच्या प्रयत्नांनंतर अविनाशने जोरदार पुनरागमन केले. जवळपास १५ किलोहून अधिक वजन कमी केल्यानंतर त्याने पुन्हा आपल्या सरावाला जोमात सुरुवात केली. दरम्यान, सराव सुरू असताना त्याला त्याच्या सैन्य प्रशिक्षकांनी ‘स्टीपलचेस’ या धावण्याच्या प्रकारात उतरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अविनाशचा खरा संघर्ष सुरू झाला. विशेष म्हणजे, ‘स्टीपलचेस’ हा प्रकार त्याच्यासाठी एकदम नवा होता.
 
 
भारतातही या प्रकाराविषयी फार क्वचित लोकांना माहिती असेल. ‘स्टीपलचेस’ प्रकारात त्याने धावण्याला सुरुवात केल्यानंतर त्याने सरावावरही तितकाच जोर दिला. २०१८ साली झालेल्या ‘एशियन गेम्स’साठी पात्र न ठरल्याने त्याची मोठी संधी हुकली. मात्र, त्याने सराव चालूच ठेवला आणि त्याचा परिणामही लवकरच दिसून आला. त्यानंतर अविनाशने २०१८ साली भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ‘ओपन नॅशनल’मध्ये तीन हजार मीटर ‘स्टीपलचेस’मध्ये ८:२९.८८ अशी वेळ नोंदवली. यावेळी त्याने ०.१२ सेकंदांनी तब्बल ३० वर्षांचा राष्ट्रीय विक्रमदेखील मोडीत काढला. यानंतर अविनाश प्रकाशझोतात आला आणि मग पुढे त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही.
 
 
यानंतर पटियाला येथे झालेल्या २०१९ ‘फेडरेशन कप’मध्ये साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. त्याने ८.२८.८९ अशी वेळ नोंदवत नव्या विक्रमाला गवसणी घातली. ‘नॅशनल चॅम्पियनशिप’मध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर त्याने अमेरिकेत झालेल्या पाच हजार मीटरच्या रेसमध्येही बाजी मारली. विशेष म्हणजे, यावेळी बीडमध्ये चक्क तोफांद्वारे सलामी देऊन जल्लोष साजरा करण्यात आला. आता नुकत्याच पार पडलेल्या बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतहीत्याने तीन हजार मी. ‘स्टीपलचेस’ प्रकारात ८ मिनिट ११.२० सेकंदात रेस पूर्ण करत रौप्यपदकाची कमाई केली.
 
 
विशेष म्हणजे, रौप्य पदक पटकावण्याबरोबरच त्याने तब्बल दहाव्यांदा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. अविनाशचे जागतिक स्तरावरील मोठ्या आणि मानाच्या स्पर्धांमध्ये हे पहिले यश आहे. त्यातही ‘स्टीपलचेस’ हा प्रकार भारतीयांसाठी अतिशय नवा आहे. अविनाशने रौप्यपदक जिंकल्यानंतर देशाला तो माहीत झाला. या प्रकारात केनियाचे वर्चस्व आहे. मात्र, अविनाशने ते मोडीत काढत भारताची शान आणखी वाढवली आहे.
 
 
दरम्यान, ‘स्टीपलचेस’ हा प्रकार अतिशय अवघड मानला जातो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘स्टीपलचेस’ ही एक अडथळ्यांची शर्यत असते. ज्याठिकाणी ट्रॅकवर पाणीही असते, खेळाडूंना अडथळे पार करत पाण्यातून मार्ग काढत तीन हजार मीटरचे अंतर पार करायचे असते. या खेळात अविनाश नवा आहे. त्यामुळे त्याला भविष्यात आणखी अनेक संधी येतील. त्यामुळे देशासाठी तो यापुढेही या क्रीडा प्रकारात पदकांची लयलूट करेल, हे नक्की. अविनाशचे वडील मुकूंद साबळे यांनी मुलाच्या या रूपेरी यशावर समाधान व्यक्त केले. अविनाशने काही महिन्यांपूर्वीच कोरोनावर यशस्वी मात केली.
 
 
अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन त्याने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर नेऊन ठेवले आहे. त्याने यापुढेही देशासाठी अशीच पदके जिंकून तिरंगा फडकावत ठेवावा, हीच इच्छा. देशातील युवकांसमोर आपल्या रूपेरी यशाने नवा आदर्श ठेवणार्‍या अविनाश साबळे याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.