...म्हणून नाही येणार राणीच्या बागेत झेब्रा!

08 Aug 2022 17:03:22

Prani
 
 
मुंबई: भायखळातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात झेब्रा आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. इस्राईल देशात अजूनही ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ या प्राणांच्या आजाराचे वास्तव्य असल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने रद्द केला. त्यामुळे प्रशासन आता झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत आहे. परिणामी, राणीच्या बागेतील सिंहाचे आगमनही रखडले आहे.
 
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाने गुजरातमधील जुनागढच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालय आणि इंदौर मधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून पांढरे सिंह आणण्याची योजना आखली होती. राणीच्या बागेकडून झेब्रा देण्यात येणार होते. गतवर्षी थायलंडस्थित 'गोआट्रेड फार्मिंग कंपनी लिमिटेड'ला या झेब्रांची खरेदी आणि वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. याबाबत प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता; मात्र प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे.
 
इस्राईल देश ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’पासून (एएचएस) अधिकृतरित्या मुक्त नाही असे त्यांनी म्हटले आहे. ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ’नुसार आफ्रिकन घोड्यांच्या आजारपणाच्या बाबतीत भारत हा ‘एएचएस’मुक्त देश म्हणून ओळला जातो. आणि झेब्राच्या आयातीला केवळ एएचएसपासून मुक्त देशातूनच परवानगी दिली जाते. त्यामुळे प्रशासन आणि गोआट्रेड फार्मिंग कंपनी लिमिटेड'  आता झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत असल्याचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. राणीच्या बागेला झेब्रा मिळाल्यानंतर तो गुजरातमधील प्राणिसंग्रहालयाला देऊन त्याबदल्यात सिंह घेण्याची योजना होती. त्यामुळे आता झेब्रा आल्याशिवाय सिंह येणार नसल्याचे सांगण्यात आले.

सिंहासाठी पहावी लागणार वाट
 
वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात २००५ पर्यंत तीन सिंहांचे वास्तव्य होते. या प्राणिसंग्रहालयात शेवटच्या मादी सिहांचे नाव होते 'जिमी'. ती सन २०१४ मध्ये दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला. त्याआधी सन २०१० मध्ये 'अनिता' नावाच्या २२ वर्षांच्या मादी एशियाटिक सिहांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. तेव्हापासून प्राणिसंग्रहालयाला सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.
Powered By Sangraha 9.0