कणकवलीत मुसळधार पाऊस : आचरा मार्ग बंद

    06-Aug-2022
Total Views |

MTB




कणकवली
: तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे आचरा मार्ग बंद करण्यात आला आहे. सेंट उर्सूला शाळेजवळ गड नदीचे पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. येथील गणपती साणा येथेही पाणी भरले असून जनावली आणि गड नदी दुधडी भरून वाहत आहे. आचरा मार्ग हा नेहमीच पावसात पुरामुळे ठप्प होतो. पूरस्थिती पहाता शाळेलाही सुटी देण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
 
सिंधुदुर्गात २७ गावांचा संपूर्क तुटला
जिल्ह्यात तुफान पाऊस आल्याने निर्मला नदीला पूर आला आहे. यात तब्बल २७ गावांचा संपर्क तुटलेल्या स्थितीत आहे. जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. यामुळं 27 गावांचा संपर्क तुटला आहे. निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे.
 
येत्या ४८ तासांत राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा
 
येत्या ४८ तासांत राज्यभरात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दि. 5 ते 11 ऑगस्टदरम्यान राज्यभरात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता तसेच कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात थांबलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मान्सूनचे पुनरागमन होणार आहे.
 
बंगालच्या उपसागरात ४८ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार

बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासांत नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ-मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सारी बरसत आहेत. मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांमध्ये आणखी सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणात होणार्‍या बदलांमुळे पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार बसरणार आहे