जग मंदीछायेत, भारत मजबूत!

    06-Aug-2022
Total Views |

S&P
 
 
अन्य देशांच्या अर्थव्यवस्था लडखडल्या तरी भारतावर त्याचा दुष्प्रभाव पडला नाही. आता ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल’ या संस्थेनेही आपल्या अहवालातून तेच सांगितले. पण, ते मोदीविरोधकांना कितपत समजेल, ही शंकाच कारण, त्यांना विरोधच करायचा आहे.
 
अमेरिकेसह चीनसारख्या देशांत आर्थिक मंदीची शक्यता व्यक्त केली जात असून, श्रीलंकेत आर्थिक आणीबाणीमुळे अराजक निर्माण झाल्याचे तर पाकिस्तान दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. शेजारी देशांपासून अमेरिकेपर्यंत आर्थिक आघाडीवर परिस्थिती बिघडलेली असताना भारताची आर्थिक स्थिती ढासळण्याची भाकिते प्रामुख्याने मोदीविरोधी टोळक्याकडून केली जात आहेत. पण, गेल्या आठ महिन्यांतील भारताच्या निर्मिती क्षेत्रातील गतिविधींनी मोदीविरोधकांच्या सर्व अंदाजांना खोटे ठरवण्याचे काम केले. यासंदर्भात ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’ने एक अहवाल तयार केला असून, त्यानुसार निर्मिती क्षेत्रातील गतिविधी जुलै २०२२ मध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे म्हटले आहे. मागणी व पुरवठा या दोन्हीत आलेल्या तेजीमुळेच भारतीय अर्थव्यवस्था मजबुतीने पुढे जात असल्याचे यावरुन समजते. इतकेच नव्हे, तर यामुळे जगात जरी मंदी आली तरी त्याचा भारतावर मात्र परिणाम होणार नाही, हेही स्पष्ट होते. ‘एस अ‍ॅण्ड पी’ने तयार केलेल्या अहवालानुसार, भारताचा ‘पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’-‘पीएमआय’ जूनमधील ५३.९ वरुन वाढून जुलैमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे ५६.४ वर पोहोचला. ‘पीएमआय’ ५० पेक्षा अधिक असेल, तर त्याचा अर्थ विस्तार होत आहे, तर ‘पीएमआय’ ५० पेक्षा कमी असेल, तर आकुंचन पावत आहे, असा होतो. जुलैच्या ‘पीएमआय’ आकडेवारीने सलग १३व्या महिन्यासाठी समग्र परिचालन स्थितीच्या सुधारणेचा संकेत दिला आहे.
 
‘एस अ‍ॅण्ड पी’ने तयार केलेल्या अहवालावरुनही नव्या औद्योगिक मागण्यांमध्ये वेगाने वाढ झाल्याचे म्हटले आहे. निर्मिती क्षेत्रातील तीन बृहद क्षेत्रात तेजी नोंदवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर जुलै २०२२ मध्ये ‘आऊटपूट’ सर्वाधिक वेगाने वाढले आहे. अर्थात त्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे, परकीय मागणी कमी झाल्यानंतर ‘पीएमआय’मध्ये वाढ झाली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती उत्तम नाही, भारतातून रोख बाहेर जात आहे. तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिकच असून तिचा विस्तार होत असल्याचे या अहवालावरुन समजते. ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स’च्या साहाय्यक संचालक पॉलियाना डी लामा यांनी, २०२२-२३ या आर्थिक वर्षाची पहिली तिमाही भारताच्या निर्मिती उद्योगासाठी उत्तम ठरल्याचे म्हटले आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्था रुळावर असल्याचे चित्र यावरुन स्पष्ट होते.
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’ने तयार केलेल्या अहवालातून भारतीय अर्थव्यवस्था बुडणार असल्याचे अंदाज वर्तवणार्‍या मोदीविरोधकांना सणसणीत चपराक लगावल्याचे दिसते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर आल्यापासूनच भारत डबघाईला जावा म्हणून प्रत्येक विरोधकाने आपापल्या श्रद्धास्थानांना पाण्यात बुडवून ठेवले आहे. काहीतरी व्हावे आणि भारताची हालत दयनीय व्हावी, अशी त्या सर्वांची इच्छा आहे. त्याला कारण, नरेंद्र मोदींमुळे त्यांची संपलेली प्रासंगिकता. मोदींनी २०१४ साली सत्तेवर आल्यापासूनच काँग्रेस, डावे, समाजवादी, तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत, संपादक-पत्रकारांची जागा दाखवून दिली. तत्पूर्वीच्या सरकारमध्ये पुढे पुढे करणार्‍या या टोळक्यातल्या म्होरक्यांचे महत्त्व मोदी सरकारमध्ये संपुष्टात आले. त्याआधी देशाचे धोरण ठरवतानाही या टोळक्यातल्या कित्येकांचे म्हणणे ऐकले जायचे, देशघातकी असले तरी त्यानुसार बदल केले जायचे. त्यामुळे ‘आम्ही म्हणजे सरकार’ असा एक मुजोरपणा या टोळक्यात संचारला होता. पण, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि या टोळक्याला कोणी विचारेनासे झाले.
 
सरकार या टोळक्यासाठी नव्हे, तर जनतेसाठी काम करू लागले, जनहिताचे निर्णय घेऊ लागले, जनहिताची धोरणे आखू लागले. त्यातून वैफल्य आलेल्या प्रत्येकाने त्यानंतर मोदी सरकारविरोधात घसा फाडायला सुरुवात केली. निमित्त कोणतेही असो, समोर मोदी असतील, तर विरोधाचे भोकाड पसरायचे, हा त्यांचा शिरस्ता झाला. तेच टोळक्यातले लोक जागतिक परिस्थिती पाहून आता भारतही मंदीच्या गर्तेत जाणार आणि त्यासाठी नरेंद्र मोदीच जबाबदार असतील, असे सांगू लागले. पण, भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी काय आवश्यक आहे, हे मोदी सरकारला चांगलेच कळते आणि त्यानुसारच त्यांनी गेल्या आठ वर्षांत वाटचाल केली. कोरोना काळातही योग्य ती पावले उचलली. परिणामी, अन्य देशांच्या अर्थव्यवस्था लडखडल्या तरी भारतावर त्याचा दुष्प्रभाव पडला नाही. आता ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल’ या संस्थेनेही आपल्या अहवालातून तेच सांगितले. पण, ते मोदीविरोधकांना कितपत समजेल, ही शंकाच, कारण त्यांना विरोधच करायचा आहे.
 
‘एस अ‍ॅण्ड पी’ने आपल्या अहवालातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीची खात्री दिलेली असतानाच आतापर्यंत मोदीविरोधी टोळक्याचे मेरुमणी असलेल्या रघुराम राजन यांनीही भारत सुस्थितीत असल्याचे कबुल केले. गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी, भारताची अर्थव्यवस्था कधीही श्रीलंका वा पाकिस्तानसारखी होणार नाही, असे मान्य केले, तर ‘ब्लुमबर्ग’नेही गेल्या आठवड्यात केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून आगामी काळात आर्थिक मंदीत जाणार्‍या देशांची यादी सादर केली होती. त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि चीनसारख्या वरवर मजबूत अर्थव्यवस्था असल्याचे दिसणार्‍या देशांचा समावेश होता. पण, भारतात मात्र मंदीची शून्य शक्यता असल्याचे त्यात म्हटले होते. देशाच्या ‘जीएसटी’ संकलनातही सातत्याने वाढ होत असून, जुलैमध्ये ते १ लाख, ४८ हजार, ९९५ कोटींवर पोहोचले.
 
वार्षिक आधारावर त्यात २८ टक्क्यांची वाढ झाली. जून महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेच्या गाभ्याच्या आठ क्षेत्रांचे उत्पादन १२.७ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी त्यात ९.४ टक्क्यांची वाढ नोंदवली होती. जूनमध्ये भारताची एकूण निर्यातदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढून ६४.९१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. २२ जुलैच्या आकडेवारीनुसार, भारताचा परकीय चलनसाठादेखील ५७१.५६ अब्ज डॉलर्स इतका आहे. जग मंदीछायेत असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचेच हे द्योतक. ती आगामी काळातही अधिकाधिक मजबूत होईल आणि मोदीविरोधकांच्या भविष्यवाण्या भाकड ठरवत राहील.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.