गोंदिया जिल्ह्यात ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, म्हणाले...

    06-Aug-2022
Total Views |

eknath shinde
 
 
मुंबई: मदतीचा हात पुढे करून गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पीडित महिलेला रस्त्याच्या कडेस फेकून दिले. तीन आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांचा आदेश...
 
हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे, त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही, असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही. हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.
 
  
नक्की काय घडलं?
 
पीडित महिला गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. पीडित महिला पतीसोबत राहत नाही. ३० जुलै रोजी बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिने रात्री बहिणीचे घर सोडले. ती गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईच्या घरी जाण्यास निघाली. रस्त्यात भेटलेल्या निनावी आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या कारणाने गाडीत बसण्यास सांगितले. पण या नराधमानं पुढे तिला घरी सोडलं नाही, तर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन ३० जुलैला तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, ३१ जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकून त्याने तेथून पळ काढला.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.