शेकडो मंदिरांचे निर्मातेः शहाजी हाकदळे

06 Aug 2022 10:52:30
Shahaji Haakadale 
 
 
घरं तर अनेकजण बांधतात. पण, ज्याठिकाणी देवाचा वास आहे, अशा मंदिराचे बांधकाम करणे ही भाग्याचीच गोष्ट. जाणून घेऊया आतापर्यंत शेकडो मंदिरे बांधणार्‍या शहाजी हाकदळे यांच्याविषयी...
 
नांदेड जिल्ह्यातील मजरे सांगवी या गावी जन्मलेल्या शहाजी श्रीहरी हाकदळे यांचे बालपणीचे जीवन तसे अत्यंत हलाखीत गेले. वडील श्रीहरी आणि आई जिजाबाई शेतात राबल्यानंतर जे काही पैसे हाती येत, त्यातच घर चालत. शहाजी यांचे प्राथमिक शिक्षण मजरे सांगवी जिल्हा परिषद शाळेत, तर पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण बोरी खुर्द येथील संत नामदेव महाराज विद्यालयात झाले. एसटीचा ३०० रुपयांचा पास काढण्याइतकेही पैसे जवळ नसल्याने ते शाळेपर्यंतचा प्रवास पायी करत. विशेष म्हणजे, महिन्याचा संपूर्ण कुटुंबाचा खर्चच ३०० रुपये होता, तेव्हा पास काढणे शक्यच नव्हते. अभ्यासात जेमतेम असल्याने ४२ टक्के गुण मिळवत ते २००० साली दहावी उत्तीर्ण झाले. गरिबीच्या चटक्यांमुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी ट्रकचालक होण्याची इच्छा आई-वडिलांकडे बोलून दाखविली खरी. मात्र, त्यांना या क्षेत्रात न जाण्याचा सल्ला मिळाला. काम करण्याशिवाय शहाजींना पर्याय नसल्याने ते व्यंकटराव तिडके या मंदिर बांधकाम कंत्राटदाराकडे काम करू लागले.
 
सुरुवातीला त्यांना दिवसाला ६० रुपये मिळत. यावेळी पायात साधी चप्पलही नसायची. एकच चांगला ड्रेस असल्याने तो धुवून वाळत घालून पुन्हा घालायचा. घरापासून माळाकोळीपर्यंत सात किलोमीटर पायी जावे लागत. हळूहळू शहाजी काम समजून घेऊ लागले. त्यांच्याबरोबरचे कामगार अशिक्षित असल्याने त्यांनास बिगारी कामानंतर पुढे मोजमापाचे काम देण्यात आले. कामातील सुधारणा पाहून त्यांना एका वर्षांत १२५ रुपये रोज मिळू लागले. तिसर्‍या वर्षांत दिवसाची २५० रुपये बिगारी मिळू लागली. याचदरम्यान त्यांना उत्तमराव पाटील शिंदे या मावसभावाच्या मदतीने मंगरुळ गावी ४१ हजारांचे ३१ फूट उंचीचे हनुमान मंदिर बांधण्याचे काम मिळाले. त्यामुळे दहा मुलांना रोजगार मिळाला. या कामातून मिळाळेल्या पैशांतून त्यांनी २२०० रुपयांचा रिलायन्सचा मोबाईल घेतला. विशेष म्हणजे, गावात मोबाईल घेणारे ते दुसरे व्यक्ती होते. पण, गावापासून सात-आठ किलोमीटरवर रेंज मिळत असल्याने मोबाईल असूनही नसल्यासारखाच होता.
 
त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे कामे घेण्यास सुरुवात केली. परभणी जिल्ह्यातील केरवाडी गावातील मंदिराचा कळस बांधण्याचे काम त्यांना पुढे मिळाले. गाडीची गरज असल्याने त्यांनी काही पैसे वाचवून दुचाकी विकत घेतली. त्यानंतर व्यवसायवाढीसाठी त्यांनी स्वतःचे ‘व्हिजिटिंग कार्ड’देखील छापले. मग एसटीत प्रवास करताना, एखाद्या कार्यक्रमात किंवा जत्रेमध्ये ते लोकांना वाटत. त्यामुळे त्यांना चांगली कामे मिळू लागली. कामाचा व्याप वाढल्यानंतर त्यांनी चारचाकीसह मंदिर बांधकामासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री विकत घेतली. अहमदनगरमधील कर्जत शहरातील गोदड महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मिळाल्यानंतर ते मोठ्या सुपरिचित झाले. शहाजी आजही रेती आणि विटांमध्ये बांधकाम करण्यास प्राधान्य देतात. आतापर्यंत त्यांनी जवळपास ४०० ते ४५० मंदिरे बांधली आहेत. त्यात रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील जवळपास ५०-६० गावांमधील मंदिराचे बांधकाम केले आहे.
 
‘मराठा उद्योजक लॉबी’च्या माध्यमातूनही त्यांना अनेक कामे मिळाली. त्यात कोल्हापुरातील परतखेळ येथे तब्बल ४९ लाखांचे काम मिळाले. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील निरंजनी आखाड्यातील मंदिर, सभामंडपाचे बांधकाम त्यांनी केले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्येही त्यांनी महादेवाचे मंदिर बांधले. वाशिम, हिंगोली, अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक यांसारख्या असंख्य जिल्ह्यांमध्ये अनेक मंदिरांचे बांधकाम त्यांनी केले असून सध्या ते २० जणांना रोजगार देत आहेत. आपल्या हाताने देवाचे मंदिर बांधले जाते. त्यात देवाचा वास असतो. माणसाची घरं अनेकजण बांधतात. पण, मंदिर बांधणं ही भाग्याची गोष्ट आहे. आमच्याकडे काम करणारे सर्वजण निर्व्यसनी आणि शाकाहारी आहेत. त्याचप्रमाणे, मंदिर बांधल्याने लोकांकडूनही चांगला आदर मिळत असल्याचे शहाजी सांगतात.
 
मंदिरात प्रत्येकाने स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, तसेच मंदिरदेखील स्वचछ ठेवले पाहिजे, असे शहाजी सांगतात. मावसभाऊ उत्तमराव पाटील शिंदे, सराफ व्यापारी सचिनशेठ कुलथे आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचे पुत्र विकासशेठ गोगावले यांचे शहाजींना वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. व्यंकटराव तिडके यांनी संधी दिल्यानेच इथपर्यंतचा टप्पा गाठता आला. घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यात अभ्यासात जेमतेम त्यामुळे पुढे काय होणार, असा प्रश्न होता. मात्र, जे काम हाती आलं ते केलं आणि त्यात नवनवीन गोष्टी शिकल्या. अनुभव माणसाला मोठं करतो आणि त्याच्या जोरावरच यशस्वी होता आल्याचे शहाजी सांगतात. एकेकाळी पायात चप्पल नव्हती, पण ज्याठिकाणी लोकं चपला बाहेर काढून देवाच्या दर्शनाला जातात, अशा मंदिराचे बांधकाम करण्यापर्यंतचा प्रवास शहाजी यांनी पूर्ण केला आहे. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
Powered By Sangraha 9.0