सोनचाफा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी स्मृतिग्रंथ

06 Aug 2022 19:19:06

purandre

 
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या युगपुरूषांबद्दल काही बोलणे म्हणजे, सूर्याला दीप दाखवण्यासारखेच. इतके श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. नुकताच बाबासाहेबांच्या शतक महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ ‘बहुउद्देशीय संस्थे’ने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील ‘सोनचाफा’ हा स्मृतिग्रंथ पुणे येथे प्रकाशित केला.
 
 
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘सोनचाफा’ अत्यंत प्रिय होता; किंबहुना त्यांचं स्वतःच आयुष्य एखाद्या सोनचाफ्यासारखं होतं, सदैव प्रफुल्लित राहून दरवळणार्‍या फुलासारखं आणि म्हणूनच या स्मृतिग्रंथाचे नावही ‘सोनचाफा.’ हा स्मृतिग्रंथ म्हणजे बाबासाहेबांच्या स्मृतींच्या आठवणींची परडीच म्हणता येईल. कारण, विविध मान्यवरांच्या आठवणींचा परिमळ यात दरवळतो आहे.
 
 
पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन’ येथील फिरोदिया सभागृहात संपन्न झालेल्या या देखण्या समारंभात पुण्याचे माजी खासदार, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते, ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे, माजी सनदी अधिकारी, लेखक आणि चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव अमृतराव पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ संशोधक उदय कुलकर्णी आणि बाबासाहेबांचे चरित्रकार डॉ. सागर देशपांडे आणि आणखीही अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन झाले.
 
 
बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्नुषा आणि चरित्रकार डॉ.चित्रलेखा पुरंदरे यांनी संपादित केलेल्या या स्मृतिग्रंथात विविध मान्यवरांचे २२ लेख आहेत. लतादीदींना हा ग्रंथ समर्पित केला आहे. बाबासाहेबांना लतादीदींबद्दल अतिशय आदर होता. दीदी कायम म्हणायच्या, “बाबासाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या दरबारातील एक सरदारच असतील.” बाबासाहेबांचा ध्यास, श्वास छत्रपती शिवाजी महाराजच होते. ते कायम म्हणायचे, “मला माझ्या अंतिम क्षणी दीदीनं गायलेला ’अजि सोनियाचा दिनु’ हा अभंग ऐकायची इच्छा आहे” आणि त्यांची ही इच्छा पूर्ण केली गेली आणि त्या नादब्रह्मातच ते परमेश्वरचरणी विलीन झाले. संपादकीय लिहिताना चित्रलेखा पुरंदरे यांनी लिहिलेली ही आठवण मनाला स्पर्शून जाते. पुढे सगळ्या लेखकांनी लिहिलेल्या आठवणी वाचताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावाची जादू काय आहे, याचा अनुभव आपल्याला ग्रंथ वाचताना प्रत्येक पानावर येतो.
 
 

purandre 
 
 
 
बाबासाहेब पुरंदरे यांच्या जवळपास वर्षानुवर्षे वावरणार्‍या मंडळींच्या लेखणीतून बाबासाहेब लोकांसमोर यावेत आणि त्यातूनच या ग्रंथाची निर्मिती झाली आहे. सामान्यातल्या सामान्य माणसालाही बाबासाहेब कसं मायेनं वागवत, त्याला कसं सांभाळून घेत, त्याला कशी शिकवण देत, अशा अनेक गोष्टी या ग्रंथातील लेखांमधून आपल्याला जाणवतात. बाबासाहेबांसारख्या विद्वान, दानशूर आणि अफाट लोकसंग्रह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेली माणसं पण हजारो आहेत. प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे आहेत. त्यातीलच काही आठवणी या संकलित करून हा स्मृतिग्रंथ वाचकांच्या भेटीला आला आहे.
 
 
इतिहासात चंदन आणि कोळसा दोन्ही आहे. आपण चंदन उगाळावं, असं बाबासाहेब कायमच सांगत. बाबासाहेबांनी अतिशय रसाळ आणि सोप्या शब्दांत शिवचरित्र उलगडले आणि त्याचे मर्म सांगितले; म्हणून बाबासाहेब इतके मोठे झाले आणि मोठे होत असताना संपर्कात येणारा प्रत्येक माणूस हा जोडून ठेवला आणि तो अखेरपर्यंत जपून ठेवला. यातील सर्व लेखकांच्या आठवणी या हृद्य आणि वाचकाला भावनिक साद घालणार्‍या आहेत.
 
 
या स्मृतिग्रंथात अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा देखील आवर्जून समावेश केला आहे. बाबासाहेबांचे परम मित्र कवी शंकर वैद्य यांनी बाबासाहेब आणि निर्मलाताई यांच्या विवाहाप्रसंगी केलेले मंगल काव्य यात आले आहे. १९६४-६५च्या सुमारास विलेपार्ले येथे पु. ल. देशपांडे यांच्या पुढाकाराने आयोजित व्याख्यानमालेत पुलंनी बाबासाहेबांच्या एकसष्ठी निमित्ताने लिहिलेले ‘मानपत्र’ या स्मृतिग्रंथात आले आहे.
 
 
डॉ. गो. बं. देगलूरकर, दिलीप माजगावकर, वीणा देव, शी. द. फडणीस यांसारख्या मातब्बर मंडळींच्या आठवणी वाचनीय आहेत. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी बाबासाहेबांच्या अनेक मुलाखती घेतल्या. त्यातील दोन एकत्रित केलेल्या मुलाखती या स्मृतिग्रंथात वाचकांना वाचायला मिळतात. आनंद देशपांडे यांच्या लेखात त्यांनी बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला होता, ‘सर्व इतिहास मुखोद्गत असून शिवचरित्रावर विशेष प्रेम का?’ बाबासाहेबांनी या प्रश्नाला विस्तृत उत्तर दिलेलं आहे. नुसतं ते एक उत्तर वाचलं तरी बाबासाहेबांच्या रोमरोमात महाराज किती भिनले होते, त्यांना महाराज किती कळले होते, हे आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुभेच्छा संदेशही या स्मृतिग्रंथात वाचायला मिळतो. राज ठाकरे आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
 
 
या सार्‍या आठवणींचा स्मृतिगंध निरंतर दरवळत राहावा याचसाठी हा ‘सोनचाफा’ प्रत्येकाच्या संग्रही असावा, हीच सदिच्छा. अत्यंत सुरेख तसेच साजेसं मुखपृष्ठ, विशेष आकार आणि हार्डबाऊंड असलेला हा ग्रंथ अतिशय देखणा झाला आहे. केवळ १५ दिवसांत या स्मृतिग्रंथाची पहिली आवृत्ती संपली आणि बाबासाहेबांच्या चाहत्यांच्या प्रेमाखातर याची दुसरी आवृत्ती लवकरच उपलब्ध होणार आहे. त्याची नोंदणीही सुरू झाली आहे.
 
 
ज्यांना पहिल्या आवृत्तीत ग्रंथ उपलब्ध होऊ शकला नाही, त्यांना दुसर्‍या आवृत्तीत लगेच नोंदणी करता येईल. दुसरी आवृत्तीदेखील मर्यादित रुपात असणार आहे. वाचनीय आणि संग्रही असावा असाच हा स्मृतिग्रंथ. ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ टीमचे विशेष अभिनंदन आणि आभार, कारण त्यांनी अत्यंत देखण्या रुपात हा ‘सोनचाफा’ आम्हा वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
 
 
- सर्वेश फडणवीस
 
 
 
पुस्तकाचे नाव : सोनचाफा - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी स्मृतिग्रंथ
पृष्ठसंख्या : 164
प्रकाशक : इतिहासाच्या पाऊलखुणा
बहुउद्देशीय संस्था -
पुस्तकासाठी संपर्क :9860366388
 
 
 
Powered By Sangraha 9.0