सुश्मिता यांचे समाजसेवेचे बिटकॉईन

    05-Aug-2022
Total Views |

techpose
 
 
 
सामाजिक कार्य करणे ही बरेचदा ‘फॅशन’ बनत चालली आहे की काय, इतकी ती सपक झालेली दिसते. सामाजिक कार्याच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. याच चुकीच्या गोष्टींना टाळून त्यातून सामाजिक संस्था आणि देणगीदार यांना एकत्र एका मंचावर आणून त्यांचे काम सुलभ करण्यासाठी, तसेच या संपूर्ण व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीचे सार्थक होत आहे, हे समाधान मिळवून देण्याचे काम आपल्या ‘टेकपोज’ या ‘स्टार्टअप’मधून केले आहे सुश्मिता कनेरी यांनी. त्यांच्याविषयी...
 
सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वात मोठी समस्या असते, ती पैशांच्या पाठबळाची. अनेक सामाजिक संस्था याच कारणामुळे व्यवस्थित काम करू शकत नाहीत. याच समस्येवर उपाय म्हणून ’क्राऊड फंडिंग’ संकल्पनेचा जन्म झाला. या संकल्पनेचा फायदा अनेक सामाजिक संस्थांना होत आहे. पण, याच संकल्पनेचे दुष्परिणाम लवकरच समोर आले. बरेचदा काळा पैसा सामाजिक कार्यासाठी गुंतवला जाणे, देणगीदारांनी कुठल्या मार्गाने पैसे उभे केले आहेत याची काहीच माहिती नसणे, सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर, सामाजिक कार्याच्या नावाखाली गैरप्रकार यांसारख्या अनेक समस्या समोर आल्या आणि त्यातून या सामाजिक संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. सामाजिक संस्थांबद्दल जनतेच्या मनात कायमच संशयाचे वातावरण निर्माण झाले. केंद्र सरकारनेही आता या बाबतीतले नियम अधिक कठोर करून या सर्व प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण, अजूनही या समस्येचे पूर्णत: समाधान झालेले नाही.
 
नेमक्या याच सर्व गोष्टींना टाळून ‘टेकपोज’ काम करते, त्यांच्या ‘गुल्लक’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून. कोरोना महामारीच्या काळात भारतात अनेक सामाजिक संस्थांना मिळणार्‍या देणग्यांमध्ये वाढ होऊ लागली होती. त्यातून अनेक ठिकाणी सामाजिक कार्यांना सुरुवात करण्यात आली होती. देणग्या देण्यामध्ये भारत जगातील पहिल्या चार देशांमध्ये होता. वास्तविक हे चित्र खूप चांगले होते, पण यातून लवकरच अनेक गैरप्रकार उघडकीस यायला लागले. हेच चित्र बदलण्यासाठी आणि या प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तर शोधण्यासाठी ऐन कोरोना टाळेबंदीच्याच काळात डिसेंबर 2020 मध्ये सुश्मिता यांनी आपल्या ‘टेकपोज’ या ‘स्टार्टअप’ची स्थापना केली. ‘टेक्नोलॉजी फॉर पर्पज टू क्रिएट सोशल इम्पॅक्ट’ हाच या ‘टेकपोज’चा हेतू. यातून देणगीदारांना फक्त देणगी देण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांना त्यांच्या कामातून प्रत्यक्ष समाधान मिळवून देणे, हाच या मागचा मूळ उद्देश आहे. या ‘टेकपोज’चे पहिले उत्पादन आहे ‘गुल्लक.’
 
‘गुल्लक’ म्हणजे साध्या भाषेत सांगायचे, तर एक सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना आणि देणगीदारांना एकत्र आणणारा एक ‘सोशल डोनेशन प्लॅटफॉर्म.’ या प्लॅटफॉर्मवर दोन पद्धतींनी देणगी स्वीकारली जाते. एक म्हणजे प्रत्यक्ष पैशांच्या माध्यमातून आणि दुसरे म्हणजे, जे लोक पैसे देण्यास इच्छुक नाहीत, ते सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपली भूमिका बजावू शकतात. य दोन्ही माध्यमांतून इथे काम होते. या ‘गुल्लक’ प्लॅटफॉर्मवर असेच ‘प्रोजेक्ट्स’ येऊ शकतात, ज्यांच्या माध्यमातून काहीतरी मोठे प्रभावशाली काम होते आहे आणि असेच प्रोजेक्ट्स ज्यांच्याकडे स्वतःचे अर्थार्जनाचे मार्ग तयार करण्याची क्षमता आहे, असेच प्रोजेक्ट्स या ‘गुल्लक’वर स्वतःची नोंदणी करू शकतात. या दोन्ही गोष्टींमागे एकाच हेतू आहे की, आपण जे काही काम करत आहोत, त्याचा खरोखरीच समाजाला काही फायदा होतो आहे का, ते पाहणे. परंतु, कायमच लोकांच्या देणग्यांवर अवलंबून राहून कुठलेही सामाजिक काम यशस्वी होणार नाही. त्यामुळे या सामाजिक संस्थांना स्वतःच्या अर्थार्जनाचे मार्ग तयार करणे, महत्त्वाचे राहील. यासाठी इंग्रजीतील एक वाक्य आपला महत्त्वाचे वाटते, असे सुश्मिता सांगतात, ’Teach him how to fish and you would feed for his lifetime’ हे ते वाक्य!
 
आत ‘गुल्लक’ कसे काम करते, हे आपण दोन उदाहरणांवरून समजून घेऊ. सर्वात पहिले उदाहरण म्हणजे एखादा देणगीदार जर ‘गुल्लक’कडे देणगी देण्यासाठी येत असेल, तर कशी प्रक्रिया असेल... जेव्हा एखादा देणगीदार ‘गुल्लक’कडे येतो, तेव्हा त्या देणगीदाराला नक्की कुठल्या कामासाठी देणगी द्यायची आहे, याची माहिती आधी ‘गुल्लक’कडे जमा करावी लागते. यानंतर त्या देणगीदाराची प्राथमिक ’केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केली जाते. यातून त्या देणगीदाराची खातरजमा करूनच मग पुढे काम सुरु करण्यात येते. आता ‘गुल्लक’कडे अगदी दहा रुपयांची देणगी देण्यासाठी जरी आला तरी ही सर्व प्रक्रिया त्याला पूर्ण करावीच लागते. पुढची प्रक्रिया म्हणजे, या देणगीचे पुढे काय होत आहे, याची सर्व माहिती त्या देणगीदाराला मिळू शकते. म्हणजे तो जर दहा रुपये जरी गुंतवत असला, तरी त्याचे पैसे कुठल्या सामाजिक संस्थेच्या कुठल्या कामासाठी वापरले गेले, त्यातून नक्की किती काम झाले, देणगीतील पैसे उरले असतील, तर ते नेमके का खर्च झाले नाहीत, या सर्व गोष्टींची माहिती त्या देणगीदाराला मिळू शकते आणि ही माहिती संपूर्णपणे गोपनीय ठेवली जात असल्याने त्यात कुठलाही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतलेली असते.
 
बरेचदा अनेक सामाजिक संस्थांना त्यांचे काम लोकांसमोर कसे आणायचे, हा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना त्यांचे काम मोठे करण्यात, निधी जमवण्यात, एकूणच काम चालवण्यात बर्‍याच अडचणी येत असतात. असे चांगले काम करूनसुद्धा दुर्लक्षित राहिलेल्या सामाजिक संस्थांना पुढे येण्यासाठी ‘गुल्लक’ मदत करते. अशा संस्थांचे काम समजून घेऊन त्यांच्या कामाला लोकांसमोर कसे आणायचे, यासाठी एक व्यवस्थित आराखडा ‘गुल्लक’ तयार करते. यानंतर त्यांचे काम कशा पद्धतीचे आहे, त्यानुसार त्यांना कशापद्धतीने काम केले पाहिजे, यासाठी मार्गदर्शन करणे. त्यानंतर या सामाजिक संस्थांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यासाठी काय करता येईल, याचाही आराखडा तयार करण्यासाठी ‘गुल्लक’ मदत करते. यासाठी लागणारे व्हिडिओज्, तसेच सोशल मीडिया पोस्ट्स, डॉक्युमेंटरीज् अशा माध्यमातून त्यांना लोकांसमोर आणले जाते. तसेच त्यांना देणगीदारांपर्यंत पोहोचवले जाते. त्यातून त्यांना आर्थिक मदत कशी उभी करता येईल, यासाठीही मार्गदर्शन केले जाते, हेच ‘गुल्लक’चे वैशिष्ट्य आहे.
 
सामाजिक संस्थांसाठी सर्वात मोठे आव्हान सध्या विश्वासार्हता टिकवणे हेच आहे. कारण, या विश्वासार्हतेतूनच त्यांचे सामाजिक काम लोकांसमोर येणार आहे आणि त्यांना स्वबळावर स्वतःची कामे करणे, म्हणजे कोणाच्याही दडपणाखाली न येता काम करणे शक्य होईल. यासाठी अशाच पारदर्शक संस्थांची गरज आहे. जिथे देणगीदार आणि संस्था या दोघांचेही हित साधले जाईल, असे मत सुश्मिता नोंदवतात. आता या संपूर्ण क्षेत्रात काही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी सरकारने पुढाकार घेऊन बर्‍याच गोष्टींचे नियमन करण्याची सुरुवात केली आहे. त्यातून देणगीदाराचा तपशील उघड करणे, हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी देताना ‘पॅनकार्ड’ अत्यावश्यक करणे, यांसारखे नियम सरकारने आणले आहेत. पण, अजूनही हे प्रयत्न अपुरे आहेत. लवकरच यातही सुधारणा होतील, अशी आशा सुश्मिता व्यक्त करतात.
 
स्वतः कोरोनासारख्या अनिश्चित काळात उद्योग सुरू करण्याचे धाडस करणार्‍या सुश्मिता विचारांच्या वेगळेपणावर भर देतात. “प्रत्येक उद्योजकाला आपल्या स्वतःच्या विचारांवर विश्वास असणे गरजेचे आहे, तरच तो उद्योग सुरू करू शकतो आणि त्याच्यावर इतर लोक विश्वास ठेवू शकतात. फक्त नवीन संकल्पना मांडून चालणार नाही, पण त्या संकल्पनेतून खरेच उद्योग उभा राहू शकतो का, यासाठी मार्केटचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी असतील तरच उद्योग सुरू करणे आणि मोठा करणे शक्य आहे,” असे सुश्मिता आग्रहाने सांगतात आणि हाच कुठल्याही उद्योगाचा पाया असणार आहे आणि यातूनच उद्योग उभा राहू शकणार आहे.
 
स्वतःच्या नवीन संकल्पनेतून प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकणारी उद्योगाची संकल्पना मांडून ती यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरवून दाखवणार्‍या सुश्मिता कनेरी यांचा प्रवास स्पृहणीयच आहे.
 
  - हर्षद वैद्य
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.