विरोध मोदींना कि तिरंग्याला?

    05-Aug-2022
Total Views |
rahul gandhi  
 
 
 
 
बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारे अमोल मिटकरी यांनी हर घर तिरंगा म्हणजे फालतू आणि देशाच्या नावाने बाजार मांडणारी मोहीम आहे. तसेच देशात लोकांना शिक्षण नाही शेतकऱ्याला न्याय नाही वगैरे वगैरे टीका करून आजादीचे पंचाहत्तर वर्ष का साजरे करताय ही सगळी बोगसबाजी आहे असे म्हणत पुन्हा अकलेचे तारे तोडले. दुसरीकडे शोशल मिडीयावर आपले प्रोफाईल पिक्चर म्हणून तिरंग्याचे फोटो ठेवा या पंतप्रधानांच्या आवाहनावर कॉंग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली. जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर नतमस्तक होण्या व्यतिरिक्त इतर कशाचेही महत्त्व वाटत नाही.
 
 
 
अमोल मिटकरींच्या बरळण्यामागचे कारण काय -
  
ब्रिटिशांच्या दडपशाहीविरोधात क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी वर्षानुवर्षे लढा दिला आणि दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदा भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा व्हावा असा केंद्र सरकारचा मानस आहे. आणि म्हणूनच देशभरात ‘हर घर तिरंगा’ किंवा ‘घरोघरी तिरंगा अभियान’ सुरू केले. देशभरातून देखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पण त्यामुळे अनेकांचा पोटशूळ उठला आहे.
 
 
 
 
आता मोदीविरोधाच्या नादाने घराण्याच्या म्होरक्यांची आपल्यावर कृपादृष्टी पडावी, या उद्देशानेच मिटकरी प्रवृत्तीचे लोक ‘हर घर तिरंगा’ अभियानाला विरोध करतात आणि वाट्टेल ते बरळत सुटलेत. पण, तिरंगा फक्त मोदींचा किंवा भाजपचा नाही, इतकीही अक्कल त्यांना राहिली आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे इतरांचे आणि आपल्या नेतृत्वाचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणूनच मिटकरींनी असे बेताल वक्तव्य केले आहे.
 
 
 
 
राष्ट्रध्वजाबाबत काँग्रेसचे राजकारण हातात तिरंगा घेतलेल्या जवाहरलाल नेहरु यांचे छायाचित्र ‘डिपी’ म्हणून लावायला सुरुवात केली. -
 
भारताला स्वातंत्र्य आमच्यामुळेच मिळाल्याचे सांगण्यासाठी आणि आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी काँग्रेसने ‘हर घर तिरंगा’ अभियानादरम्यान नेहरु-गांधी कुटुंबाचे गोडवे गायला सुरूवात केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्व देशवासीयांनी आपल्या घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन करतानाच फेसबुक, व्हाट्सअॅनप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमी खात्यांचा ‘डिपी’ म्हणूनही तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले होते.
 
 
 
त्याला सर्वसामान्य जनतेसह विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींनीही उत्तम प्रतिसाद दिला. पण, ते न पाहवलेल्या काँग्रेसने राष्ट्रध्वजाऐवजी हातात तिरंगा घेतलेल्या जवाहरलाल नेहरु यांचे छायाचित्र ‘डिपी’ म्हणून लावायला सुरुवात केली. आता काँग्रेससाठी राष्ट्रध्वज महत्त्वाचा नाही, तर नेहरु-गांधी कुटुंब महत्त्वाचे आहे का असा प्रश्न काँग्रेसच्या कृत्याने उपस्थित होतो.
 
 
 
भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली व्यंकय्या यांना वाऱ्यावर सोडणारी कॉंग्रेस -
 
भारताचे अस्तित्व केवळ नेहरु-गांधी कुटुंबामुळेच असून ते नसते, तर भारताचे अस्तित्वच राहिले नसते, असे काँग्रेसींना वाटते. म्हणूनच तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी, हातात तिरंगा घेतलेल्या जवाहरलाल नेहरुंना दाखवण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले. पण, याच काँग्रेसींनी भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली व्यंकय्या आपल्या अखेरच्या काळात एका झोपडीत, दारिद्य्रात खितपत पडत, लाचारीचे जिणे जगत असताना त्यांची मदत करण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आजही काँग्रेसींना तिरंग्याशी काहीही घेणेदेणे नाही, त्यांना फक्त नेहरु-गांधी घराण्याचा उदो उदो होण्याशी मतलब आहे. म्हणूनच त्यांनी राष्ट्रध्वजापेक्षाही आपल्या माजी नेत्याचे छायाचित्र फडकावले असे म्हंटले तर त्यात चूक काय?
 
 
 
नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा करताच, काँग्रेसींनी आणखी एक आक्षेप घेतला, तो म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्याच्या ५२ वर्षांपर्यंत राष्ट्रध्वज फडकावला नाही, याबद्दल तथ्य जाणून घेऊयात -
 
‘इतिहास साक्षी आहे की, ‘हर घर तिरंगा’ अभियान चालवणारे ‘त्या’ देशद्रोही संघटनेचे अपत्य आहेत, ज्यांनी ५२ वर्षांपर्यंत तिरंगा फडकावला नाही,’ असे राहुल गांधी ट्विटरवर म्हणाले. पण, रा. स्व. संघावर तिरंगा न फडकावल्याचा आरोप करणार्याल राहुल गांधींना ध्वजसंहिता ठावूक नाही का? सुधारणा होण्याआधीच्या ध्वजसंहितेनुसार १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीव्यतिरिक्त अपवाद वगळता अन्य कुठेही राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती, त्यावर निर्बंध होते. ते निर्बंध हटवण्यासाठी भाजप नेते अटलबिहारी वाजपेयींना पंतप्रधानपदी यावे लागले, त्यांनीच २००२ साली ध्वजसंहितेत विशेष दुरुस्ती केली आणि राष्ट्रध्वज फडकावण्यासाठीच्या जाचक अटी व नियम रद्द केले.
 
 
 
त्याआधीच्या ध्वजसंहितेनुसार मंजुरी नसलेल्या ठिकाणी वा मंजुरी नसलेल्या प्रकारे राष्ट्रध्वज फडकावल्यास तो राष्ट्रध्वजाचा अवमान मानले जात होते. राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या उदात्त हेतूनेच इच्छा असूनही अनेकांना तिरंगा फडकावता येत नव्हता, तो कॉंग्रेसच्या धोरणांमुळे. कारण १९५० वा १९७१च्या ध्वजसंहितेची निर्मिती काँग्रेसी सरकारांनीच केली होती,मग त्याबाबद खरे गुन्हेगार कोण?
 
 
 
राहुल गांधींच्या अतिशहाणपणाने पाकिस्तानने उठवला फायदा -
 
राहुल गांधी आज पन्नाशीचे आहेत तरीही ते कुक्कुलं बाळ असल्याप्रमाणे कॉंग्रेसीं त्यांना राहुलबाबा असे संबोधतात. असो तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण हेच राहुलबाबा बऱ्याचदा देशाला घातक ठरेल असे वर्तन आणि वक्तव्य करतात. जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर तिथे लोक मरत आहेत, असे विधान राहुल गांधींनी केले होते. आणि त्याच विधानाचा हत्यारासारखा वापर करत पाकिस्तानने दि. २७ ऑगस्ट, २०१९ रोजी संयुक्त राष्ट्रात सादर केलेल्या पत्रातून भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन व हिंसाचार करत असल्याचा आरोप केला.
 
 
 
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणार्याे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा उल्लेख राहुल गांधींनी ‘मसूद अजहरजी’ असा आदरार्थी केला होता. ओडिशातील कारोपूटमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर आक्रमण केल्याचे व आपले लोक हुतात्मा झाल्याचे म्हटले होते. त्यातून त्यांना भारतच हल्लेखोर असल्याचे जगाला सांगायचे होते का?. ‘सर्जिकल स्टाईक’वेळी राहुल गांधींनी त्याला ‘खून की दलाली’ म्हटले होते. डोकलाममधील तणावावेळीही राहुल गांधींनी भारतीय सैन्य वा पंतप्रधानांवर विश्वास ठेवण्याऐवजी लपून छपून चिनी राजदूत लिओ झाओहुई यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशविरोधी धोरण कोण राबवतय हे अगदी स्पष्ट होतंय.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.