भारतीय नौदलाच्या महिला वैमानिकांनी रचला इतिहास!

    05-Aug-2022
Total Views |


women
 
 
नवी दिल्ली: पोरबंदर येथील नेव्हल एअर एन्क्लेव्ह, स्थित भारतीय नौदलाच्या INAS 314 च्या पाच महिला अधिकार्‍यांनी ०३ ऑगस्ट २०२२ रोजी, डॉर्नियर २२८ विमानातून उत्तर अरबी समुद्रात स्वतंत्र टेहळणी आणि देखरेख मोहीम पूर्ण करून इतिहास रचला. या पथकात सर्व महिला होत्या. महिलांची अशा प्रकारे स्वतंत्रपणे राबवण्यात आलेली ही पहिलीच मोहीम होती.
 
 
या विमानाच्या कॅप्टन, मोहिमेच्या प्रमुख लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा होत्या. त्यांच्या पथकात वैमानिक लेफ्टनंट शिवांगी आणि लेफ्टनंट अपूर्वा गिते, टॅक्टिकल अँड सेन्सर अधिकारी, लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत होत्या. INAS 314 हे गुजरातमधील पोरबंदर येथे तैनात असलेले नौदलाचे आघाडीचे हवाई पथक असून अत्याधुनिक डॉर्नियर २२८ सागरी टेहळणी विमानाचे परिचालन करते. या हवाई पथकाचे नेतृत्व कुशल नेव्हिगेशन इन्स्ट्रक्टर असलेल्या कमांडर एस. के. गोयल यांच्याकडे आहे.
 
या ऐतिहासिक मोहिमेपूर्वी महिला अधिकाऱ्यांना अनेक महिन्यांचे प्रशिक्षण आणि मोहिमेचे सर्वसमावेशक बारकावे सांगण्यात आले होते. 
 
भारतीय नौदल सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आघाडीवर आहे. महिला सशक्तीकरणाच्या या प्रभावी आणि अग्रगण्य उपक्रमांमध्ये महिला वैमानिकांची भर्ती, हेलिकॉप्टर परिचालनात महिला हवाई संचालन अधिकाऱ्यांची निवड आणि २०१८ मध्ये सर्व महिला असलेल्या पथकाची सागरी जगपरिक्रमा,यांचा समावेश आहे.
 
या प्रकारची ही पहिलीच लष्करी हवाई मोहीम अनोखी होती आणि त्यामुळे विमान परिचालन क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांना अधिक जबाबदारी स्वीकारण्याचा आणि अधिक आव्हानात्मक भूमिकांची आकांक्षा बाळगण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. संपूर्णपणे महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने स्वतंत्रपणे टेहळणी मोहीम हाती घेणे हे सशस्त्र दलांसाठी एक अनोखे यश आहे.
 
मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आणि संपूर्ण भारतातील तसेच जगातील लाखो महिलांना प्रेरणा दिल्याबद्दल आणि सर्व बंधनांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल या अधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. "नारी शक्ती" चे खऱ्या अर्थाने दर्शन घडवणारी ही मोहीम होती.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.