सलीम फ्रुट असं चालवायचा दाऊदचं मुंबईतील नेटवर्क

05 Aug 2022 12:48:20

dawood

 
 
 
 
मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील सलीम फ्रुट याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी अटक केली. कुख्यात गँगस्टर छोटा शकील हा सलीम फ्रुटचा मेव्हणा आहे. एनआयएने ताब्यात घेतलेल्या सलीम फ्रुट याचं खरं नाव सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी असं असून त्याला मुंबई सेंट्रलमधील अरब लेन भागातून अटक करण्यात आली आहे.
 
 
 
दाऊद इब्राहिम कासकर व त्याच्या साथीदारांद्वारे तस्करी, अमली पदार्थांद्वारे दहशतवादी कृत्य, मनी लाँड्रिंग, दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे, त्यासाठी मालमत्तेचा अनधिकृत ताबा घेऊन तो निधी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदासारख्या संघटनांना पुरवणे, अशा कृत्यात सलीम फ्रुट सहभागी असल्याची माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे एनआयएने म्हटलं आहे.
 
 
 
विशेष म्हणजे माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या डी कंपनीशी संबंधित व्यवहार प्रकरणाच्या आरोपांप्रकरणी एनआयएने सलीम फ्रुटची चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशीने मुंबईतील एका नामांकित बिल्डरला धमकी दिली होती. त्या प्रकरणात फ्रुटला अटक करण्यात आली आहे. सलीमने दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसच्या नावाने धमकी दिली होती. तसेच त्याने बिल्डरकडे त्याच्या सुरू असलेल्या एका प्रोजेक्टमधील दोन फ्लॅटची डिमांड केलेली होती.
 
 
 
कौटुंबिक नात्यामुळे सलीम फ्रूट छोटा शकीलच्या अगदी जवळ आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते.
 
 
 
दाऊदच्या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजियाली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. घरावर छापा टाकल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांना माहीम येथील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली.
 
 
 
या प्रकरणात NIA ने अब्दुल कय्युम नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करत आहे, जो 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. परंतु, नंतर खटल्याच्या वेळी पुराव्याअभावी विशेष टाडा न्यायालयाने सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0