ओढत, फरफटत प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

    05-Aug-2022
Total Views |

p gandhi
 
नवी दिल्ली: महागाई आणि बेरोजगारीविरोधात आंदोलनं करत काँग्रेस आक्रमक झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनात पोलीस पुढे जाऊ देत नसल्याने प्रियंका गांधी रस्त्यावरच ठाण मांडून बसल्या होत्या. यावेळी महिला पोलिसांनी प्रियंका गांधीना ओढत, फरफटत ताब्यात घेतलं.
 
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेस केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करत आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा रोखत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
 
दिल्लीसह मुंबई, नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतलं. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला.
 
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. "केवळ काँग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेता किंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते. जेवढं मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते." असे राहुल गांधी म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.