मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांचे कमबॅक !

05 Aug 2022 14:44:50

Pravin darekar 
 
 
 
मुंबई : मुंबईच्या राजकारणात महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांचे कमबॅक झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीची सूत्रे हाती घेत १७ जागा बिनविरोधपणे निवडून आणण्यात यशस्वी झालेल्या दरेकरांना यश आले होते, मात्र तत्कालीन परिस्थितीत निर्माण झालेली महाविकास आघाडी, अजित पवार - आदित्य ठाकरेंनी घेतलेली भूमिका यामुळे दरेकरांना बँकेच्या अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले होते.
मात्र, बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अवघ्या सहा महिन्यांमध्ये आपल्या राजकीय कौशल्याने प्रवीण दरेकरांनी मुंबै बँकेत आपली सत्ता प्रस्थापित केली असून राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीसह ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
महाविकास आघाडीला झटका देत भाजप पुन्हा सत्तेत

मुंबै जिल्हा बँक निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार पॅनलचे १७ उमेदवार निवडून आले होते. उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दरेकरांनीच बाजी मारली होती. मात्र, ऐनवेळी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी विचित्र समीकरणे जुळवून दरेकरांना अध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यात दरेकरांनी मुंबै बँकेत आपले वर्चस्व प्रस्थापित करून महाविकास आघाडीला तगडा झटका दिला असून भाजपने पुन्हा एकदा सत्तेत कमबॅक केले आहे.


 
Powered By Sangraha 9.0