सौदी अरेबियातही मूर्तिपूजा

    05-Aug-2022   
Total Views |

islamik
 
 
मुस्लिमांची मक्का आणि मदिनेसारखी पवित्र शहरे स्थित असल्याने सौदी अरेबियाला ‘इस्लामचा बालेकिल्ला’ म्हटले जाते. दरवर्षी लाखो मुस्लीम हज यात्रेसाठी सौदी अरेबियात येतात आणि आयुष्य सार्थकी लागल्याचे समजतात. पण, आता मात्र सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झालेल्या उत्खननात हजारो वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले असून त्यातून इथे हिंदू संस्कृती नांदत असल्याचे दिसून येते.
 
 
देशातील जनतेला आपल्या पुरातन वारशाची माहिती व्हावी म्हणून पुरातत्त्ववेत्यांनी इथे सर्वेक्षण आणि खोदकाम सुरू केलेले आहे. सौदी अरेबिया आणि फ्रान्सच्या पुरातत्त्ववेत्यांच्या ‘सौदी अरेबिया वारसा आयोगा’तील पुरातत्त्ववेत्यांना सौदी अरेबियाच्या दक्षिण-पश्चिम भागातील अल-फॉ या ठिकाणी केलेल्या खोदकामात तब्बल आठ हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आणि यज्ञवेदीचा शोध लागला आहे. या प्राचीन मंदिराचे नाव ‘रॉक-कट’ असे सांगितले जात असून ते माऊंट तुर्वाईकच्या जवळ आहे. विशेष म्हणजे, हिंदूंच्या यज्ञवेदी ज्या दिशेला तोंड करून असतात, त्याच दिशेला ‘अल-फॉ’ या ठिकाणी सापडलेल्या यज्ञवेदीचे तोंड आहे. याव्यतिरिक्त देवदेवतांची चित्रे कोरलेले अनेक अवशेषही या ठिकाणी आढळले आहेत.
 
 
तसेच, या ठिकाणी मानवी वस्तीच्या अवशेषांसह २ हजार, ८०७ थडग्यांचाही शोध लागला आहे. ही थडगी एकाच काळातली नसून वेगवेगळ्या काळात बांधलेली आहेत. त्यावरून इथे एकेकाळी मानवी वस्ती राहत असल्याचे समजते, तर मंदिर आणि यज्ञवेदी हिंदू संस्कृतीची पुष्टी करतात, असे पुरातत्त्ववेत्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. उत्खननात सापडलेले धार्मिक शिलालेख तत्कालीन लोकांना धर्माची किती समज होती, हेही सांगतात. शिलालेखात माधेकर बिन मुनैम नावाच्या एका व्यक्तीचाही उल्लेख आलेला आहे.
 
 
अहवालानुसार, या संस्कृतीत जटील सिंचन व्यवस्था होती. कालवे, पाण्याचे तलाव याव्यतिरिक्त शेकडो खड्डेही इथे खणलेले होते. त्याद्वारे पावसाचे पाणी शेतात पोहोचवले जात असे. वाळवंटी भाग असल्याने त्या काळातील लोक पाणी साठवण्यासाठी कठोर मेहनत घेत असत. तत्कालीन लोक केवळ शेतीच करत नव्हते, तर त्यांच्यात संघर्ष, लढायाही होत असत. समोर आलेल्या अवशेषांतून त्याचीही माहिती मिळते. इथे यापुढेही उत्खनन आणि संशोधनाचे काम सुरूच राहील, जेणेकरुन नवनवीन माहिती समोर येईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.
 
 
दरम्यान, सौदी अरेबियातच मंदिर आणि यज्ञवेदीचे अवशेष आढळल्याने इथे मूर्तिपूजेवर चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, ही माहिती आता जमीन फोडल्याने बाहेर आली असली तरी सौदी अरेबियाचे मूर्तिपूजेशी हजारो वर्षांपासूनचे नाते असल्याचा दावा अनेक इतिहासकारांनी याआधीच केलेला आहे. इस्लाममध्ये मक्केतील काबा या ठिकाणाला पवित्र स्थळ मानले जाते. पहिल्या शतकातील रोमन इतिहासकार द्यौद्रस सलसच्या मते भगवान शिव आणि काबामध्ये प्राचीन काळापासून संबंध आहे.
 
 
तथापि, सध्याच्या घडीला बिगर मुस्लीम व्यक्तीच्या काबामध्ये जाण्यावर बंदी आहे. हज यात्रेदरम्यान इस्लामानुयायी काबाचे पूजन करतात आणि चुंबन घेतात. अनेक लोक याला भगवान शंकराचे रुप मानतात. आज मक्का ज्या ठिकाणी आहे, त्या जागेवर आधी मक्केश्वर महादेवाचे मंदिर होते, असेही म्हटले जाते. याच ठिकाणी काळ्या पाषाणाच्या रुपात विशाल शिवलिंग होते, जे आता खंडित अवस्थेत आहे. रोमन इतिहासकाराने केलेले लिखाण सौदी अरेबियातील मूर्तिपूजेला बळकटी देते.
 
 
भारतीय इतिहासकार पु. ना. ओक यांनीही आपल्या पुस्तकात मक्केबाबत लिहिलेले आहे. मक्केमध्ये इस्लाम पोहोचण्याआधी इथे मूर्तिपूजेचा वारसा चालत आलेला होता, असे त्यांनी लिहिले. एकेकाळी इथे हिंदू देवदेवतांची मंदिरे होती, असे त्यांचे म्हणणे आहे. असे म्हटले जाते की, प्राचीन काळापासून युनान आणि भारतात मूर्तिपूजा होत आली. पण, त्याचा प्रभाव फक्त या ठिकाणीच राहिला नाही, तर ही प्रथा इतर देशांच्या मार्गाने सौदी अरेबियातही पोहोचली.
 
 
तथापि, मक्केतील ज्या पाषाणाला हिंदू वा काही इतिहासकार भगवान शंकराचे रुप मानतात, तसे इस्लामानुयायी मात्र मानत नाहीत. मुस्लिमांच्या मते, आदम आणि ईव्हसोबत मक्केतील पाषाण जन्नतमधून इथे आला. आता मात्र, सौदी अरेबियातच मंदिर, यज्ञवेदी व मूर्तिपूजेचे अस्तित्व आढळल्याने हिंदू संस्कृतीचे प्राचीनत्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.