दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती...

    05-Aug-2022
Total Views |
 
mansa
 
 
या माणसांना माणसातला देव सापडला तो अपंग आणि अनाथ प्राण्यांच्या सेवाकार्यात... अशा या ‘पाणवठा’ या संस्थेचे गणराज जैन आणि त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना जैन यांच्याविषयी....
 
 
आपल्या सभोवताली अनेक अनाथाश्रमे, वृद्धाश्रमे आहेत. परंतु, मुक्या प्राण्यांची व्यथा कोण जाणणार? त्यांच्या वेदनेवर फुंकर कोण घालणार? त्या वेदना समजल्या, जाणल्या त्या गणराज जैन यांनी. २००५ साली जेव्हा मुंबई आणि परिसरात महापुराने थैमान घातले, त्यात माणसांना मदत तर मिळाली, पण मुक्या प्राण्यांचे काय झाले? असे असंख्य पूर येतात आणि ओसरतात, पण घर फक्त माणसेच नाही, तर हे चिमुकले जीवही उद्ध्वस्त होतात. पाळीव प्राण्यांवर आपण हजारो-लाखो रुपये खर्च करतो. पण, एखादा जखमी श्वान आपल्याला वाटेत दिसला, तर आपण वाट वाकडी करून जातो. पण, जैन दाम्पत्याने आपल्या दोन मुलांसह अशा असंख्य मुक्या जीवांना आपल्या पोटचे मूल मानले आणि त्यांना हक्काचा निवारा दिला.
 
 
 
mansa
 
 
 
२००५ साली गणराज जैन जखमी आणि अनाथ प्राण्यांचे पालक झाले. परंतु, त्यांचे हे कुटुंब विस्तारत गेले ते २०१३ साली घडलेल्या एका प्रसंगानंतर. आपल्या प्राणांपलीकडे जपणार्‍या या प्राण्यांची काळजी घेताना एक दिवस खरेच एक प्रसंग त्यांच्या प्राणांवर बेतला; एका जखमी विषारी सापाचे उपचार करताना त्याने गणराज यांना दंश केला आणि ते जवळपास सात ते आठ दिवस कोमात होते आणि प्रकृती सुधारल्यानंतर, ’आता हे आयुष्य काही करण्यासाठी मिळाले आहे, आता थांबायचे नाही,’ असा निर्धार करुन त्यांनी जोमाने आपले काम सुरू केले. सुरुवातीला आपल्या ’सफर’ या संस्थेच्या माध्यमातून ते केवळ जखमी प्राण्यांवर उपचार करीत होते. परंतु, जे प्राणी अपंग, अंध आहेत, ते पुन्हा कोणत्यातरी अपघाताचे शिकार ठरणार, त्यामुळे त्यांना हक्काची जागा हवी, त्यामुळे या अपंग जीवांसाठी जैन दाम्पत्याने ’पाणवठा’ संस्था सुरू केली.
 
 
आपल्या मुलांच्या शाळांची फी भरणे जिथे अवघड होते, तिथे या दाम्पत्याने एवढ्या मुलांना दत्तक घेतले होते. एखाद्या घरात जर दिव्यांग मूल असेल, तर त्याची सुश्रुषा करणे हे जेवढे कठीण तेवढेच कठीण या प्राण्यांची देखभाल करणे होते आणि हे आव्हान गणराज यांनी स्वीकारले. जिथे लोक पाळीव प्राण्यांच्या उच्च प्रजाती पाळतात, तिथे हे कुटुंब पाय तुटलेले, किडे पडलेले, मरणाच्या दारात असलेले, विद्रूप झालेले प्राणी पाळून त्यांची देखभाल करू लागले. आणि चार-पाच प्राण्यांपासून सुरू झालेले पिल्लांचे उपचार, आज साडेचारॉ प्राण्यांना जैन दाम्पत्याने बरे केले आहे, तर आजही त्यांच्या बदलापूरमधील चामटोली गावात असलेल्या ’पाणवठा’मध्ये १०० हून अधिक अपंग प्राणी निवास करत आहेत. एखादा प्राणी पाळून त्याला गुबगुबीत करणे, हे फार कठीण नाही. परंतु, या अशा अपंग प्राण्यांचे पालकत्त्व स्वीकारून त्यांना जीवनदान देणे, यात देवत्व दिसून येते.
 
 

mansa 
 
 
गणराज जैन आणि त्यांची पत्नी डॉ. अर्चना जैन यांनी फक्त कुत्रे, मांजरी, खार, कावळा-चिमणी एवढ्याच प्राण्यांवर उपचार केले नाहीत तर मगर, घार यांचाही त्यांच्या कुटुंबात समावेश झाला. महाड जवळील सावित्री नदीत काही काम सुरू असताना, मगरीच्या जबड्याला ‘जेसीबी’मुळे जखम झाली. तिच्यावर उपचार करणे सर्वाधिक जोखमीचे होते. परंतु, त्यांना या कामात वनविभागाचे साहाय्य मिळाले. परंतु, मगरीला आसरा देण्याएवढा मोठा पिंजरा उपलब्ध नसल्याने गणराज यांच्या घरात ही मगर तब्बल ३५ दिवसांची पाहुणी होती. काही दिवसांनी तीदेखील त्या कुटुंबात एवढी रुळली की, एखादं मांजरीचं पिल्लू सोफ्याखाली फिरावं तशी ही मगर फिरू लागली.
 
 
गणराज जैन यांच्या ’पाणवठा फाऊंडेशन’मध्ये आलेल्या प्राण्यांची परिस्थिती जेवढी बिकट होती, तेवढी बिकट परिस्थिती त्यांच्या कुटुंबाची होती. पेशाने डॉक्टर असलेल्या अर्चनाताई, दुर्गम भागात वनवासी लोकांचे उपचार करतात. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळत नाही. परंतु, तरीही हे दोघे आपल्या ध्येयापासून डगमगले नाहीत. त्यांची मुले जेव्हा लहान होती, तेव्हा आईबाबांचे लक्ष आपल्यापेक्षा जास्त या प्राण्यांकडे आहे, हे बघून साहजिकच त्यांचे बालमन कावरेबावरे व्हायचे. पण, जसजशी ही मुलं मोठी होऊ लागली तसतशी त्यांनाही या संवेदनेची जाणीव झाली आणि जशी ही पिल्लं या दाम्पत्याची मुले होती, तर ती त्यांची भावंडं झालीत आणि आपल्या आईबाबांच्या बरोबरीने तीदेखील या प्राण्यांची काळजी घेऊ लागलीत.
 
 
प्राण्यांवर उपचार करत असताना त्यांनी जरी हल्ला केला तरी जैन दाम्पत्याने ते विनातक्रार स्वीकारले. कारण, ही जखम हे त्यांचे सर्वांत मोठे समाधान आहे. कोणत्याही कामाची बेरीज जर समाधान असणार असेल, तर त्याची किंमत कितीही असली तरी चालू शकते. गणराज जैन याबाबत सांगताना म्हणतात, ’जर तराजूमध्ये एकीकडे या जखमांचे ओझे ठेवले आणि दुसरीकडे समाधान ठेवले, तर समाधानाचे परडे अधिक जड होते.’ आपण मनुष्य, किमान आभारासारखे शब्द बोलू शकतो. पण, या मुक्या जीवांच्या डोळ्यांत ओथंबून येणारे कृतार्थ भाव, त्यांची कृतज्ञता किती सहज व्यक्त करते, हे बघून आपले डोळेही नकळत ओलावतात आणि जैन दाम्पत्याचे एवढे निरपेक्ष देणे बघून बा. भ. बोरकरांच्या कवितेप्रमाणे, दिव्यत्वाची प्रचिती येत आपले कर केव्हा जोडले जातात, कळतही नाही.
 
 
mansa
 
 
 
 - वेदश्री दवणे
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.