सृजन आणि उल्हासाचा मावळलेला दीप

    05-Aug-2022   
Total Views |

vchm
 
 
सृजन व उल्हास हे दिलीप धारूरकरांच्या लिखाणाचे विशेष पैलू होते. मांडणी राष्ट्रवादी विचारांची असली तरी ती बोजड न होऊ देण्याची किमया त्यांनी उत्तम साधली होती. त्यांच्या देहावसानानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
 
 
दिलीप धारूरकर गेले ही बातमीच मुळात धक्का देणारी होती. इतकी धक्कादायक की अनेकांनी त्याची खात्री करावी, अशी विनंती केली. बातमी देणार्‍या माणसाला अशी कामेही करावी लागतात. ते करण्याचे दुर्दैव आले आणि आपण काय गमावले, याची जाणीव झाली. दिलीप धारूरकर नेमके कधी भेटले ते नक्की आठवत नाही, पण जेव्हा जेव्हा ते भेटले तेव्हा ते ‘काही तरी नवे करूया’ अशा आग्रहानेच भेटले.
 
 
धारूरकर इंजिनिअर होते, त्यांच्याकडे सरकारी नोकरी होती. लौकिक जगात ज्याला ‘राजपत्रित अधिकारी गट अ’असे म्हणतात, ते मिळविण्याची ऊर्जा आणि क्षमता दोन्ही त्यांच्याकडे होती. त्यांचा पिंड मात्र एखाद्या सृजनशील माणसाचा होता आणि या सृजनाची अभिव्यक्ती पत्रकारितेची होती. खरंतर पत्रकारिता ही ‘ग्लॅमर’ची गोष्ट; मात्र जी पत्रकारिता धारूरकरांनी निवडली, ती ‘ग्लॅमर’पेक्षा व्रतस्ताची अधिक होती. मग अशा व्रतस्थाला ज्या अग्निपरीक्षांना सामोरे जावे लागते, ते धारूरकरांनाही जावे लागले.
 
 
‘देवगिरी तरुण भारत’ हा त्यांचा प्राण होता. नाना मार्गांनी ते दैनिक चालावे, स्वयंसेवकांपर्यंत पोहोचावे यासाठी जे अनेक खटाटोप त्यांनी केले, त्याची गणती नाही. त्यानंतर आर्थिक विवंचनेत जाऊन ‘देवगिरी तरुण भारत’ बंद पडला. धारूरकरांना ध्येय हरविल्यासारखे वाटले. बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. पण, त्याचा फटका त्यांना बसला नाही. कारण, मुळातच धारूरकर प्रतिभाशाली होते. शब्द, वाक्य, भाषा या पत्रकारितेतल्या मूलभूत घटकांवर त्यांची पकड अफालतून होती. या तिन्ही घटकांशी ते लिलया खेळत. ‘देवगिरी तरुण भारता’नंतर काही खासगी दैनिकांत निरनिराळे प्रयोग धारूरकरांनी केले.
 
 
यात प्रामुख्याने लिखाण हाच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने‘मुंबई वार्ताहर प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली होती. महिन्यातून दोन वेळा पत्रकारितेच्या माध्यमातून काही करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांना पत्रकारितेचे प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांना लिखाणासाठी किंवा पत्रकारितेसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे, अशी ती एकंदर योजना होती. यात अनेक मंडळी सक्रिय होती. ‘तरुण भारत’ हा धारूरकरांना जिव्हाळ्याचा विषय. पुन्हा असे काही नवीन म्हटल्यावर त्यांनी भरपूर उत्साह दाखविला. त्यांची रसरशीत सत्रे व्हायची. लिखाण कसे करायचे? मथळे कसे काढायचे ? इंट्रो कसा द्यायचा? या आणि अशा कितीतरी विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मिळायचे.
 
 
थोरामोठ्यांशी त्यांचा संपर्क दांडगा होता. हा संपर्क कोरडा नव्हता, पण तो स्वार्थीही नव्हता. भेटणार्‍या प्रत्येक माणसाला ते चौकसपणे भेटायचे. एखादी व्यक्ती कशी बोलते, संवाद साधताना कोणते शब्द निवडते, वाक्याची फेक कशी असते, याचे निरीक्षण त्यांच्याकडून सतत व्हायचे. ते उत्तम नकलाकारही होते. कोणत्याही प्रकारची मदत करायला त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. त्यामुळे धारूरकरांना एखादा विषय लिहायला सांगितला की, हवा तसा लेख मिळणार यात काही शंका नसायची.
 
 
त्यांचा स्वभाव अत्यंत दिलखुलास! धारूरकरांचा सहवास एखाद्या तत्वज्ञापेक्षा मोकळ्या मित्रासारखा असायचा. कोट्या, फिरक्या, थोरामोठ्यांचे किस्से या सगळ्यांमुळे त्यांना भेटणे म्हणजे बहार असायचे. प्रचार विभागाच्या प्रदीर्घ चालणार्‍या बैठकांना धारूरकर भेटायचे. दिवसभर झालेल्या गंभीर चिंतनानंतर संध्याकाळ खुलविण्याचे काम ते करायचे. ‘देवगिरी तरुण भारता’नंतर काही खासगी दैनिकांतही त्यांनी संपादक म्हणून काम केले. मात्र, तिथे ते फारसे रमले नाहीत. लहान मुलांचे एक मासिकही त्यांनी काढले आणि ते यशस्वीपणे चालविलेही. यात वहिनींची त्यांना उत्तम साथ मिळाली. छपाई, वितरण आणि लिखाणसुद्धा. त्याही तितक्याच प्रतिभेच्या!
 
 
माध्यमविश्वातल्या कुठल्याही प्रयोगांना धारूरकर एका पायावर तयार होते. संघद्वेष्ट्या डाव्या आणि ढोंगी समाजवाद्यांनी व्यापलेल्या या क्षेत्रात आपले पाय रोवायचे असतील, तर माध्यमांतल्या निरनिराळ्या व्यासपीठांवर आपण असलेच पाहिजे, असा त्यांचा खाक्या होता. मात्र, लिखाण हाच ‘फॉर्म’ त्यांनी अखेरपर्यंत पाळला आणि सांभाळला. त्यांचा जन्म मराठवाड्यातला. कितीतरी काळ हा भाग डाव्या, समाजवाद्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली होता. त्यांची जागा नंतर संधीसाधू ढोंगी डाव्या-समाजवाद्यांनी घेतली.
 
 
धारूरकरांना त्यांची कुंडलीच माहीत होती. या मंडळींनी केलेले दावे, त्यातला दांभिकपणा, असत्य मांडणी करीत असताना वापरलेल्या संदर्भातले कच्चे दुवे पकडणे आणि त्याची चिरफाड करणे, यात धारूरकरांना मजा यायची. आपल्या लिखाणातून यात दांभिकपणावर ते तुटून पडायचे. जुने-नवे सगळेच संदर्भ त्यांना माहीत होते. स्वत:चे वाचन अफाट होते व मनन करण्याची हातोटीही होते. त्यामुळे चारही ‘तरुण भारत’मध्ये ‘प्रहार’ या सदरांतून आणि अन्य लेखांमधूनही त्यांनी आपल्या लिखाणाचा चाहतावर्ग निर्माण केला होता. धारूरकरांच्या लेखांना मागणीही होती आणि सन्मानही!
 
 
महाराष्ट्रात युतीचे दुसरे सरकार आले. तेव्हा, राज्याचे माहिती आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सरकारी नोकरी, त्यामुळे साहजिकच लिखाणावर मर्यादा आल्या. या सगळ्या काळात त्यांची एकमेव तक्रार होती ती म्हणजे, ‘आता मला हवे तसे लिहिता येत नाही.’ या काळात त्यांनी भरपूर वाचन केले. विषय म्हणून लिहित्या लोकांना भरपूर सूचनाही केल्या. माहिती आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पुन्हा पूर्णवेळ लिखाणात रूजू व्हायचे होते.
 
 
आपली विचारधारा, ती रुजविण्यासाठी करावे लागणारे लिखाण, त्यातून मांडायचे तर्क, त्या तर्कांना देण्याचे पुरावे, बदलत्या काळानुसार हिंदुत्व मानणार्‍या मंडळींसमोरची नवी वैचारिक आव्हाने, असे एक ना अनेक कितीतरी विषय त्यांच्या डोक्यात होते. मात्र, नियतीच्या मनात काही तरी निराळे असावे. या उमद्या मनाच्या संपादकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मन:पूर्वक श्रद्धांजली.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.