‘मॅरेथॉन आजी’

    04-Aug-2022   
Total Views |

mansa
 
 
उतारवयात मॅरेथॉन गाजवणार्‍या तसेच वनवासी तरुणाला किडनीदान करून परोपकाराचा आदर्श निर्माण करणार्‍या ‘मॅरेथॉन आजी’ सुनंदा विजय देशपांडे यांच्याविषयी...
 
 
जसे वय वाढते तशी जगण्याची इर्ष्या लोप पावते. वयाच्या उतरंडीला म्हणजेच म्हातारपणात तर, अनेकजण अंथरुणाला खिळून अथवा दुसर्‍याच्या आशेवर जीवन कंठीत असतात. मात्र, उतारवयातही मॅरेथॉन स्पर्धा गाजवणार्‍या ठाण्यातील सुनंदा देशपांडे यांना ‘मॅरेथॉन आजी’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १९५२ साली प्रवरासंगम येथे जन्मलेल्या सुनंदा यांचे वडील दत्तात्रय काटकर शिक्षण खात्यात साहाय्यक अधिकारी असल्याने त्यांची बदली होईल. तिथे बिर्‍हाड हलवावे लागे. त्यामुळे सुनंदा यांचे बालपण आणि शिक्षण प्रवरासंगम, अहमदनगर व औरंगाबाद येथे झाले. लहानपणी शाळेत कबड्डीपटू म्हणून कारकिर्द गाजवली.
 
 
नंतर १९७३ मध्ये विवाह झाल्यावर त्या ठाण्यात वास्तव्यास आल्या. ठाण्यातील येऊर येथील विवेकानंद बालकाश्रमात बालवाडी शिक्षिका म्हणून त्यांनी १८ वर्षे नोकरी केली. सासू-सासर्‍यांना कर्करोगाने ग्रासल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. नोकरी अर्धवट केल्यामुळे त्यांना पेन्शनही मिळत नाही. तरीही त्या समाधानी असल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो. त्यांचे पती हे ‘नॅशनल रेयॉन’मध्ये नोकरी करीत होते. आपल्या मुलांना खूप शिकवावे, अशी त्यांची इच्छा होती आणि ती पूर्णही झाली. त्यांची दोन्ही मुले चांगल्या हुद्द्यावर काम करीत आहेत. त्यामुळे आता मी निवांत असल्याचे त्या सांगतात.
 
 
क्रीडाक्षेत्रात काही तरी करून दाखवण्याची उर्मी त्यांना नेहमीच वाटे. ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पुढाकाराने प्रारंभ झालेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी पहिल्यांदा सहभाग घेतला. तेव्हापासून आजतागायत प्रत्येक मॅरेथॉनमध्ये दौडत असल्याचे त्या सांगतात. ज्येष्ठ नागरिक महिला गटात त्यांनी आतापर्यंत सहा वेळा पारितोषिक मिळवले आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत त्या अनवाणी धावतात.
 
 
पाचपाखाडीतील चंदनवाडीत राहणार्‍या सुनंदाबाईचा परिवार तसा छोटासाच.त्यांना दोन मुले, सुना व दोन नातवंडे असून २०१५ साली पतीचे निधन झाले. मात्र, हे दु:ख पचवून त्यांनी सातव्या महिन्यात पार पडलेल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये पहिल्या पाचमध्ये येण्याचा बहुमान मिळवला होता. वयाच्या सत्तरीत तरुणींनाही लाजवेल, असा उत्साह असलेल्या या चिरतरूण आजी म्हणजे आबालवृद्धांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार महापालिका यांच्यावतीने भरविण्यात येणार्‍या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत त्या दरवर्षी सहभाग घेतात. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत तर त्या गेली २९ वर्षे सहभागी होत आहेत. त्यामुळे सुनंदाबाई आपल्या सहकार्‍यामध्ये ‘देडफुटी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. जिंकलो नाही तरी चालेल, पण स्वत:च्या आनंदासाठी अशा स्पर्धामध्ये सहभागी व्हायचे, असा त्यांचा निर्धार असतो. त्यामुळे, ठाणेकर त्यांना ’मॅरेथॉन आजी’ म्हणूनच ओळखतात.
 
 
पण, आता त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे ती त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. निधनानंतर देहदान करण्याचा प्रघात असल्याने ही इच्छा तर त्यांनी लिहून ठेवलीच आहे. परंतु, जीवंत असतानाच आपल्या शरीरातील अवयवांमुळे एखाद्याला जीवन मिळेल हे त्यांना प्रत्यक्ष पाहायचे होते, यासाठी नात्यागोत्यात नसलेल्या एका गरजू वनवासी युवकाला आपली किडनी दान केली आहे.
 
 
आपले आयुष्य आपण जगले... पण, आपल्या पश्चात आपल्या देहातील अवयवांचा उपयोग इतर गरजूंना व्हावा व त्यांना जीवनदान मिळावे यासाठी त्यांनी जीवंतपणी किडनी दान करावे असे मनाशी ठरविले. सोशल मीडियामुळे त्यांना अनेक गरजू किडनी दान संदर्भात विचारणा करू लागले. परंतु, व्यसनी व्यक्तीला किडनी देणार नाही, असे त्यांनी ठरवले होते. कारण, व्यसनाधीन व्यक्तीला आपण जीवनदान देऊ, परंतु त्याचे व्यसन सुटले नाही, तर मग अवयवदानाचा उपयोग काय? असाही प्रश्न त्यांना पडत होता.
 
 
परंतु, एक दिवस त्यांना पालघर येथील एका वनवासी मुलाने संपर्क साधला, १६ वर्षीय सोमा रामा बरफ या मुलांला एका किडनीने जीवनदान मिळणार होते, त्यामुळे सुनंदा काटकर यांनी या मुलाची सर्व चौकशी करून त्यालाच किडनी दान करायचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी स्वत:च्या सर्जरीचा २२ लाखांचा खर्च स्वत:च करून वनवासी मुलाला आपली किडनी दान केली. या औदार्‍याची माहिती कथन करताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. खरं तर केलेले ’दान’ सांगायचे नसते.
 
 
त्यामुळे सुनंदा यांनाही याची वाच्यता करायची नव्हती. मात्र, त्यांच्या या अमूल्य दानाच्या माहितीवरून एखाद्या दानशुराला प्रेरणा मिळू शकते. हे त्यांना पटवून दिल्याने त्यांनी याची माहिती दिली. ‘याची देही याची डोळा’ आपल्या अवयवामुळे एका व्यक्तीला जीवनदान दिल्याचे मला खूप समाधान वाटत असल्याचे त्या सांगतात.
 
 
गेली दोन वर्षे कोरोनामुळे वर्षा मॅरेथॉन होऊ शकली नाही. परंतु, यावर्षी ही मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. पण, आता या स्पर्धेसाठी मी फिट नसल्यामुळे मला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मात्र, याची मनात खंत नाही. या स्पर्धेसाठी मी इतर स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायला नक्की येणार हे सांगायला त्या विसरत नाही. न घाबरता बिनधास्त जगा! असा संदेश युवा पिढीला देणार्‍या चिरतरूण मॅरेथॉन आजीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून आरोग्यदायी शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.