डेन्मार्कचा लाल समुद्र

    04-Aug-2022   
Total Views |

denmark
 
 
प्राचीन रुढी, प्रथा आणि परंपरांच्या नावाखाली जीवांची होणारी कत्तल हा तसा वादाचा विषय. त्यावर भल्याभल्यांना तोडगा काढता आलेला नाही. तो दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जाण्याचे कारण म्हणजे डेन्मार्कच्या ’लिटल फॅरो’ बेटावर होणार्‍या व्हेल आणि डॉल्फिन माशांच्या कत्तली.
 
 
खरंतर व्हेल आणि डॉल्फिनची क्रूरपणे कत्तल हा आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी जुलै-ऑगस्ट दरम्यान चर्चिला जाणारा विषय. डेन्मार्कच्या फॅरो बेटावर प्रथेच्या नावाखाली दरवर्षी हजारो डॉल्फिन्सच्या कत्तली होतात. गेल्याच वर्षी एका दिवसात १४०० हून अधिक डॉल्फिन्सची कत्तल झाली. हा प्रकार इतका भयानक आणि क्रूर असतो की, समुद्र किनाराही या डॉल्फिनसच्या रक्ताने लालबूंद होतो. प्रथेच्या नावाखाली सुरू असणारा हा क्रूर खेळ थांबवावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय पटलावर पर्यावरणप्रेमींनी अनेकदा केली. मात्र, त्याला फारसे यश आलेले नाही.
 
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरही याबद्दल रोष व्यक्त केला जातो. मात्र, तिथल्या स्थानिकांच्या परंपरेच्या आड सरकार येणार तरी कसे? मग तिथल्या सरकारने जुलै महिन्यात त्यावर अध्यादेश काढला. ’लिटल फॅरो’ बेटांवर यंदा म्हणजेच २०२२-२३ या वर्षांत फक्त ५०० डॉल्फिन्सचीच कत्तल करा, असे निर्देशदेण्यात आले आहेत.
 
 
उत्तर अटलांटिक बेटांवर होणारी ही शिकार सुमारे तब्बल चार शतकांपासून सुरू आहे. ही तिथली परंपराच आहे. या परंपरेत समुद्री सस्तन प्राण्यांना त्यांच्या मांस आणि ’ब्लबर’साठी (माशाच्या शरीरातील एक भाग) मारले जाते. ही परंपरा व्यावसायिक हेतूने नाही. मात्र, या प्रकाराला सरकारची अधिकृत मान्यता आहे. अर्थात, इतक्या मोठ्या प्रमाणावर सागरी जीवांची होणारी हत्या ही पर्यावरणप्रेमींच्या असंतोषाचे कारण तर बनणारच! अनेकांनी या क्रूर परंपरेचा आपापल्या परीने विरोध केला. जिथे व्हेलची कत्तल करण्याचे प्रमाण पूर्वी ५० इतके होते ते पुढे जाऊन दीड हजारांपर्यंत पोहोचले.
 
 
डेन्मार्कच्या फॅरो बेटावर ‘ग्रिंडाड्रॅप’ नावाने हा पारंपरिक उत्सव साजरा होतो. या उत्सवात समुद्री सस्तन प्राण्यांना मोटारबोटींद्वारे किनार्‍यावर आणले जाते. त्यानंतर ’हार्पून’ आणि ’पॉवर ड्रिल’ वापरून हे मासे मारले जातात. एका अहवालानुसार, २०२१ मध्ये अशाच उत्सवात तब्बल १,४२८ डॉल्फिन्स मारले गेले. पर्यावरणवाद्यांच्या रोषामुळे संपूर्ण इत्यंभूत माहिती गोळा केली गेली. अगदी निळ्याशार समुद्रावर हजारो मृत डॉल्फिनच्या रक्ताने माखलेल्या किनार्‍याचे फोटो सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले. सोशल मीडिया अभियान चालवण्यात आले. ५० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर अटलांटिक बेटांवर फक्त डॉल्फिनची नव्हे, तर पायलट व्हेलहीची शिकार केली जाते.
 
 
अर्थात, या मुद्द्यावर राजकारण आलेच. स्थानिकांनी हा आमच्या परंपरेचा भाग आहे, त्याला कुणीही डंख लावू नका, असा आवाज उठवला. यामुळे आमच्या संस्कृतीलाही धक्का लागेल, असेही दाखले दिले. आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रथेला विरोध होत आहे म्हटल्यावर स्थानिकांकडून आवाज उठविला जाणार, हे निश्चित. आम्ही पूर्वापार निसर्गावर अवलंबून आहोत, अन्नग्रहणासाठी निसर्गावर अवलंबून असण्याबद्दल काय चुकलं? असा सवाल ते उपस्थित करतात. अर्थात, अशा अघोरी प्रथांमुळे पर्यावरण परिसंस्थेतील निसर्गातील एक घटकच नामशेष होईल, याबद्दलच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नसते.
 
 
फेरोज सरकार या प्रकरणात हळूहळू तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे काय तर दरवर्षी सुमारे ६०० पायलट व्हेल मारले जातात. यंदा ही संख्या आम्ही ५०० इतकीच ठेवू, असा दावा त्यांनी केला. सस्तन प्राण्यांच्या शिकारी आणि कत्तलीबद्दल अपरिचित लोकांसाठी फारोई व्हेल शिकार हा चिंतेचा विषय मानला जात आहे. मात्र, तिथल्या सरकारच्या म्हणण्यानुसार, आमचे त्यावर नियंत्रण आहे, असे सरकार सांगते. तिथल्या सर्वेक्षणात ५३ टक्के जणांनी असली क्रूर प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. तरीही सरकार त्यादृष्टीने कुठलेही पाऊल उचलेल, अशी शाश्वती नाही.
 
 
युरोपीय महासंघात व्हेल, डॉल्फिन किंवा अन्य तत्सम जीवांचा समावेश हा संरक्षित जीवांमध्ये होत असतानाही अशी प्रथा बंद न होण्याचे परिणाम हवामान बदल, आणि व्यापक संकटांद्वारे मानवाला भोगावे लागतील, याबद्दल दुमत नाही.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. तीन वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन.