वैदिक परंपरा आणि साधना

दुर्योधन

    04-Aug-2022
Total Views |

duryodhn
 
दुर्योधन म्हणजे आपल्यातीलच वाईट गुण न सोडणारी, झगडणारी दुर्दम्य वृत्ती होय. म्हणून सार्‍या कौरवांची नावे ‘दु:’ म्हणजे वाईट विशेषणांनी या सुरू होतात. कोणीही आपल्या मुलांना अशी वाईट नावे ठेवणार नाही. एकच मुलगी झाली, पण तिचे नाव ’सुशीला’ न ठेवता ’दु:शीला’ ठेवले. जी वृत्ती युद्ध करण्यास वा विजय मिळविण्यास कठीण, अशाला वेदव्यास ‘दुर्योधन’ असे म्हणतात.
 
 
पांडवी वृत्तीरूप वस्त्रहरण करण्याकरिता दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्योधनावर मृत्यूपूर्वी स्वतःचेचवृत्तीरूप वस्त्रहरण करण्याचा प्रसंग आला होता, असे महाभारतात सुंदर वर्णन आहे. सर्व सेना मारली गेल्यावर दुर्योधनाला अमर होण्याकरिता व्यास नग्न होऊन माता गांधारीसमोर जाण्यास सांगतात व माता गांधारीला आपल्या नेत्रावरील पट्टी म्हणजे ती वृत्ती दूर सारून पाहण्यास सांगतात. दुर्योधन ठरल्याप्रमाणे नग्न होऊन माता गांधारीकडे जायला निघतो. मध्येच श्रीकृष्ण भेटतात.
 
 
श्रीकृष्णाला पाहून दुर्योधन लाजतो. श्रीकृष्ण दुर्योधनालाएक कटीवस्त्र देतात. ते कटीवस्त्र नेसून दुर्योधन मातेसमोर जातो. माता गंधारी डोळ्यावरील पट्टी काढते, पण केवळ कटीवस्त्र नेसलेल्या दुर्योधनाला पाहून चरकते. कारण, ज्या स्थानी वृत्तीरूप वस्त्र असेल ते स्थान मृत्यूवश होईल व ज्यावर तिची दृष्टी जाईल ते शरीर अमर होईल, अशी तिच्या दृष्टीची शक्ती होती. कृष्णाने युक्तीकरून बुद्धिभेद केल्यामुळे दुर्योधनाला त्या भागावरच भीमाद्वारे गदाप्रहार होऊन दुर्योधनाचा अंत व्हायचा होता. म्हणजे दुर्योधन वृत्तीची मुक्ती व्हायची होती.
 
 
कथा फारच सुंदर पद्धतीने रंगविली आहे. दुर्योधनाचा परममित्र पांडवबंधु कर्ण असल्यामुळे कर्णाच्या मृत्यूमुळे त्याला अतिशय दुःख झाले. कर्ण म्हणजे केवळ कर्णाने (श्रवणाने) जे ऐकले तेच खरे ज्ञान आहे, असे मानणारी साधकातील वृत्ती होय. असली घमेंडखोर वृत्ती भांडणात अग्रेसर असते व प्रसंग पडल्यास वाक्युद्धात विजयी ठरत असते. असल्या वाक्युद्धात अजिंक्य असणारी वृत्ती म्हणजे ‘कर्ण’ होय. असला कर्णरूप मित्र गेल्याने दुर्योधन वृत्तीला अतिशय दुःख होणे साहजिकच होते.
 
 
शल्यमामासुद्धा मारला गेल्याने म्हणजे मनातील असत्कर्माविषयीच्या शल्याचे मरण झाल्याने दुर्योधन अधिकच पोरका झाला होता. कौरव सैन्य मारले गेल्यावर दुर्योधन पळून गेला व तळ्यात लपून बसला. दुर्योधनाचा पत्ता श्रीकृष्णाने लावला आणि महत्प्रयासाने त्याला त्या जलस्तंभातून बाहेर काढून भीमाशी गदायुद्ध करण्यास लावले. दुर्योधन वृत्ती तशी प्रहार करण्यात म्हणजे गदायुद्धात भीमापेक्षा अधिक प्रवीण होती. दुर्योधन हारत नाही, असे पाहून श्रीकृष्णांनी कौशल्याने काम केले.
 
 
भीमाला त्यांनी दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करण्यास खुणेने सांगितले. कमरेखाली गदाप्रहार करणे म्हणजे गदायुद्धाच्या धर्माविरुद्ध होते. परंतु, दुर्योधनुरूप स्वभाव-धर्माविरुद्ध युद्धकेल्याशिवाय दुर्योधनाचाअंत म्हणजे मुक्ती होणार नव्हती. दुर्योधनाशी त्याच्या योग्य धर्मवृत्तीनुसार युद्ध करणे म्हणजे, त्याच्या वृत्तींना अधिक उधाण आणण्यासारखे होते, म्हणून भगवंतांनी भीमाला दुर्योधन गदायुद्धात अधर्मयुद्धाचा अवलंब करण्यास सांगितले. दुर्योधनाशी अधर्मयुद्ध म्हणजे महायुद्धातील मूलवृत्तीला मारणारे युद्ध होय.
 
 
भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधन घायाळ होऊन पडला. कोल्हे-कुत्रे त्याला खायला पाहात होते. त्याला भेटायला अश्वत्थामा आला. दुर्योधनाची अशी अवस्था पाहून त्याला चीड आली आणि त्याने पांडवांना अधर्मानेच मारण्याचे ठरविले. पांडवांचा नाश करेन, अशी प्रतिज्ञा करून ब्राह्मणपुत्र अश्वत्थामा तेथून निघाला. दुर्योधनतसल्या दुःखमय अवस्थेत नंतर मरण पावला. दुर्योधनाचे मरण म्हणजे हठवादीपणाच्या वृत्तींचा सत्प्रवृत्तीद्वारे नाश होय. दुर्योधनाच्यामृत्यूमुळे आता संपूर्ण दुष्ट प्रवृत्तीरूप कौरव वंशाचा नाश झाला होता.
 
 
दुर्योधनाच्या मृत्यूनंतर खर्‍या महाभारत कथेचा अंत व्हायला पाहिजे. पण, पलीकडील महाभारत पर्व कोणत्यातरी महापुरूषाने लिहून महाभारत कथेत उत्तम भरच घातली आहे. विशेषतः अश्वत्थामाप्रकरण तर इतके बहारदार वठले आहे की, ते मस्तकावरील मुकुटाप्रमाणे शोभून दिसते. अश्वत्थामा प्रकरणात अतिशय उच्च अशा योगानुभवातील ज्ञान इतक्या मार्मिकपणे लिहिले आहे की, जणू काही प्रत्यक्ष भगवान वेदव्यासांनीच पुन्हा जन्म घेऊन आपले अपुरे महाभारत पूर्ण केले की काय, असे वाटते. धन्य ती व्यासपरंपरा की, ज्याद्वारे त्या महापुरुषांनी सर्व जगालाच अतिशय उच्च असे अतींद्रिय ज्ञान कथारूपाने बहाल केले आहे.
 
 
महाभारतातील ते दिव्य अतींद्रिय ज्ञान समजल्यामुळे लेखक स्वतःला धन्य मानीत आहे. लेखकाची धन्यता योगेश्वर ज्ञानेश्वरांच्या कृपेचे फळ होय, अशी लेखकाची धारणा आहे. महाभारत कथेनुसार अश्वत्थामा कौरवगुरू द्रोणांचा पुत्र होय. द्रोण म्हणजे मूलाधारचक्र हे आपण मागे पाहिलेच आहे. या मूलाधारातून कुंडलिनी जागृत होऊन ती उर्ध्वगामी होऊन ज्यावेळी श्रेष्ठ सहस्रारात स्थिर होते, त्यावेळी योग्याचा सर्व देहभाव नष्ट होऊन त्याच्या शरीरातील रूधिरप्रवाह व श्वासप्रश्वास बंद पडतात व असा श्रेष्ठ योगी कल्पअवस्थेत श्वासाशिवाय राहू शकतो. असल्या श्वासरहित उच्च ब्रह्मावस्थेला महाभारतकार ‘अश्वत्थामा’ असे म्हणतात.
 
 
‘अ’ म्हणजे विरहित व ‘श्व’ म्हणजे श्वासप्रश्वास आणि ‘थाम’ म्हणजे असल्या दिव्य अवस्थेत सदासर्वदा असणे होय, म्हणून अश्वत्थामा अवस्था श्रेष्ठ योग्याची परमावस्था होय. असली अवस्था ब्रह्ममय असल्यामुळे अश्वत्थामा ब्राह्मण मानला गेला आहे. शिवाय असल्या ब्राह्मणाला त्याचे पिता द्रोणाने ब्रह्मास्त्र शिकविल्यामुळे त्याला ब्रह्मात लीन होण्याचे माहीत होते. कौरवी वृत्तीचा पांडवीवृत्तीद्वारे नाश झाला होता. पण, ब्रह्मावस्थेत स्थिर होऊन मुक्त होण्याकरिता कोणत्याच प्रकारची वृत्ती साधकाजवळ असू नये. म्हणून चांगली जरी असली तरी पांडवीवृत्तीसुद्धा मुक्तीच्या दृष्टीने मरणे आवश्यक होते. म्हणून दुर्योधनाच्या मृत्यूचे कारण घेऊन अश्वत्थामा ब्रह्मवृत्ती पांडवांचा नि:पात करण्याचे योजते. वृत्तीहीन झाल्याविना मुक्ती नाही.
 
 
 
दुर्योधनाच्या मरणाचा सूड उगविण्याचा विचार करीत अश्वत्थामा एका झाडाखाली पडला होता. मध्यरात्रीची वेळ होती. मध्यरात्री योगी साधना करून समाधी अवस्थेत जातात व वृत्तीहीन बनून मुक्तीच्या मार्गाला लागतात, हे आपण यापूर्वी अनेकवेळा पाहिले आहे. अश्वत्थामा असाच मध्यरात्री ‘अश्व’ म्हणजे समाधी अवस्थेत जाऊन मुक्तीच्या मार्गाप्रत गमन करतो. मध्यरात्री असा विचार करता करता त्याला झाडावर एक भीषण घटना दिसली. एक घुबड अंधाराचा फायदा घेऊन त्या झाडावरील कावळ्यांची अंडी खात होते. घुबड अंधाराचा फायदा घेऊन जसा नाश करीत होते, तसा आपणसुद्धा रात्रीचा फायदा घेऊन पांडव शिबिरात जावे आणि शिबिरातील सर्व पांडवांना ठार मारावे, असा घोर विचार करून अश्वत्थामा कामाला लागला.
 
 
 -योगीराज हरकरे
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.